मुलाखतीच्या तयारीचा आशयात्मक अंगाने विचार केल्यानंतर तिच्या अभिव्यक्ती आणि संवादात्मक आयामाची चर्चा करणे आवश्यक ठरते. मुळात मुलाखत ही तोंडी स्वरूपाची परीक्षा असल्याने येथे संभाषण, संवाद, भाषिक अभिव्यक्ती निर्णायक ठरते. आपल्याला विचारलेल्या प्रश्नाच्या बाबतीत स्वत:ला जे वाटते ते अपेक्षित पद्धतीने, योग्य भाषेत, स्पष्ट व आत्मविश्वासपूर्वकपणे मुलाखत मंडळासमोर मांडणे ही कला महत्त्वाची ठरते. उत्तराच्या अभिव्यक्तीमध्ये भाषेच्या विविध अंगांपासून आपल्या बोलण्याच्या/व्यक्त होण्याच्या पद्धतीपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश होतो.

मुलाखत म्हणजे स्वत:चे व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे मुलाखत मंडळासमोर सादर करणे होय. या प्रक्रियेची सुरुवात मुलाखतीच्या कक्षात प्रवेश करण्यापासून होते. मुलाखत मंडळाच्या परवानगीने कक्षात प्रवेश करणे, त्यांना अभिवादन करणे आणि त्यांच्या परवानगीनेच खुर्चीत विराजमान होणे, या प्रारंभिक बाबींचा संवादप्रक्रियेत समावेश करावा लागतो.

प्रत्यक्ष मुलाखत सुरू झाल्यानंतर विचारलेले प्रश्न काळजीपूर्वक ऐकणे गरजेचे ठरते. सदस्य प्रश्न विचारत असताना आपल्या चेहऱ्यावर तणावपूर्ण भाव येणार नाही अथवा आपल्या शरीराच्या (विशेषत बोटे, हात आणि पाय) विचित्र हालचाली होणार नाहीत याची काळजी घ्यावी. केवळ प्रश्न ऐकतानाच नाही तर संपूर्ण मुलाखतीत आपली देहबोली औपचारिक, संयत व सकारात्मक असावी. बऱ्याच वेळा आपल्या मनात चाललेले विचार, तणाव, काळजी इ. चेहऱ्यावर प्रतििबबित होण्याची शक्यता असते. तसे होऊ न देता चेहऱ्यावर शांत व संयत भाव राहतील याची काळजी घ्यावी.

बसण्याची पद्धत, चेहऱ्यावरील हालचाली, हावभाव ताठर स्वरूपाचे असू नयेत. संवाद साधताना औपचारिकता पाळावयाची असली तरी तुमच्या एकंदर अभिव्यक्तीत मोकळेपणा व सहजताही आवश्यक ठरते. त्यादृष्टीने प्रसंगानुरूप चेहऱ्यावर स्मितहास्य आणणे उपयुक्त ठरते.

मुलाखतीच्या प्रक्रियेत सर्वच सदस्यांना संबोधित करत, प्रत्येक सदस्याकडे पाहत उत्तरे देणे आत्मविश्वासाचे लक्षण मानले जाते. शिवाय त्याद्वारे सर्वच सदस्यांना आपल्या संवादात सामावून घेऊन त्यांनाही त्यात रस निर्माण करणे केव्हाही अधिक चांगले! अन्यथा केवळ प्रश्न विचारलेल्या सदस्याकडे पाहूनच अथवा एकाच सदस्याकडे पाहून उत्तरे दिल्यास इतर सदस्यांचा मुलाखतीतील रस कमी होऊ शकतो, हे लक्षात घ्यावे.

आपल्या उत्तराची भाषा, त्यातील शब्द, वाक्यरचना औपचारिक स्वरूपाचीच असावी. विनाकारण क्लिष्ट शब्दांचा वापर करू नये. अपेक्षित तेथे समर्पक, संकल्पनात्मक शब्दप्रयोगांचा वापर जरूर करावा. संवादाची भाषा औपचारिक अपेक्षित असली तरी ती पुस्तकी, बोजड असू नये. सुलभ-सोपी भाषा हे तत्त्व मुलाखतीतही आचरण्यास हरकत नाही. इतर कोणाचाही उल्लेख करताना अपशब्द वापरला जाणार नाही याची काळजी घ्यावी. कोणाचाही उल्लेख आदरपूर्वकच केला जावा. उमेदवाराच्या आवाजाची पातळी मुलाखत मंडळास पुरेशी ऐकू जाईल अशा स्वरूपाची असावी. आवाज व भाषेत स्पष्टता हवी. आवश्यक तेथे आवश्यक तेव्हा आशयानुरूप पातळीत चढ-उतार करायला हरकत नाही.

मुलाखतीच्या संवादप्रक्रियेत स्वाभाविकत: टिकवून ठेवणे हे एक मोठे आव्हान असले तरी अगत्याचे ठरते. साचेबद्ध, तयार केलेली उत्तरे जशीच्या तशी मांडू नयेत. त्यामुळे मुलाखतप्रक्रिया यांत्रिक बनून त्यातील स्वाभाविकताच नष्ट होऊ शकते. त्यामुळे आधीच तयार केलेल्या विषयासंबंधी अपेक्षित प्रश्न विचारला तरी आपण तसे जाणवू न देता काही सेकंदाचा विराम घेऊन विचारपूर्वक उत्तर देत आहोत हे पहावे. उत्तराचा एकच एक ‘फॉरमॅट’ बनवून साचेबद्ध उत्तरे देण्याचे कटाक्षाने टाळावे. आपल्या प्रतिसादात विविधता आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा.

संवादकौशल्याची आणखी एक महत्त्वपूर्ण बाजू म्हणजे आपल्या अभिव्यक्तीतील सभ्यता व संयतता होय. बऱ्याच वेळा मुलाखतीत काही मुद्दय़ांसंबंधी चिकित्सक स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. अशावेळी संबंधित मुद्दय़ावर टीका करताना अथवा त्यातील दोष-कमतरतांचे अधोरेखन करताना आपली भाषा संयत, सभ्य व विधायकच हवी, हे लक्षात घ्यावे.

संपूर्ण मुलाखतीदरम्यान आपले भावनिक, मानसिक आणि वैचारिक संतुलन टिकवून ठेवणेही गरजेचे असते. काही मुद्दय़ांच्या बाबतीत आपण अतिसंवेदनशील, भावनिक होऊन बोलण्याची शक्यता असते. अथवा काही बाबतीत अतिरिक्त प्रमाणात कठोरही बनण्याची शक्यता असते. ही बाब आपण काय मत मांडत आहोत याप्रमाणेच आपण वापरत असलेली भाषा, आपल्या आवाजाची पातळी आणि देहबोली यातून व्यक्त होत असते. त्यामुळे ही दोन्ही टोके टाळून आपल्या भावनिक व्यक्तिमत्त्वातील समतोल टिकवून ठेवणे महत्त्वाचे ठरते.

मुलाखतीदरम्यान काही संकेत कटाक्षाने पाळावेत. सदस्यांना प्रवेश करताना व मुलाखत संपल्यावर अभिवादन करणे, काही चुकल्यास दिलगिरी व्यक्त करणे, मंडळाने उत्तराच्या बाबतीत मदत केल्यास वा काही सुचविल्यास त्यांना धन्यवाद देणे, सर्वाना संबोधत सर्वाकडे पाहून बोलणे, प्रश्न विचारून झाल्यावर तत्काळ उत्तर न देता काही सेकंदाच्या विश्रामानंतर उत्तर द्यावयास सुरुवात करणे, सदस्याने आपण उत्तर देताना मध्येच अडवून प्रश्न-उपप्रश्न विचारल्यास त्यांचा प्रश्न ऐकून घेऊन मगच उत्तर देणे, माहीत नसल्यास तसे स्पष्टपणे सांगणे अथवा त्याबाबत अंदाज व्यक्त करायचा असल्यास मंडळाच्या परवानगीनेच तसे करणे, प्रामाणिकपणाचे पालन करणे, मंडळाशी दुमत अथवा मतभेद झाल्यास अत्यंत संयमी व संयतपणे भूमिका मांडणे यांसारख्या संकेताचे जरूर पालन करावे. उपरोक्त चíचलेल्या विविध अंगाचा विकास करण्यासाठी अर्थातच गरज आहे ती भरपूर सरावाची. मुलाखतीची रंगीत तालीम अर्थात ‘ Mock Interview’ च्या माध्यमातून भरपूर सराव केल्यास या कौशल्याचा विकास साधता येईल.