शालेय जीवनात इतिहासातील  सनावळ्या, राजांची नावे या गोष्टी लक्षात ठेवणे म्हणजे मोठी कसरतच. त्यामुळे हा विषय म्हणजे वैताग, असेच अनेक विद्यार्थ्यांना वाटायचे. पण ग्रामीण प्रशाला, माडजच्या विद्यार्थ्यांना तसे वाटत नाही. याचे कारण आहे, त्यांचे शिक्षक  बालाजी इंगळे यांनी केलेला एक वेगळा प्रयोग.

उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा तालुक्यातल्या  ग्रामीण प्रशाला माडजह्ण या शाळेत बालाजी इंगळे गेली १४ वर्षे  शिकवत आहेत. नवनव्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक आवडीचे कसे होईल, याचा शोध घेत आहेत.  मराठी, इतिहास, नागरिकशास्त्र अशा गुणांच्या शर्यतीत तुलनेने मागे असलेल्या विषयांत इंगळे सर मात्र विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी ज्ञान देत आहेत.  मराठीतले वाक्प्रचार समजण्यासाठी त्याचे नाटय़ीकरण करून दाखवण्यासारखा हलकाफुलका पण प्रभावी उपक्रम ते हाती घेतात. शाळेचे ग्रंथालय सांभाळतानाच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतात. ‘मायबोली शब्दकोशा’सारखा महत्त्वाचा उपक्रमही हाती घेतात. नागरिकशास्त्र शिकवताना गावात शोष खड्डय़ांचा प्रकल्प ते उभारतात तर वाचनप्रेरणादिनी विद्यार्थ्यांनाच चरित्रलेखनाचे प्रात्यक्षिक करायला देतात. कधी शासनाच्या योजना समजून घेऊन त्या विद्यार्थ्यांकरवी गावालाही समजावून सांगतात. पण इतिहास विषयासाठी त्यांनी केलेला उपक्रम खरोखरच आगळावेगळा आहे.

माडज प्रशालेतील विद्यार्थी तसे अभ्यासू पण इतिहासातल्या सनावळ्या लक्षात ठेवता ठेवता त्यांना इतिहास नकोसा होऊ लागला. पुस्तकातले उपक्रमही कंटाळवाणे वाटू लागले. मग एक दिवस नववीच्या इतिहासाची अनुक्रमणिका पाहताना बालाजी इंगळेंना एक वेगळा उपक्रम सुचला.  तो म्हणजे पुस्तकातला इतिहास समजून घेत मुलांनी समांतर पातळीवर

स्वत:च्या घराण्याचा इतिहास लिहायचा. विद्यार्थ्यांनाही ही कल्पना आवडली आणि ते कामाला लागले. इयत्ता नववीच्या इतिहास पाठय़पुस्तकातील प्रकरण समजून मग आपल्या घराच्या इतिहासातील प्रकरण लिहायचे, असे ठरले.

इतिहासलेखन म्हणजे नेमके काय, ते कसे करायचे, याचे प्रात्यक्षिकच विद्यार्थ्यांना मिळाले. तो लिहीण्यासाठी किती कष्ट, अभ्यास करावा लागतो, हे समजले. एकूणच आधी कंटाळवाणा असलेला एक विषय कायमचा आवडता झाला.

पहिले प्रकरण होते, ‘इतिहासाची साधने’. इतिहासलेखनासाठी कोणती साधने वापरली जातात, त्याची माहिती यात आहे. ते वर्गात अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या घराण्याचा इतिहास लिहिताना कोणत्या साधनांचा वापर केला ते लिहिले. दुसऱ्या प्रकरणात आल्या, घराण्यातील महत्त्वाच्या घडामोडी. उदा. जन्म-मृत्यू, मोठी खरेदी-विक्री, लग्न, वाटणी वगैरे वगैरे. तिसऱ्या प्रकरणात अंतर्गत समस्यांबद्दल लिहिले गेले उदा. गृहकलह, भाऊबंदकी, शेतीचे वाद, मोठी आजारपणे इ. चौथ्या प्रकरणात घराण्यातील आर्थिक देवाणघेवाण व उत्पन्नाचे मार्ग, आर्थिक अडचणी, या अडचणींवर घरातल्यांनी केलेली मात याबद्दल माहिती लिहिली. पाचव्या प्रकरणात घराण्याच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल लिहिले. घराण्यात कोणी कोणी शिक्षण घेतले, त्याचा उपयोग काय झाला याबद्दल लिहिले. सहाव्या प्रकरणात घरातील स्त्रियांच्या परिस्थितीबद्दल माहिती लिहिली. त्यांच्या कामाबद्दल, शिक्षणाबद्दल, घरातल्या निर्णय प्रक्रियेतील त्यांच्या सहभागाबद्दल माहिती लिहिली. तर सातव्या प्रकरणात घराण्यामध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रवेश कधी झाला व कसा झाला ते विद्यार्थ्यांनी लिहिले. त्याचा उपयोग कशापद्धतीने झाला, याचीही माहिती दिली. आठव्या प्रकरणात घराण्यातील उद्योग आणि व्यापाराबद्दल माहिती लिहिली. शेती किंवा इतर व्यवसायाबद्दल माहिती लिहिली. तर शेवटच्या प्रकरणात पणजी-पणजोबांच्या जीवनापासून आजच्या जीवनापर्यंत कशा प्रकारचे बदल होत गेले ते लिहिले. उदा. त्यांच्या काळातील दिनक्रम, आजच्या काळातील दिनक्रम, त्यात कशामुळे फरक पडत गेला इ. अशा पद्धतीने आपल्या घराण्याचा संपूर्ण इतिहास लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांना आपसूकच काही गोष्टी उमजत गेल्या. मुख्य म्हणजे पुस्तकातल्या धडय़ांच्याच धर्तीवर आपल्याही घराण्याला काही एक धर्तीचा इतिहास होता, हे जाणवल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यात रस वाटू लागला. अनेकांना आपल्याच कुटुंबाविषयी बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या. कुणी खूप खूप दिवसांनी आजी-आजोबांशी इतका वेळ गप्पा मारल्या. तर कुणाला पालकांचे, आजी-आजोबांचे कर्तृत्व कळल्यावर अभिमान वाटला. आठवणी सांगताना घरातले मोठे थकत नव्हते.. त्यांच्या बोलण्यातला तो प्रवाह, ओढ विद्यार्थ्यांसाठी नवीच होती. अनेक घरांतील भावाभावांत वाटणी झाली होती. अनेकांच्या घरात हुंडा घेतला गेला होता. या प्रथांविषयी, घटनांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती झाली. त्यांचे तोटे कळले. घरातल्या वृद्धांच्या भाषेबद्दलही अनेकांना कुतूहल वाटले.

घराची आर्थिक घडी बसवताना काय काय कसरत करावी लागते, याची जाणीव विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच झाली. घरातल्या स्त्रियांच्या परिस्थितीविषयी जाणीव झाली. चूल आणि मूल करणे म्हणजे नेमके काय हे समजले. महिला शिक्षणाचे महत्त्व समजले. १९९३ साली त्या भागात भूकंप झाला होता. त्याविषयीही समजले. घराण्याची प्रगती, अधोगती आणि मानसिकता लक्षात आली. घराण्यातील रूढी, परंपरा समजल्या. या इतिहास लेखनाने न सांगताच विद्यार्थ्यांना बरेच काही शिकवले.

मायबोली शब्दकोश

उमरगा तालुका म्हणजे सीमेवरचा भाग. माडज गावापासून अवघ्या १५ किमीवर कर्नाटकाची सीमा सुरू होते. साहजिकच इथल्या भाषेत दोन्हीकडच्या शब्दांची सरमिसळ आहे. नेमके हेच बोलीभाषेतील शब्द माडज प्रशालेतील विद्यार्थी परीक्षेतही लिहायचे. कारण त्यांना प्रमाणभाषेतील त्यासाठीचा शब्दच माहिती नसायचा. दुसरा एखादा शिक्षक असता तर गुण कमी करून त्याने पोरांना नापास केले असते. पण  इंगळें सरांनी ते केले नाही. त्याऐवजी त्यांनी बोलीभाषा आणि प्रमाणभाषेचा शब्दकोश तयार केला. या हस्तलिखिताला त्यांनी नाव दिले ‘मायबोली’. गेल्या ४-५वर्षांपासून इंगळे सर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना जवळपास १२०० शब्द आणि अर्थ लिहून काढले आहेत.

संकलन – स्वाती केतकर-पंडित