संपूर्ण जगभर डिजिटल क्रांती होते आहे. त्यानुसार पंतप्रधानांनीसुद्धा डिजिटल इंडियाची घोषणा केली. जगभरात ई-गव्हर्नन्स आणि ई-कॉमर्सची व्याप्ती वाढते आहे. ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून घरबसल्या वस्तू विकत घेता येते. तिच्या दर्जाबद्दल शंका असल्यास ती वस्तू परत देता येते. किमतीत घासाघीस करता येते. त्यामुळेच अधिकाधिक भारतीय ग्राहक याकडे वळत आहेत आणि ई-कॉमर्सला चालना मिळाली आहे. आगामी काळात जगभरातील मोठी लोकसंख्या डिजिटल अर्थव्यवस्थेला जोडली जाईल. त्यामुळेच येणारा काळ हा डिजिटल बिझनेस मॅनेजमेंटचा असेल. अनेक कंपन्यांनी त्या दिशेला पावले टाकायला सुरुवातही केली आहे. व्यवसायाचे डिजिटल सक्षमीकरण करण्यासाठी लागणारे कौशल्य आणि संसाधने यांची त्यांना गरज भासणार आहे. म्हणूनच या क्षेत्रात करिअरच्या मोठय़ा संधी आहेत. तांत्रिक कौशल्य, व्यवस्थापन आणि सर्जनशीलता असणाऱ्या उत्साही युवावर्गाला या क्षेत्रात करिअरच्या विपुल संधी मिळू शकतात.

डिजिटल व्यवसाय व्यवस्थापन (एमबीए)

डिजिटल व्यवस्थापनातील कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि परिपूर्ण ज्ञान देण्याकरिता मुंबई विद्यापीठाने डिजिटल व्यवसाय व्यवस्थापनातील अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामध्ये व्यवसाय विकास आणि मार्केटिंगसंबंधित विषयांचा समावेश आहे. ई-मेल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, वेबसाइट प्लॅनिंग, मोबाइल

आणि वेबमार्केटिंग आदी विषयांचा यात समावेश आहे. या अभ्यासक्रमामध्ये कौशल्य विकसित करण्यासाठीच्या प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला आहे.

आवश्यक गुण

जनसंपर्काची आवड, तंत्रप्रेमी असणे आवश्यक तसेच व्यवस्थापनाची आवड असायला हवी.

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेतील पदवीधारक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हे आदर्श करिअर ठरू शकते.

एमईटी एशियन मॅनेजमेंट डेव्हलपमेंट सेंटर, मुंबई (http://www.met.edu)

नवकोकण एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (http://www.neims.org.in/

या संस्थांमध्ये या संदर्भातील अभ्यासक्रम चालतात.

करिअर संधी

मार्केटिंग किंवा डिजिटल कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. तो पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांला अनेक संधी मिळू शकतात.

  • इंटरनेट मार्केटिंग स्पेशालिस्ट
  • डिजिटल सेल्स एक्झिक्युटिव्ह,
  • डिजिटल बिझनेस मॅनेजर