भारतीय अभिलेखागार या संस्थेला फार मोठी परंपरा आहे. या संस्थेची स्थापना १८९१ साली कोलकाता येथे करण्यात आली. ती भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा एक भाग आहे. १९११ साली ही संस्था दिल्ली येथे हलविण्यात आली. १९२६ सालापासून ही संस्था सध्याच्या इमारतीत कार्यरत आहे. २०१५ साली या संस्थेने १२५ वर्षे पूर्ण केली आहेत.

आपल्या देशातील स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर महत्त्वाच्या ऐतिहासिक दस्तावेजाचे संरक्षण, संवर्धन करण्यात या संस्थेने मोलाची कामगिरी बजावली आहे. ऐतिहासिक दस्तावेज गोळा करणे, त्यांची छाननी करणे, विषयानुरुप त्यांचे वर्गीकरण करणे इत्यादी कामे या संस्थेमार्फत केली जातात. यातील काही दस्तावेज हे गोपनीय स्वरूपाचेही असतात. विशिष्ट कालावधीनंतर वा शासनाच्या परवानगीनंतर ही कागदपत्रे अभ्यासक आणि सामान्य नागरिकांसाठी खुली केली जातात. खुल्या केलेल्या या कागदपत्रांद्वारे अभ्यासकांना अनेक नव्या ऐतिहासिक बाबी कळतात. नवी तथ्ये आढळून येतात. अनेक घटनाक्रमांचा नवा अन्वयार्थ लावता येतात. त्यामुळे इतिहासातील काही गैरसमजुती दूर होण्यास साहाय्य होऊ शकते. इतिहासातील ज्ञात घटना घडामोडींचा वस्तुनिष्ठ धांडोळा घेण्यासाठी ही कागदपत्रे अत्यंत उपयुक्त ठरतात.

ऐतिहासिक कागदपत्रे वा दस्तावेजांचे जतन करण्याची परंपरा आपल्या देशात म्हणावी तेवढी सक्षम झाली नाही. त्यामुळे अनेक बाबी या मौखिक स्वरूपातच वा अनधिकृतरी त्याच इकडे-तिकडे जात राहिल्या. परिणामी घटनाक्रमांची संगती लावणे वा कारणमीमांसा करण्यासाठी या अर्धकच्च्या आधारांचा अभ्यासक वा इतिहासकारांना आधार घ्यावा लागत असे. मात्र अभिलेखांचे शास्त्रीय पद्धतीने जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू झाल्यानंतर अभ्यासकांना अधिकृत अशी कागदपत्रे उपलब्ध होऊ लागली. त्यातून इतिहासावर नवा प्रकाश टाकणेही शक्य होऊ लागले. संपूर्ण देशातील ऐतिहासिक व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांचे शास्त्रीयदृष्टय़ा जतन व व्यवस्थापन करणे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभिलेखागारांसमवेत समन्वय साधणे, अभिलेखांना अधिकाधिक मोकळे वा मुक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे, आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी शास्त्रीय मनोवृत्ती व व्यावसायिकता निर्माण करणे, ही या संस्थेसमोरची उद्दिष्टे आहेत.

डिप्लोमा कोर्स इन अर्काइव्ह अ‍ॅण्ड रेकॉर्ड्स

अभिलेखांची नोंदणी, संरक्षण आणि संवर्धन अशा बाबींसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागते. त्या अनुषंगाने भारतीय अभिलेखागार संस्थेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्कूल ऑफ अर्काइव्हल स्टडीजने विविध कालावधीचे अभ्यासक्रम व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. यापैकी एक अभ्यासक्रम आहे, डिप्लोमा कोर्स इन अर्काइव्ह अ‍ॅण्ड रेकॉर्ड्स. नव्या आव्हानात्मक विषयाकडे वळू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हा अभ्यासक्रम निश्चितपणे विविध संधी उपलब्ध करून देऊ शकतो. इतिहासाची आवड, प्रचंड परिश्रम करण्याची तयारी आणि संयम हे तीन गुण या वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. या अभ्यासक्रमाचा प्रारंभ १ नोव्हेंबर २०१८ला होईल आणि ३१ऑक्टोबर २०१९ रोजी तो संपेल. रेकॉर्ड्स मॅनेजमेंट (अहवाल/ साहित्य व्यवस्थापन), संवर्धन, पुनर्मुद्रण आणि माहिती तंत्रज्ञान या विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. ऐतिहासिक व महत्त्वाचे दस्तावेजांचे संवर्धन, संरक्षण आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती होण्याच्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.

या अभ्यासक्रमाला पुढील अर्हताप्राप्त उमेदवारांना प्रवेश मिळू शकतो.

(१) मान्यताप्राप्त विद्यापीठामधून ५० टक्के गुणांसह इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी म्हणजेच एम.एम केलेले असावे. भारतीय इतिहास हा विषय अभ्यासलेला असावा. किंवा

(२) अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र यापैकी कोणत्याही एका विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी, किंवा

(३) उपयोजित / भौतिकशास्त्रातील ५० टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठामधून एम.एस्सी.

प्रवेश असा मिळतो

या अभ्यासक्रमाला एकूण ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यापैकी १० जागा भारतीय इतिहासात एम.ए केलेल्या विद्यार्थ्यांसाठी, १० जागा इतर शाखांसाठी आणि १० जागा प्रायोजित उमेदवारांसाठी राखीव ठेवल्या जातात. भारत सरकाराच्या नियमानुसार अनुसूचित जाती, जमाती, नॉनक्रिमीलेअर इतर मागासवर्ग आणि दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात येतात. खासगी उमेदवारासांठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे तर प्रायोजित उमेदवारांसाठी वयोमर्यादा ५० वर्षे आहे.

निवड – खासगी २० उमेदवारांच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा व मुलाखती घेतल्या जातात. अंतिम निवड या दोन्ही बाबींमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित केली जाते. या अभ्यासक्रमाला निवड झालेल्या प्रत्येक उमेदवारांना दरमहा पंधराशे रुपये आणि प्रायोजित उमेदवारांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. या अभ्यासक्रमाचे शुल्क पंधराशे रुपये आहे. ते परत केले जात नाही. प्रवेश घेतानाच हे शुल्क भरावे लागते. संस्था राहण्याची व्यवस्था करीत नाही. या अभ्यासक्रमासाठी नोंदणी शुल्क १०० रुपये असून ते रेखांकित (क्रॉस्ड) पोस्टल ऑर्डरने भरावे लागते. ही पोस्टल ऑर्डर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडिया, जनपथ, न्यू दिल्ली-११०००१ या नावाने काढलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०१८ आहे. संपर्क- डायरेक्टर जनरल ऑफ अर्काइव्हज, नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडिया, जनपथ, न्यू दिल्ली-११०००१  दूरध्वनी- ०११-२३३८३४३६, फॅक्स-२३३८४१२७

संकेतस्थळ  http://nationalarchives.nic.in/

इतर अभ्यासक्रम 

संस्थेचे इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

१) सर्व्हिसिंग अ‍ॅण्ड रिपेअर ऑफ रेकॉर्ड्स –

अहवालांची देखभाल, पुनस्र्थापना, सुव्यस्थितरीत्या ठेवणे या बाबींचे प्रशिक्षण या अभ्यासक्रमांतर्गत दिले जाते. अर्हता – उच्च माध्यमिक पातळीपर्यंतचे शिक्षण. इंग्रजी आणि िहदी भाषेचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा- ५० वर्षे. अभ्यासक्रमाचा कालावधी सहा आठवडे. हा अभ्यासक्रम दरवर्षी मे-जून आणि सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात करता येतो.

२) केअर अ‍ॅण्ड कन्झव्‍‌र्हेशन ऑफ बुक्स, मॅन्युस्क्रिप्ट अ‍ॅण्ड अर्काइव्ह –

पुस्तके, हस्तलिखिते यांचे शास्त्रीयदृष्टय़ा संरक्षण, जतन, साठा आणि हाताळणी करण्याचे प्रशिक्षण या अभ्यासक्रमांतर्गत दिले जाते. द्वितीय श्रेणीतील विज्ञान विषयातील पदवी प्राप्त उमेदवार हा अभ्यासक्रम करू शकतो. वयोमर्यादा- ३० वर्षे. कालावधी आठ आठवडे. हा अभ्यासक्रम दरवर्षी जुलै – ऑगस्ट आणि नोव्हेंबर -डिसेंबर महिन्यात करता येतो.

३) रिप्रोग्राफी-

कागदपत्रे, दस्तावेज आणि हस्तलिखितांचे पुनर्मुद्रण तंत्र या अभ्यासक्रमांतर्गत दिले जाते. मायक्रोफििल्मग, स्वयंचलित माहितीसाठय़ाचे संनियंत्रण व हाताळणी आणि पुरवठा या घटकांचेही तंत्र शिकवले जाते. द्वितीय श्रेणीतील विज्ञान विषयातील पदवी प्राप्त उमेदवार हा अभ्यासक्रम करू शकतो.

वयोमर्यादा- ३० वर्षे. कालावधी सहा आठवडे. हा अभ्यासक्रम दरवर्षी एप्रिल-मे आणि सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करता येतो.

४)अर्काइव्ह मॅनेजमेंट-

अभिलेखांची प्राप्ती, शास्त्रीय पद्धतीने ठेवण, मांडणी आणि पुनप्र्राप्ती या बाबींचे तंत्र या अभ्यासक्रमांतर्गत शिकवण्यात येते. कोणत्याही विषयातील पदवी प्राप्त उमेदवार हा अभ्यासक्रम करू शकतो. वयोमर्यादा- ३० वर्षे. कालावधी सहा आठवडे. हा अभ्यासक्रम दरवर्षी फेब्रुवारी-मार्च या महिन्यात करता येतो.

५) रेकॉर्ड्स मॅनेजमेंट-

अहवालनिर्मिती, नियंत्रण आणि विल्हेवाट याबाबतचे प्रशिक्षण या अभ्यासक्रमांतर्गत दिले जाते. कोणत्याही विषयातील पदवीप्राप्त उमेदवार हा अभ्यासक्रम करू शकतो. वयोमर्यादा- ३० वर्षे. कालावधी चार आठवडे. हा अभ्यासक्रम दरवर्षी मे आणि सप्टेंबर या महिन्यात करता येतो.