तुम्ही कर करेतर रकमा इंटरनेट बँकिंगसुविधेचा वापर करून भरू शकता. यासाठी शासनाच्या वित्त विभागाने शासकीय जमा लेखांकन पद्धतही प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये तुम्ही तुमचा महसूल ऑनलाईन जमा करू शकता. त्याला पेमेंट सिस्टमअसे म्हणतात. या ऑनलाईन व्यवस्थेअंतर्गत कुठूनही आणि कधीही रक्कम जमा करता येते.

या सुविधेचा उपयोग करण्यासाठी तुमचे खालील कुठल्याही एका बँकेमध्ये खाते तसेच इंटरनेट बँकिंगचे खाते असणे आवश्यक आहे.

१. युनियन बँक ऑफ इंडिया

२. इंडियन ओव्हरसीज बँक

३. बँक ऑफ इंडिया

४. बँक ऑफ बडोदा

५. आय डी बी आय

कर जमा करण्याची वेळ

ही सुविधा २४ तास उपलब्ध असून ग्राहकास दिवसा वा रात्री कोणत्याही वेळेस भरता येईल. जी रक्कम रात्री १० पर्यंत जमा केली जाईल ती त्या दिवसाची प्रदाने म्हणून गणली जातील व जी प्रदाने रात्री १० वाजल्यानंतर केली जातील ती प्रदाने पुढील दिवसात गणली जातील.

या प्रणालीचे फायदे

  • सहज व सोयीस्कररीत्या वापरता येण्याजोगी प्रणाली आहे.
  • कर भरण्यासाठी वेळेचे बंधन नाही.
  • रांग आणि वेळेचा अपव्यय टळतो.
  • एकदा करदात्याने नोंदणी केली की, पुढील प्रदानापासून चलनाचे बहुतेक रकाने हे आपोआप भरले जातात, त्यामुळे वेळ वाचतो व चुका होत नाहीत.
  • कर प्रदानांच्या यादीमधून (ड्रॉपडाऊन लिस्ट) योग्य कर प्रकार निवडण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • प्रदानानंतर तात्काळ ऑन लाइन चलन उपलब्ध होते.
  • प्रचलित कर प्रदान करण्याच्या पद्धतीमध्ये करदात्यास तीन प्रतींमध्ये चलन भरावे लागते. परंतु राज्य शासनाचा कोणताही कर हा ई-चलन प्रदानाद्वारे केवळ एक चलन भरून करता येतो. त्यात प्रदात्याची कर प्रदनासंबंधीची सर्व आवश्यक महत्त्वाची माहिती समाविष्ट असते.