स्पेनमधील ‘द बार्सिलोना इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ (BIST) या अग्रगण्य संशोधन संस्थेकडून विज्ञान-तंत्रज्ञान शाखेतल्या विविध विषयांतील पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी PROBIST Postdoctoral Fellowship Program ही पाठय़वृत्ती दिली जाते. या पाठय़वृत्ती कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षीप्रमाणे पीएचडी पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.  पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी प्रवेश व त्यासहित पाठय़वृत्तीचे लाभ असे या पाठय़वृत्तीचे स्वरूप आहे.

पाठय़वृत्तीविषयी –

‘द बार्सिलोना इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ (BIST) ही संस्था स्पेनमधील विज्ञान-तंत्रज्ञानातील महत्त्वाची व प्रमुख संशोधन संस्था आहे. क्षेत्रफळाने भरपूर मोठे असलेले हे एक शासकीय विद्यापीठ आहे. तसेच तिथे बहुविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. संस्थेकडून दरवर्षी विविध पाठय़वृत्ती कार्यक्रमांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पीएचडी व पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी प्रवेश व पाठय़वृत्तीचे लाभ दिले जातात. पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमासाठी BIST कडून PROBIST या नावाने पाठय़वृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या पाठय़वृत्ती कार्यक्रमाअंतर्गत तीन वर्षे कालावधी असलेल्या या पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमासाठी एकूण ६१ अर्जदारांची पाठय़वृत्तीसाठी निवड केली जाते.

या पाठय़वृत्ती कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना २०१८ साली सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षांतील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेमधील संस्थेने संकेतस्थळावर नमूद केलेल्या विविध विषयांतील पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी पाठय़वृत्ती बहाल केली जाणार आहे. पाठय़वृत्तीचा एकूण कालावधी पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमाच्या कालावधीएवढा म्हणजे तीन वर्षांचा असेल. पाठय़वृत्तीधारकाला दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करावे लागेल. पाठय़वृत्तीअंतर्गत या कालावधीदरम्यान पाठय़वृत्तीधारकाला ३६,२५२.८२ युरोज एवढे वार्षिक वेतन व १५,०४.८९ युरोज स्थलांतर करण्यासाठी मदत म्हणून दिले जातील. तसेच, अनुभवी तज्ज्ञांकडून त्याच्या संशोधन विकसनाचा मार्ग निश्चित केल्यानंतर तज्ज्ञ व वरिष्ठ संशोधकांकडून पाठय़वृत्तीधारकाला संशोधनासाठी सातत्यपूर्ण मार्गदर्शन दिले जाईल. याव्यतिरिक्त त्याला विविध वैज्ञानिक कौशल्य विकसनासाठी प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.

आवश्यक अर्हता –

ही पाठय़वृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पीएचडीधारक असावा. अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. अर्जदाराच्या विषयांतील पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती त्याने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन मिळवावी. अर्जदाराचा किमान एक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम लेखक म्हणून प्रकाशित झालेला असावा. अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराने आयईएलटीएस किंवा टोफेल या इंग्रजीच्या परीक्षांपैकी कोणत्याही एका परीक्षेमध्ये किमान आवश्यक बँडस् किंवा गुण मिळवलेले असावेत.

अर्जदाराचा सीव्ही अतिशय उत्तम असावा. संशोधनाव्यतिरिक्त त्याच्याकडे कार्यानुभव असेल तर त्याने तो तसा त्याच्या एसओपी व सीव्हीमध्ये नमूद करावा. या पाठय़वृत्तीसाठी त्याने पूर्ण केलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसहित जमा करावा. तसेच अर्जदाराने मागील तीन वर्षांपैकी एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी स्पेनमध्ये व्यतीत केलेला नसावा.

अर्ज प्रक्रिया –

अर्जदाराने तो अर्ज करू इच्छित असलेल्या अभ्यासक्रमाचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून यादीमध्ये दिलेल्या कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रतींसह या संकेतस्थळावरच जमा करायचा आहे. प्रत्येक पोस्ट डॉक्टरल अभ्यासक्रमासाठी वैयक्तिक माहितीचा व संशोधनाचा असे दोन स्वतंत्र अर्ज अर्जदाराला भरावयाचे आहेत. या दोन्ही अर्जासह अर्जदाराने त्याचे एसओपी, सीव्ही, पीएचडी पूर्ण केल्याचे विद्यापीठाचे प्रशस्तिपत्र, आयईएलटीएस किंवा टोफेल यापैकी एका परीक्षेचे गुण इत्यादी गोष्टी जोडाव्यात. पोस्टडॉक्टरल म्हणजे पूर्णवेळ संशोधन असलेला हा अभ्यासक्रम असल्याने अर्जदाराचे एसओपी दर्जेदार असायला हवे. एसओपी लिहिताना अर्जदाराने त्याच्या पीएचडीबद्दल, तसेच संशोधनाची पाश्र्वभूमी, पीएचडीचा मथळा, संशोधनातील कार्याबद्दल झालेला गौरव व मिळालेले पुरस्कार, पीएचडीच्या मार्गदर्शकाचा अल्प परिचय आदी बाबींविषयी प्रगल्भ लेखन करावे. शिफारसपत्रांसाठी मात्र अर्जदाराने त्याच्या पीएचडी मार्गदर्शकासह, अजून एका इतर प्राध्यापक व संशोधकाचा (अर्जदाराच्या संशोधन पाश्र्वभूमीशी परिचय असलेल्या) ई-मेल अर्जामध्ये नमूद करावेत. विद्यापीठ स्वतंत्रपणे संबंधित प्राध्यापकांस संपर्क करून शिफारसपत्र देण्यासाठी विनंती करेल.

निवड प्रक्रिया –

अर्जदाराची संशोधनातील गुणवत्ता लक्षात घेऊन त्याच्या अर्जाची तपासणी केली जाईल. तपासणीमधून गुणवत्तेनुसार निवडक विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात येईल. समितीचा निर्णय अंतिम राहील. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल.

उपयुक्त संकेतस्थळ –

http://bist.eu/probist/

अंतिम मुदत –

या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १ नोव्हेंबर २०१७ आहे.

itsprathamesh@gmail.com