अमेरिकेतील द युनिव्हर्सिटी ऑफ विस्कोन्सिन-मिल्वाकी (यूडब्ल्यूएम) या विद्यापीठाशी संलग्न असलेला शिक्षणशास्त्र विभाग म्हणजेच स्कूल ऑफ एज्युकेशनकडून शिक्षणशास्त्र विषयातील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ  इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश व त्यासहित शिष्यवृत्तीचे लाभ देण्यात येतात. तरी या शिष्यवृत्तीसाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या व शिक्षणशास्त्र विषयामध्ये पदवी घेऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दि. ८ डिसेंबर २०१७ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीविषयी –

अमेरिकेतील विस्कोन्सिन राज्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या मिल्वाकीमध्ये द युनिव्हर्सिटी ऑफ विस्कोन्सिन-मिल्वाकी (यूडब्ल्यूएम) हे शासकीय विद्यापीठ आहे. मिल्वाकी शहरात इतर अनेक विद्यापीठे व संशोधन संस्था आहेत. मात्र त्यापैकी यूडब्ल्यूएम हे प्रमुख व नामांकित विद्यापीठ आहे. तसेच हे विस्कोन्सिनमधील दुसरे मोठे विद्यापीठ आहे. सन २०१५ -१६ या शैक्षणिक वर्षांमध्ये यूडब्ल्यूएममध्ये सर्व अभ्यासक्रमांसाठी मिळून जवळपास सत्तावीस हजार विद्यार्थी होते तर एकूण सोळाशे प्राध्यापक होते. सध्या थोडय़ाफार फरकाने ही संख्या जवळपास तेवढीच आहे. विद्यापीठामध्ये एकूण चौदा महाविद्यालये आहेत. त्याव्यतिरिक्त सत्तर छोटी शैक्षणिक व संशोधन केंद्रे आहेत.  विद्यापीठाकडून एकूण १९१ अभ्यासक्रम चालवले जातात, ज्यामध्ये ९४ पदवी अभ्यासक्रम तर ६४ पदव्युत्तर व ३३ पीएच.डी. अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यूडब्ल्यूएमचा जागतिक क्रमवारीतील क्रमांक पाचशेच्या आसपास आहे.

यूडब्ल्यूएम विद्यापीठाच्या इतर अनेक विभागांप्रमाणे शिक्षणशास्त्र विभाग म्हणजेच स्कूल ऑफ एज्युकेशनकडून शिक्षणशास्त्र विषयातील पदवी घेऊ  इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश व अभ्यासक्रमाचे संपूर्ण शिक्षण शुल्क असे लाभ या शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून दिले जातात.

आवश्यक अर्हता –

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. ही शिष्यवृत्ती पदवी अभ्यासक्रमांसाठी असून अर्जदार कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण असावा. अर्जदाराची बारावीपर्यंतची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याने बारावीमध्ये किमान ३.० एवढा जीपीए मिळवलेला असावा. तसेच अर्जदाराकडे बोली व लेखी इंग्रजीचे चांगले कौशल्य असणे अपेक्षित आहे.

अर्ज प्रक्रिया –

या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने अर्ज पूर्ण भरावा. यानंतर यादीमध्ये दिलेल्या कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रतींसह संकेतस्थळावर नमूद केलेल्या स्कूल ऑफ एज्युकेशनच्या ई-मेलवर पाठवायचा आहे. याव्यतिरिक्त संकेतस्थळावर नमूद केलेल्या विषयांवर निबंधवजा प्रश्नांची उत्तरेदेखील अर्जदारास ई-मेल करावयाची आहेत. अर्जासह आपले दहावी व बारावीचे प्रशस्तिपत्र, एसओपी, सीव्ही, सॅट व टोफेल या परीक्षांचे गुण, शाळा सोडल्याचे प्रशस्तिपत्र, शिफारसपत्रे इत्यादी गोष्टी जोडाव्यात. अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्कृष्ट असावी. त्याला बारावीमध्ये किमान ३.० एवढा जीपीए असावा. शिफारसपत्रांसाठी मात्र अर्जदाराने त्याच्या शालेय पाश्र्वभूमीशी संबंधित आणि परिचित असलेल्या तीन शिक्षकांचे ई-मेल अर्जामध्ये नमूद करावेत. स्कूल ऑफ एज्युकेशन स्वतंत्रपणे संबंधित शिक्षकांना संपर्क करून शिफारसपत्र देण्यासाठी विनंती करेल.

निवड प्रक्रिया –

अर्जदाराच्या अर्जातील माहितीची योग्य तपासणी केल्यानंतर त्याची मुलाखत घेतली जाईल. या मुलाखतीमधील त्याचे सादरीकरण व त्याची सर्वागीण गुणवत्ता लक्षात घेऊन निवड करण्यात येईल. अंतिम निवडीसाठी सीव्हीमधील माहितीवर अधिक भर दिला जाईल. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक सेमिस्टरला किमान सहा क्रेडिट्सची निवड करणे आवश्यक आहे.

उपयुक्त संकेतस्थळ –

  • http://uwm.edu/education/

अंतिम मुदत –

  • या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ८ डिसेंबर २०१७ आहे.

itsprathamesh@gmail.com