दक्षिण कोरिया शासनाकडून ‘ग्लोबल कोरिया स्कॉलरशिप’ नावाचा शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणत्याही विषयामध्ये पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती व विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जातो. या शिष्यवृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३० मार्च २०१७  पूर्वी अर्ज  मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीबद्दल

दक्षिण कोरिया शासनाच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने ‘ग्लोबल कोरिया स्कॉलरशिप’ नावाचा शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दक्षिण कोरियातील विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या विषयांतील संशोधन व प्रकल्प या दोहोंना योगदान देता यावे, द. कोरियातील विद्यापीठांकडे जागतिक बुद्धिमत्ता आकर्षित करता यावी आणि द. कोरियासोबत विविध देशांचे आंतरराष्ट्रीय संबंध वृद्धिंगत व्हावेत, हे या कार्यक्रमामागचे हेतू आहेत. त्यामुळेच जगभरातील जवळपास १७० देशांतील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती शासनाने खुली केलेली आहे. म्हणूनच या शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी साधारणपणे सातशे शिष्यवृत्ती दिल्या जातात.

आशियातील क्रमवारीमध्ये उत्तम क्रमांक असलेली अनेक विद्यापीठे, त्यातील भरपूर विद्याशाखा व विषय, प्रत्येक विषयाच्या भरपूर उपशाखा व त्यामध्ये चाललेले एकूणच उत्तम दर्जाचे, अद्ययावत संशोधन, उत्कृष्ट प्राध्यापकवर्ग, सुसज्ज संगणकीकृत प्रयोगशाळा यामुळे द.कोरिया शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहे. वरील शिष्यवृत्तीच्या बाबतीत प्रत्येक धारकाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम व पीएच.डी. संशोधनाचा काळ वेगवेगळा

असेल. शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून या अभ्यासक्रमांच्या कालावधीकरिता मासिक भत्ता व संपूर्ण टय़ुशन फी दिली जाईल. शिष्यवृत्तीधारकाला दरमहा नऊ  लाख दक्षिण कोरियन वोन एवढा मासिक वेतन भत्ता देण्यात येईल. याव्यतिरिक्त त्याला विमाभत्ता, प्रवासभत्ता व संशोधनासाठीची अनुदानित रक्कम, त्याच्या देशातून ते कोरियापर्यंत विमान प्रवासाचा खर्च, कोरियन भाषा शिकण्यासाठी विशेष निधी, वैद्यकीय विमा, प्रकल्प निधी यांसारख्या इतर सर्व सुविधा देण्यात येतील. शिष्यवृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करून पदवी घेणे योग्य राहील. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही शिष्यवृत्ती इतर कुणालाही देता येणार नाही. अध्र्यातच ती सोडूनही जाता येणार नाही. संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करणे, बंधनकारक राहील.

आवश्यक अर्हता

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदाराकडे तो ज्या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा  पीएच.डी. पूर्ण करणार असेल त्या विषयातील किंवा त्या विषयाशी संबंधित  पदवी व पदव्युत्तर पदवी असावी. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील संशोधन अनुभव असेल, तर त्याला पीएच.डी.साठी प्राधान्य दिले जाईल. अर्जदाराने संशोधनाचे किंवा अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे. आंतरराष्ट्रीय अर्जदारांनी जीआरई, टोफेल व कोरियन भाषेची टोपीक या परीक्षा दिलेल्या असाव्यात. तसेच, त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराने त्याच्या संशोधनाच्या विषयाची उपलब्धता त्याला हव्या असलेल्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तपासावी. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा ४० आहे.

अर्ज प्रक्रिया

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे दोन पर्याय आहेत. ऑनलाइन किंवा आपल्या देशातील कोरियन दूतावासातील कार्यालयाकडे आपला पूर्ण अर्ज जमा करणे. ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे अर्ज करणाऱ्या अर्जदाराने त्याचा अर्ज विहित नमुन्यात पूर्ण भरून दुव्यामध्ये दिलेल्या शासनाच्या संकेतस्थळावर अंतिम मुदतीपूर्वी जमा करावा.

अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याचे जीआरईचे गुण तसेच टोफेल किंवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या दोन्हींपैकी कोणत्याही एका परीक्षेत मिळवलेले गुण किंवा बॅण्डस, तसेच टोपीक या कोरियन भाषेच्या परीक्षेतील गुण, त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., लघु संशोधन अहवाल, प्रकाशित केली असल्यास शोधनिबंधांच्या प्रती, तज्ज्ञांची शिफारसपत्रे, ट्रान्सक्रिप्ट्स् व कार्य अनुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात.

याबरोबरच अर्जदाराने पूर्ण झालेल्या अर्जाची प्रिंट घेऊन त्याबरोबर वरील सर्व कागदपत्रांच्या प्रती स्वतंत्रपणे संबंधित कार्यालयाकडे आंतरराष्ट्रीय कुरियर सेवेने जमा करावीत.

निवड प्रक्रिया

अर्जदाराची विषयातील गुणवत्ता व त्याची संबंधित विषयातील आवड लक्षात घेऊन निवड समितीकडून त्याची अंतिम निवड करण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत ई-मेलने कळवले जाईल. अर्जदाराचा अर्ज स्वीकारण्याचा अंतिम अधिकार विद्यापीठाकडे असेल.

संकेतस्थळ :- http://www.studyinkorea.go.kr/en/main.do

अंतिम मुदत

  • या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३० मार्च २०१७ आहे.

itsprathamesh@gmail.com