17 January 2019

News Flash

विद्यापीठ विश्व : शैक्षणिक ‘तालीम’ शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या परिसरामध्ये विद्यापीठाचे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज चालते.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात कुस्तीसाठी नावाजले जाणारे कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीची शैक्षणिक तालीमही ठरते. त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते, ते कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ. ‘ज्ञानमेवामृतम्’ या ध्येयासह हे विद्यापीठ १८ नोव्हेंबर, १९६२ रोजी स्थापन झाले. सध्या कोल्हापूरसह सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्य़ांमधील विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या उच्चशिक्षणाच्या गरजा पूर्ण करत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाधारित व कौशल्याधारित अभ्यासक्रम आणि दूरशिक्षणाचे नानाविध पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या या विद्यापीठाला ‘नॅक’नेही ‘ए’ दर्जाचे मूल्यांकन दिले आहे. राजर्षी शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यातील सामाजिक संदेशाची जाण ठेवत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हे विद्यापीठ उच्चशिक्षणाच्या व्यापक सार्वत्रिकीकरणासाठी प्रयत्नशील होते. यानंतरच्या टप्प्यावरही ते सातत्याने गुणवत्तापूर्ण उच्चशिक्षणासाठी प्रयत्नशील राहिले आहेत. जवळपास तीनशे संलग्न महाविद्यालये आणि १३ संलग्न संशोधन संस्थांच्या मदतीने हे विद्यापीठ आपले विविध शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवीत आहे.

विद्यापीठ परिसर

गेल्या काही काळापासून ‘जलयुक्त विद्यापीठ’ योजनेमुळे शिवाजी विद्यापीठाचा कोल्हापूरमधील ८५३ एकरांचा निसर्गरम्य परिसर राज्यभरात चर्चेला आला आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाने या परिसरात जवळपास तीस कोटी लिटर पाणी साठविण्याची क्षमता विकसित केली आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या परिसरामध्ये विद्यापीठाचे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज चालते. विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठीच्या स्वतंत्र वसतिगृहांची सुविधाही या परिसरामध्ये आहे. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने ‘युनिव्हर्सिटी सायन्स इन्स्ट्रय़ुमेंटेशन  सेंटर’ अर्थात ‘युसीक’ ही उपकरणांसाठीची अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्या परिसरात ३४ एकर जागेमध्ये ‘लीड बॉटनिकल गार्डन’ चालविले जाते. देशभरातील एक हजाराहून अधिक दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन करण्याचा प्रयत्न येथे केले जातो आहे. दक्षिण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ग्रंथालय असलेल्या ‘बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालया’मध्ये विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी तीन लाखांहून अधिक पुस्तके, ई- बुक्स, नियतकालिके, नऊ  हजारांवर हस्तलिखितांचा खजिना उपलब्ध आहे. विद्यापीठाने स्वत:चे स्वतंत्र असे ई- बुक स्टोअरही सुरू केले आहे. तिथे विद्यापीठातर्फे प्रकाशित पुस्तकांची ऑनलाइन उपलब्धता करून दिली जात आहे. वृक्षारोपणाच्या माध्यमातून हुतात्म्यांच्या स्मृतींची जाणीव ठेवण्यासाठी सुरू झालेले ‘क्रांतीवन’ हेही या विद्यापीठ परिसराचे एक वेगळे वैशिष्टय़ ठरते. अभ्यासिका, वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय, पन्हाळा येथील विद्यापीठाचे अवकाश संशोधन केंद्र, इचलकरंजीमधील विद्यापीठाचे वस्त्रोद्योग इन्क्युबेशन सेंटर या बाबी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी उल्लेखनीय ठरतात.

विभाग आणि अभ्यासक्रम

विद्यापीठामध्ये चालणाऱ्या शैक्षणिक विभागांमधून पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरील विविध अभ्यासक्रम चालविले जातात. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागामध्ये ‘सेंटर फॉर एज्युकेशन लर्निग अँड रिसर्च ट्रेनिंग इन अँजिओस्पर्म टेक्सॉनॉमी’ सुरू करण्यास मान्यता दिली आहे. ‘यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट’मध्ये चालणारे एमएसडब्ल्यू आणि ‘मास्टर ऑफ रुरल स्टडिज’चे अभ्यासक्रम, शासकीय तंत्रनिकेतनमधील तसा पहिलाच पदवीचा अभ्यासक्रम ठरलेला मेटलर्जी विषयातील बी. एस्सीचा अभ्यासक्रम, संगीत व नाटय़शास्त्र विभागामधील वाद्यसंगीताच्या क्षेत्रातील पदविका, संख्याशास्त्र विभागामधील ‘अप्लाइड स्टॅटेस्टिक्स अँड इन्फर्मेटिक्स’मधील पदवी, भूगोल विभागाचा जिओइन्फर्मेटिक्स तसेच ‘ट्रॅव्हल अँड टुरिझम’मधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम, भगवान महावीर अध्यासनामध्ये चालणारे जैनालॉजी अँड प्राकृत विषयामधील पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे या विद्यापीठातील काही वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रम ठरतात.

विदेशी भाषा विभागामध्ये रशियन, जर्मन आणि जपानी भाषेतील पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालतात. वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागामध्ये बीजेसी, एमजेसी, एम. फिल आणि पीएच.डी. अभ्यासक्रमांच्या सुविधा उपलब्ध आहेत. बायोकेमिस्ट्री विभागामध्ये ‘पर्यावरण जैवतंत्रज्ञान’ विषयामधील पदव्युत्तर पदवी, पीजी डिप्लोमा इन बायोइन्फर्मेटिक्स, कृषी रसायने व कीड व्यवस्थापन विभागामधील एम. एस्सी, अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विषयामधील एम. एस्सी, स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नोलॉजी विभागामध्ये उपलब्ध असणारे बी. एस्सी आणि एम. एस्सीचे अभ्यासक्रम हे या विद्यापीठातील आणखी काही महत्त्वाचे अभ्यासक्रम ठरतात. २००६ साली स्थापन झालेल्या तंत्रज्ञान विभागामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी आणि एम. टेकचे वेगवेगळे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांव्यतिरिक्त पारंपरिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्याची सुविधाही विद्यापीठाने सुरुवातीपासूनच उपलब्ध करून दिली आहे. दूरशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाने सुरू केलेल्या बीए, बी. कॉम, एम. ए, एम. कॉम, एम. एस्सी गणित, मास्टर ऑफ व्हॅल्युएशन रिअल इस्टेट, एम. बी. ए., पी. जी. डिप्लोमा इन ट्रान्सलेशन आदी अभ्यासक्रमांना दरवर्षी विद्यार्थी हजारोंच्या संख्येने नोंदणी करत आहेत.

छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास संशोधन केंद्र, गांधी अभ्यास केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र, नेहरू अभ्यास केंद्र, स्त्री अभ्यास केंद्र आदी केंद्रांवरून नानाविध विषयांमधील संशोधने आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी पोषक अशा उपक्रमांसाठीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा सर्वच सुविधा विद्यार्थ्यांसाठी तितक्याच महत्त्वाच्या ठरत आहेत.

योगेश बोराटे – borateys@gmail.com

First Published on February 6, 2018 1:30 am

Web Title: educational training in shivaji university in kolhapur