बांधकाम क्षेत्र आज तसे नियोजनबद्ध नाही, पण तंत्रज्ञानामधील वेगाने होणारी प्रगती, आधीच्या मानाने मिळणारे कुशल कामगार, घरे आणि पायाभूत सुविधांसाठी वाढणारी मागणी यामुळे ही परिस्थिती वेगाने बदलत आहे आणि हे क्षेत्र व्यावसायिक होत आहे. या क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची गरज असल्याने या क्षेत्रातल्या संधी वाढत आहेत.

भारत, २०२५ पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची बांधकाम बाजारपेठ होईल असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. हे सर्वेक्षण ऑक्सफर्ड इकोनोमिक्स आणि ग्लोबल कन्स्ट्रक्शन पस्र्पेक्टिव यांनी संयुक्तपणे केले आहे.
‘भारताला दर वर्षी १० लाख प्रोजेक्ट मॅनेजमेंट (प्रकल्प मॅनेजर)ची कमतरता भासत आहे’, असे अ‍ॅसोचेमचे सर्वेक्षण म्हणते.
भारताच्या १२ व्या पंचवार्षिक योजनेनुसार, १ ट्रीलियन डॉलर एवढी गुंतवणूक पायाभूत सुविधांमध्ये हवी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे त्यातील ५० टक्के गुंतवणूक खासगी क्षेत्राकडून अपेक्षित आहे.
वरील तीन बातम्या असे सुचवितात की बांधकाम क्षेत्र हे खूप मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे पण या क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची कमतरतासुद्धा भासणार आहे. विशेषत: कन्स्ट्रक्शन बिझिनेस मॅनेजमेंटमधील मनुष्यबळाची.
बांधकाम क्षेत्र आज तसे नियोजनबद्ध नाही, पण तंत्रज्ञानामधील वेगाने होणारी प्रगती, आधीच्या मानाने मिळणारे कुशल कामगार, घरे आणि पायाभूत सुविधांसाठी वाढणारी मागणी यामुळे ही परिस्थिती वेगाने बदलत आहे आणि हे क्षेत्र व्यावसायिक होत आहे. पण तरीसुद्धा कन्स्ट्रक्शन बिझिनेस मॅनेजमेंट किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट ही कौशल्ये खूप कमी प्रमाणावर दिसतात. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) नेसुद्धा या क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याचे स्पष्ट केले आहे.
आता बांधकाम क्षेत्र म्हणजे फक्त घरे आणि रस्ते नाहीत. यात विमानतळ, ऊर्जा प्रकल्प, द्रुतगती मार्ग बांधणी यांचासुद्धा समावेश होतो आणि म्हणून याचा पसारा खूप अवाढव्य असून तो दर वर्षी वाढत आहे. शेती हे पहिल्या क्रमांकाचे तर बांधकाम क्षेत्र हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात अधिक नोकरीच्या संधी देणारे क्षेत्र आहे.
५० टक्के गुंतवणूक खासगी क्षेत्राकडून अपेक्षित आहे असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा याचा अर्थ असा आहे की खासगी क्षेत्रामध्ये नोकरीच्या आणि करिअरच्या संधी खूप मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होत आहेत आणि बांधकाम उद्योगसुद्धा वेगाने पसरत आणि मोठा होत आहे.
या क्षेत्रासाठी सिव्हिल, मेकॅनिकल इंजिनीअर आणि आर्किटेक्ट यांची खूप मोठय़ा प्रमाणावर मागणी वाढत आहे आणि या क्षेत्रात खूप चांगले करिअर करता येऊ शकते. पण या इंजिनीअर आणि आर्किटेक्टना नुसत्या बांधकामविषयक तांत्रिक ज्ञानाबरोबरच कन्स्ट्रक्शन बिझिनेस मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटची कौशल्ये असणे अपेक्षित आहे. अपुरे प्रकल्प, अपुरे किंवा चुकीचे नियोजन, विलंबित प्रकल्प अशा गोष्टी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट नसल्यामुळे घडत आहेत.
आज सिव्हिल, मेकॅनिकल इंजिनीअर आणि आर्किटेक्ट यांनी कन्स्ट्रक्शन बिझिनेस मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांना कोणताही प्रकल्प नियोजनबद्ध आणि मर्यादित कालावधीत आणि मर्यादित निधीमध्ये पूर्ण करता येऊ शकेल. या प्रकारचे शिक्षण घेतल्यास त्यांना साइट इंजिनीअर किंवा फक्त डिझाइन आर्किटेक्ट न राहता प्रोजेक्ट मॅनेजर कमी कालावधीत होणे शक्य आहे.
प्लानिंग, प्रोक्युर्मेट, सुपरव्हिजन, कॉस्ट कंट्रोल, क्वालिटी कंट्रोल इत्यादी गोष्टी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये असतात. पण याही पुढे जाऊन प्रोजेक्ट फायनान्स, प्रोजेक्ट बिझिनेस डेव्हलपमेंट, या बिझिनेस मॅनेजमेंटच्या गोष्टी जर सिव्हिल, मेकॅनिकल इंजिनीअर आणि आर्किटेक्ट शिकले तर त्यांना कंपनीच्या मॅनेजमेंट केडरमध्ये करिअर करता येऊ शकते. त्यांना आता वरील सर्व गोष्टी शिकविणारे पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेऊन त्यांचे ‘करिअर अपग्रेड’ करण्याची वेळ आली आहे.
डॉ. आनंद अ. वाडदेकर