आजच्या प्रस्तुत लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील सुरक्षा या घटकाची परीक्षाभिमुख र्सवकष तयारी कशी करावी, याची चर्चा करणार आहोत. सुरक्षा या विषयाची व्याप्ती मोठी आहे. भारताला बाह्य़ व अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. बाह्य़ सुरक्षा म्हणजे परकीय राष्ट्रांकडून केल्या जाणाऱ्या आक्रमणापासून सुरक्षा करणे होय व अंतर्गत सुरक्षा म्हणजे देशाच्या सीमाअंतर्गत असणारी सुरक्षा ज्यामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था व देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवणे इत्यादी येते. भारतात अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृह मंत्रालयावर आहे आणि बाह्य़ सुरक्षेची जबाबदारी संरक्षण मंत्रालयावर आहे.
दीर्घकालापासून जम्मू आणि काश्मीर हे राज्य दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांनी ग्रासलेले आहे, तसेच ईशान्येकडील राज्ये घुसखोरी व वांशिक चळवळी, संघटित गन्हेगारी, सीमेपलीकडून अवैधरीत्या होणारी नशिल्या पदार्थाची तस्करी इत्यादी समस्यांनी प्रभावित झालेली आहेत. सद्य:स्थितीमध्ये दहशतवाद आणि दहशतवादी कारवाया देशाच्या अनेक राज्यांमध्ये घडत आहेत. धार्मिक दंगे, भाषिक वाद, राज्य-राज्य अंतर्गत असणारे वाद, नवीन तंत्रज्ञान अर्थात मोबाइल, इंटरनेट, सोशल नेटवìकग साइट्स यामुळे एखादी विशिष्ट द्वेषपूर्ण विचारसरणीचा प्रसार करणे यासारख्या घटना घडत आहेत. या आव्हानात्मक समस्या देशात असणाऱ्या विविधतेतील एकता आणि अखंडतेला बाधा पोहचवत आहेत, ज्यामुळे सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे.
सर्वप्रथम आपण सुरक्षा या घटकाचा थोडक्यात आढावा घेऊ. सुरक्षा या घटकामध्ये भारताच्या बाह्य़ आणि अंतर्गत सुरक्षेसंबंधी मुद्दय़ाचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये डाव्या विचारसरणीचा दहशतवाद अर्थात नक्षलवाद.
सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, दहशतवाद, वाढता प्रादेशिकवाद, पूर्वेकडील राज्यांमध्ये होणारी घुसखोरी व वांशिक चळवळी, जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, आंतरराष्ट्रीय सीमांसंबंधी असणारे वादविवाद, संघटित गुन्हेगारी, अवैध पसा हस्तांतरण, सीमाभागातील नशिल्या पदार्थाची तस्करी आणि याचे असणारे संघटित स्वरूप, सततचे होणारे भाषिक वाद, राज्य-राज्य अंतर्गत असणारे वाद, धार्मिक दंगे, सायबर सुरक्षेसंबंधित मूलभूत माहिती, माध्यमे आणि सोशल नेटवìकग साइट्स याचा होणारा वापर ज्याद्वारे देशातील सामाजिक सलोख्याला निर्माण होणारा धोका, सुरक्षिततेला निर्माण होणारे आव्हान इत्यादी बाबी आणि या आव्हानांना सामोरे जाताना भारत सरकारने आखलेली रणनीती ज्यामध्ये सीमा सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक सक्षमरीत्या राबविणे, सीमेलगतच्या भागाचा विकास घडवून आणणे, याचबरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश होतो. तसेच देशाची बाह्य़ आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सरकारमार्फत स्थापन करण्यात आलेल्या विविध सरकारी संस्था आणि संघटना व त्यांना नेमून दिलेले कार्य याचबरोबर सरकारमार्फत वेळोवेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना व कायदे यांची माहिती असणे आवश्यक आहे.
मागील ३ मुख्य परीक्षांमध्ये या घटकांवर २०१३ मध्ये ५, २०१४ मध्ये ५ आणि २०१५ मध्ये ४ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यातील काही प्रश्नांची चर्चा आपण करणार आहोत. ज्यामुळे या घटकाची अधिक सखोल तयारी करण्यासाठी मदत होईल व यापुढे होणाऱ्या परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अंदाज येईल.
२०१३ मुख्य परीक्षा
अवैध पसा हस्तांतरण देशाच्या आíथक सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी एक धोका आहे. भारतासाठी याचे महत्त्व काय आहे आणि या धोक्यापासून वाचण्यासाठी कोणती पावले उचलणे आवश्यक आहे?
सोशल नेटवर्किंग साइट्स काय आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने या साइट्सचे कोणते परिणाम होऊ शकतात?
२०१४ मुख्य परीक्षा
चीन आणि पाकिस्तानने आर्थिक मार्गिका विकसित करण्यासाठी एक करार केलेला आहे. यामुळे भारताच्या सुरक्षेला कोणता धोका आहे? समीक्षात्मक चर्चा करा.
‘‘भारताचे बहुधार्मिक आणि बहुवांशिक विविधतापूर्ण समाजस्वरूप हे शेजारी देशांमध्ये पाहावयास मिळणाऱ्या मूलतत्त्ववादी प्रभावापासून मुक्त नाही.’’ यासारख्या वातावरणाचा प्रतिकार करण्यासाठी अवलंबण्यात येणाऱ्या रणनीतीसह चर्चा करा.
२०१५ मुख्य परीक्षा
डिजिटल मीडिया यासारख्या माध्यमातून धार्मिक उपदेशाच्या परिणामस्वरूप भारतीय युवक आई.एस. आई.एस (ISIS) मध्ये सहभागी होत आहेत. आई.एस.आई.एस. (ISIS) काय आहे आणि याचे ध्येय काय आहे? आई.एस.आई.एस. (ISIS) हे आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला कशा प्रकारे धोका पोहोचवू शकते?
सायबर स्पेसमुळे देशाच्या सुरक्षेला कसा धोका पोहचू शकतो, हे लक्षात घेऊन भारताला अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांना प्रतिबंधित करण्यासाठी एका ‘डिजिटल सशस्त्र दल’ची आवश्यकता आहे. २०१३ च्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यामध्ये रूपरेषित करण्यात आलेल्या आव्हानांचे समीक्षात्मक मूल्यांकन करा.
या प्रश्नांवरून आपणाला असे दिसून येते की या घटकाचे मूलभूत ज्ञान आपणाला आधी व्यवस्थित समजून घ्यावे लागणार आहे. कारण प्रश्नामध्ये मूलभूत ज्ञानासह चालू घडामोडींचा आधार घेतला गेलेला आहे. अवैध पसा हस्तांतरण, सोशल नेटवìकग साइट्स, बहुधार्मिक व बहुवांशिक विविधता आणि मूलतत्त्ववाद, डिजिटल मीडिया, धार्मिक उपदेश, आई.एस. आई.एस. (ISIS), सायबरस्पेस आणि राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण-२०१३ इत्यादीची सखोल माहिती असणे गरजेचे आहे, तसेच या माहितीची चालू घडामोडींशी सांगड घालून विश्लेषणात्मक तसेच समीक्षात्मक आकलन केल्याशिवाय प्रश्नाचे योग्य आकलन करता येत नाही. यावरून असे समजते की, सुरक्षा या घटकाची तयारी करताना देशाच्या अंतर्गत आणि बाह्य़ सुरक्षेच्या समोर नेमकी कोणती आव्हाने आहेत, यापासून देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला नेमका कोणता धोका आहे, या आव्हानांना यशस्वीरीत्या परतवून लावण्यासाठी सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत इत्यादी बाबींचा एकत्रितपणे विचार करून या घटकाची तयारी करणे अपेक्षित आहे.
या घटकाची तयारी करण्यासाठी कोणते संदर्भ वापरावेत याचा आढावा आपण घेऊ. या घटकावर नोट्स स्वरूपातील अनेक गाइड्स उपलब्ध आहेत, ज्याद्वारे या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासता येते, तसेच याच्या जोडीला दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा कमिशनचे दहशतवाद आणि नक्षलवाद यावरचे रिपोर्ट पाहावेत, या घटकांशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजी दैनिके, योजना आणि वर्ल्ड फोकस ही मासिके आणि परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, कऊरअ  यांच्या वेबसाइट्सचा वापर करावा. या पुढील लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर चारचा आढावा घेणार आहोत.
(लेखांक – १२)