*   मी एका खासगी कंपनीत प्रोसेस इंजिनीअरिंग-मेकॅनिकल काम करीत आहे. मला साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ही परीक्षा द्यायची आहे. त्याचा अभ्यासक्रम, साहित्य आणि नियोजनाविषयी माहिती द्याल का?

– राहुल धनवडे

राहुल, मोटार वाहन साहाय्यक निरीक्षक या पदाच्या भरतीसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतली जाते. पूर्वपरीक्षेचा पेपर १०० गुणांचा असतो. यामध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीचे बहुपर्यायी १०० प्रश्न विचारले जातात. यासाठी एक तासाचा वेळ दिलेला असतो. यामध्ये सामान्य अध्ययन आणि बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न हे शालास्तरीय पातळीवरील असतात. तर यंत्र अभियांत्रिकी, स्वयंचलन अभियांत्रिकी व चालू घडामोडीसंदर्भातील प्रश्न हे पदवीस्तरीय असतात. या परीक्षेत विशिष्ट गुण मिळवलेल्या उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेसाठी केली जाते.

मुख्य परीक्षेचा पेपरही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचा असतो. हा पेपर यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचलन अभियांत्रिकी या विषयावर आधारित असून त्याचा दर्जा पदवीस्तरीय असतो. तो तीन भागांत विभाजित केलेला असतो. यासाठी कालावधी- दीड तास. एकूण प्रश्न-१५०, एकूण गुण- ३००.

भाग एकमध्ये मेकॅनिकल आणि ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगच्या विषयांवर २४० गुणांचे १२० प्रश्न विचारले जातात. भाग दोनमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या विषयांवर ६० गुणांचे ३० प्रश्न विचारले जातात. भाग तीनमध्ये ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगच्या विषयांवर ६० गुणांचे ३० प्रश्न विचारले जातात. यापैकी भाग एक हा सर्व उमेदवारांना सोडवणे आवश्यक आहे. भाग दोन किंवा तीनपैकी कोणताही एक भाग सोडवता येऊ  शकतो. पहिल्या भागात स्ट्रेंग्थ ऑफ मटेरिअल, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, थिअरी ऑफ मशीन, हायड्रॉलिक्स, थर्मल इंजिनीअरिंग, ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग, इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स या विषयांवर प्रश्न विचारले जातात. दुसऱ्या भागात  हायड्रॉलिक मशिनरी, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग या विषयांवर प्रश्न विचारले जातात. तिसऱ्या भागात ऑटोमोबाइल सिस्टिम, व्हेइकल मेंटेनन्स, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट या विषयांवर प्रश्न विचारले जातात.

या परीक्षेच्या अभ्यासासाठी राहुल तुम्ही तुमचा पदवीस्तरीय अभ्यासक्रम नव्याने अभ्यासावा. संकल्पना स्पष्ट कराव्यात. कारण हा पेपर वस्तुनिष्ठ पद्धतीचा असल्याने त्यात गती आणि अचूकता आवश्यक असते. अशा वेळी संकल्पना स्पष्ट नसतील तर प्रश्न सोडवणे कठीण जाऊ  शकते. सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमासाठी नियमित वृत्तपत्रीय वाचन आणि बाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या दर्जेदार पुस्तकांचा वापर करावा.

*    मी सध्या १०वीमध्ये आहे. मला आर्टिफिशिअल इंटेलिजिन्स रोबोटिक वर्क या क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे. याबद्दल मला अधिक माहिती द्यावी. मला किती फी लागेल?

– गौरव तापी

गौरव तू सध्या तुझ्या १०वीच्या परीक्षेवर लक्ष दे. शिवाय १२वीवरही लक्ष ठेव. विशेषकरून गणित आणि भौतिकशास्त्राचा पाया मजबूत कर. १२वीनंतर तू चांगल्या दर्जेदार संस्थेतील इलेक्ट्रॉनिक्स/संगणकशास्त्र या विषयांत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न कर. या अभ्यासक्रमाच्या दरम्यान तुला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि रोबोटिक सायन्सची ओळख होईल आणि त्या विषयात तुला पुढे जाता येईल.