मी बहि:शाल पद्धतीने बी.कॉम करीत आहे. मला एमएसडब्ल्यू- मास्टर इन सोशल वर्क करायचे आहे.  मी बहि:शाल पद्धतीने शिक्षण घेऊ की नियमीत महाविद्यालयीन शिक्षण? अधिक संधी कोणत्या पद्धतीत आहेत? मी पुण्यात नोकरी करते. नियमीत शिक्षण घ्यायचे झाल्यास ती सोडावी लागेल.  मी काय करावे?

पूनम करनगुटकर

सध्या परिस्थितीच अशी आहे की, या स्पर्धेच्या काळात कोणताही अभ्यासक्रम केल्यानंतर दाराशी नोकरीच्या संधी चालून येतील, असे संभवत नाही. ती मिळूही शकते, पण त्याची खात्री देता येत नाही. प्रत्येक अभ्यासक्रम करणारे शेकडो विद्यार्थी असतात पण त्याच्याशी संबंधित संधी मात्र अल्प प्रमाणात असतात. शिवाय अशा संधींच्या जाहिराती सातत्याने प्रकाशित होतीलच, असंही नाही. त्यामुळे त्यांची माहिती मिळवण्यासाठी मित्रमंडळी, सहकारी, नातेवाईक यांचे नेटवर्किंग वाढवावे लागेल. नोकरीविषयक विविध संकेतस्थळांना सतत भेट देणे गरजेचे आहे. एखादा अभ्यासक्रम बहि:शाल करता की नियमित याहीपेक्षा तुम्ही त्या अभ्यासक्रमात नेमके काय शिकता, किती ज्ञान ग्रहण करता आणि त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग कसा करू शकता, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सध्या इंटरनेटमुळे विविध अभ्यासक्रम घरबसल्या करणे शक्य झाले आहे. विविध शैक्षणिक संस्थाही दूरस्थ पद्धतीने अभ्यासक्रम करण्याची सोय उपलब्ध करून देतात. तेव्हा अभ्यासक्रमास प्रवेश घेणे सोपे आणि सुलभ झाले आहे. तुला नोकरी सोडायची नसल्याने बहि:शाल पद्धतीनेच कोणताही अभ्यासक्रम करणे उपयुक्त ठरू शकेल.

मी २००६ मध्ये बारावी झालो आहे. मला ५२% मिळाले होते. त्यानंतर मी र्मचट नेव्हीमध्ये गेलो, पण या वर्षी मला अपघात झाल्याने जहाजावर काम करणे शक्य नाही. मला आता पुण्यातील डी. वाय. पाटील विद्यापीठातून जैवतंत्रज्ञान विषयात बीटेक करायचे आहे. हा अभ्यासक्रम केल्यानंतर पुढे काय संधी आहेत? हे महाविद्यालय नामांकित आहे का?

मनीष रामुगडे

जैवतंत्रज्ञान हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याचा अभ्यास करणाऱ्यास नक्कीच चांगल्या संधी मिळू शकतात. सध्या या विषयाला आपल्या देशात आणि इतरत्रही खूप महत्त्व मिळते आहे. परंतु तुम्ही या विषयातील ज्ञान कशा प्रकारे ग्रहण करता हे महत्त्वाचे आहे. तुम्ही नमूद केलेल्या संस्थेतून जैवतंत्रज्ञान विषयातील अभ्यासक्रम करण्यास काहीच हरकत नाही. याच विषयात पदव्युत्तर पदवी आणि संशोधन केल्यास अधिक चांगल्या संधी मिळू शकतात.

( तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.)