*  मी यंदा अकरावीला आहे. मला अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे आहे. बारावीनंतर जेईईची परीक्षा द्यायची आहे. त्यासाठी मी कोणती पुस्तके वाचायला पाहिजे? मी जर ऑनलाइन कोचिंग घेतले तर काय होईल? कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग आणि आयटी यापैकी कोणत्या शाखांना अधिक वाव आहे? जेईई सोडून आणखी कोणत्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आहेत ? – रिया सदावर्ते

जेईई परीक्षेचे पेपर्स हे अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांवरच आधारित असतात. त्यामुळे तू तुझ्या बोर्डाची (सीबीएसई किंवा महाराष्ट्र बोर्ड) क्रमिक पुस्तके समजून उमजून अभ्यासलीस तर तुला ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे कठीण नाही. ऑनलाइन कोचिंगचा फायदा प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी होऊ  शकतो. त्यामुळे तू असे कोचिंग घेऊ शकतेस. मागील दोन वर्षांप्रमाणेच यंदा आयआयटीमध्ये प्रवेश मिळालेल्या आणि सर्वोच्च गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतला आहे. ही बाब लक्षात घेता या शाखेस अधिक महत्त्व आहे हे लक्षात येते. जेईई परीक्षेशिवाय अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या इतर परीक्षा –

(१) वेल्लोर इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग- व्हीआयटीईईई –  http://www.vit.ac.in/ admissions/viteee

(२) अमृता इंजिनीअरिंग एन्ट्रन्स एक्झामिनेशन- http://www.amrita.edu

(३) बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी- बिटसॅट-  http://www.bitsadmission.com

(४) एसआरएम इंजिनीअरिंग – एसआरएमजेईई- http://www.srmuniv.ac.in

(५) मणिपाल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी-एमयू-ओईटी manipal.edu/mu/admission

(६) युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी स्टडीज इंजिनीअरिंग टेस्ट

http://www.upes.ac.in/

* मी बीए केले आहे. मला एमबीएला प्रवेश घ्यायचा आहे, पण मला वाटतं आहे की, मला एमबीए अवघड जाईल. मी काय करावे? – सागर सोनवणे

तुझ्या प्रश्नातच उत्तरही दडलेले आहे. एमबीए अवघड जाईल असे मनापासून वाटत असेल तर हा अभ्यासक्रम करू नये असे सुचवावेसे वाटते. तथापि वाटणे आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी असू शकते. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण संस्थेमधून एमबीए केल्यास उत्तमोत्तम करिअर संधी मिळू शकतात. मात्र त्यासाठी तुम्हाला एमएच सीईटी, सीएटी, सीमॅट, एनमॅट, झॅट, स्पॅन यांसारख्या चाळणी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. या परीक्षांमध्ये गणितीय संकल्पनांवर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. त्याशिवाय इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व किंवा कौशल्य जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे गणित आणि इंग्रजी विषयाच्या संकल्पना स्पष्ट असलेले विद्यार्थी या परीक्षा चांगल्या रीतीने उत्तीर्ण होतात. तुझी तशी तयारी आहे का, हे स्वत:ला प्रामाणिकपणे विचार आणि एमबीए अवघड जाईल किंवा नाही याचा निर्णय घे.