*  मी आता १२वी विज्ञान शाखेत गणित विषय घेतला आहे. मला हॉटेल मॅनेजमेंट करायचे आहे. त्यासाठी मला १२वीनंतर काय करावे लागेल. कोणत्या प्रवेश परीक्षा द्यावी लागतील?                 – हर्षल शेटे

(१) भारत सरकारअंतर्गत कार्यरत असणाऱ्या  हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जाते. या संस्थांमधील प्रवेशासाठी नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत देशपातळीवर बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते. या परीक्षेद्वारे भारत सरकारच्या २१ संस्था, २० विविध राज्य शासनांमार्फत चालवण्यात येणाऱ्या संस्था आणि १५ नामवंत खासगी संस्थांमध्ये मिळून आठ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ डिसेंबर २०१६ रोजी सुरू झाली आहे.  १४ एप्रिल २०१७ पर्यंत अर्ज भरता येईल. २८ एप्रिल २०१७ रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर ही केंद्रे आहेत. हा अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी देशविदेशातील हॉटेल उद्योगामध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. यामध्ये रिसॉर्ट व्यवस्थापक, हॉटेल आणि संबंधित उद्योगात व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी, बहुराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी कंपन्यांमध्ये व्यवस्थापक, प्रारंभीच्या प्रशिक्षणानंतर मोठय़ा हॉटेल समूहांमध्ये किचन व्यवस्थापक, हाऊसकिपिंग व्यवस्थापक, राज्य पर्यटन विकास महामंडळात विविध संधी, विमानसेवेतील फ्लाइट किचन आणि विमानांतर्गत सेवा, रेल्वे आतिथ्य आणि खानपान सेवा, भारतीय नौसेना आतिथ्य सेवा, हॉटेल व्यवसाय आणि इतर सेवा क्षेत्रातील विक्री व विपणन अधिकारी, हॉटेल व्यवसाय आणि इतर सेवा क्षेत्रासाठी आवश्यक ग्राहकसेवा एक्झिक्युटिव्ह, प्रवासी जहाजांवरील खानपान व आतिथ्य सेवा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फास्टफूड साखळी उद्योगासाठी आवश्यक व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी आणि एक्झिक्युटिव्ह, रुग्णालये आणि मोठय़ा कॉर्पोरेट संस्थांमधील आतिथ्य व खानपान सेवा आदींचा ठळकरीत्या उल्लेख करावा लागेल.

संपर्क – नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी, ए-३४, सेक्टर-६२, नॉयडा-२०१३०९,

संकेतस्थळ- http://www.nchm.nic.in/

(२) महाराष्ट्रातील खासगी व शासकीय संस्थांमध्ये हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी हा चार र्वष कालावधीचा अभ्यासक्रम चालवण्यात येतो.

अर्हता- या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांने कोणत्याही शाखेतील (कला/वाणिज्य/विज्ञान/कृषी/एमसीव्हीसी) १२वी परीक्षा ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमाती या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणांची मर्यादा ४० टक्के. या विद्यार्थ्यांने १२वीमध्ये इंग्रजी हा विषय घेतलेला असावा. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनामार्फत एमएएच-एम-एच सीईटी ही चाळणी परीक्षा घेतली जाते. राज्यातील खासगी संस्था आणि शासकीय संस्थांमध्ये या परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com