News Flash

करिअरमंत्र : कोणती परदेशी भाषा शिकू?

यूपीएस्सीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यास कोणताही परिणाम होणार नाही हे तर उघडच आहे.

मी सध्या बँकेत नोकरी करत आहे. मला माझे उत्पन्न वाढवण्यासाठी दुसऱ्या एखाद्या उत्पन्नाच्या स्रोताची निर्मिती करायची आहे. मी जर एखादी परदेशी भाषा शिकलो तर मला अशी संधी मिळू शकेल काय? कोणती परदेशी भाषा शिकणे उत्तम राहील ?  – मयूर म्हात्रे

परदेशी भाषा शिकून उत्पन्न निर्मितीचे दुसरे साधन उपलब्ध होऊ  शकते. जॅपनीज, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, अरेबिक, मँडिरिन (चिनी) अशा भाषांना सध्या चांगली मागणी आहे. दुभाषा, भाषांतर, अहवाल लेखन, पर्यटन गाइड अशा क्षेत्रात पर्यायी करिअर करता येऊ  शकेल. मात्र जी कोणती भाषा शिकाल त्यात लिहिण्या-बोलण्याचे कौशल्य प्राप्त करणे गरजेचे आहे. ही सेवा असून ती तुम्ही किती उत्कृष्ट पद्धतीने देऊ  शकता यावर तुमचे उत्पन्न अवलंबून राहील. इंग्रजी हीसुद्धा परदेशी भाषाच आहे. त्यावर उत्तम प्रभूत्व मिळवल्यास तुला तुझ्याच्या बँकेत आणखी चांगली संधी मिळू शकते.

माझे बी.कॉम झाले आहे. मला यूपीएस्सी करायची आहे. मला एम.कॉम करायचे नाही. मी फक्त यूपीएस्सीची तयारी केली आहे. त्याचा माझ्या पुढील करिअरवर काही परिणाम होऊ  शकतो का ? – सोपान अरसुले

यूपीएस्सीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यास कोणताही परिणाम होणार नाही हे तर उघडच आहे. एम.कॉम करून ठेवल्यास तुला भविष्यात अध्यापनाच्या क्षेत्रात जाता येऊ  शकेल. प्लॅन बी म्हणून एम.कॉम करायला काहीच हरकत नाही. शिवाय यूपीएसस्सीची तयारी करत असताना एम.कॉमसुद्धा करता येऊ शकेल.

मी सध्या एम.पी.एस्सीची तयारी करत आहे. मी प्रथम श्रेणीसह अभियांत्रिकी पदवीधर आणि गेट  (GATE) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मला आता अभियांत्रिकी करिअरऐवजी एमपीएस्सी करिअर करावे वाटते. सध्या माझा खूप गोंधळ उडाला आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

– विनय नगराळे

तुला अभियांत्रिकी अभ्यासक्रमात मनापासून रस वाटत नसेल तर एमपीएस्सीच्या मार्गाने प्रशासकीय करिअर करण्यास काहीच हरकत नाही. मात्र एमपीएस्सीद्वारे अधिकारी संवर्गासाठी घेण्यात येणारी परीक्षा अतिशय कठीण असते. साधारणत: १ ते दीड लाख उमेदवारांमध्ये १००च्या आसपास उमेदवार विविध पदांसाठी निवडले जातात. त्यामुळे प्लॅन बी तयार ठेवलेला बरा. त्यासाठी तुझी अभियांत्रिकीमधील पदवी उपयुक्त ठरू शकते.

मी बी.कॉमच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. मला आयटी क्षेत्रात जायचे आहे. त्यासाठी मी संगणकीय भाषासुद्धा शिकते आहे.  मला त्या क्षेत्रात जायला आवडेल. मी त्या क्षेत्रात करिअर करू शकेन का ? – सुप्रिया ठाकूर

तुला संगणकीय क्षेत्राची मनापासून आवड असल्याचे स्पष्ट झाल्याने तू या क्षेत्रात निश्चितच प्रगती करू शकशील. कॉमर्स विषयाशी संबंधित विविध संगणकीय अभ्यासक्रम सध्या सुरू झालेले आहेत. ते केल्यास तुला या क्षेत्रात चांगले करिअर करता येणे शक्य आहे.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 1:05 am

Web Title: expert tips for career guidance
Next Stories
1 करिअरनीती : नोकरीतले करिअर
2 नोकरीची संधी
3 व्यायामातून शोधा व्यवसाय
Just Now!
X