नॉर्वेमधील प्रसिद्ध ऑस्लो विद्यापीठाच्या  जैवशास्त्र विभागातर्फे ‘पर्यावरण’ या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. करण्यासाठी पाठय़वृत्ती दिली जाते. पाठय़वृत्तीचा कालावधी तीन वर्षांचा आहे. २०१६ वर्षांकरता दिल्या जाणाऱ्या या पाठय़वृत्तीसाठी विद्यापीठाकडून ८ ऑक्टोबर २०१५ पूर्वी अर्ज मागविण्यात आले आहेत.
पाठय़वृत्तीविषयी..
ऑस्लो विद्यापीठ (द युनिव्हर्सटिी ऑफ ऑस्लो) हे जागतिक स्तरावर नावलौकिक असलेले नॉर्वेतील प्रख्यात व सर्वात मोठे विद्यापीठ आहे. शिक्षण व संशोधन क्षेत्रातील जगातल्या मोजक्या उत्कृष्ट केंद्रांपकी एक असलेले हे विद्यापीठ, विविध विद्याशाखांची उपलब्धता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा संशोधन समुदाय याकरता जगभरातील विद्यार्थ्यांचा आणि संशोधकांचा आकर्षणबिंदू राहिले आहे. सुमारे २८ हजार विद्यार्थी व सात हजार कर्मचारी विद्यापीठाची व्यापकता संख्यात्मक पद्धतीनेही अधोरेखित करतात.
विद्यापीठाच्या बायोसायन्सेस विभागापकी सेंटर ऑफ इकॉलॉजिकल अ‍ॅण्ड इव्हॉल्यूशनरी सिंथेसिस (CEES) या केंद्रामध्ये इकॉलॉजी या विषयातील रीसर्च फेलो हे पद रिक्त आहे. या पदाच्या माध्यमातून पाठय़वृत्तिधारकाला त्याचे पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करता येणार आहे. पीएच.डी. कार्यक्रमासह या पदाचा किंवा पाठय़वृत्तीचा एकूण कालावधी तीन वर्षांचा असेल. पाठय़वृत्तीअंतर्गत या तीन वर्षांदरम्यान संशोधनाच्या या कालावधीकरता पाठय़वृत्तिधारकाला वार्षकि ४,२९,७०० ते ४,८२,८०० नॉर्वेजियन क्रोन्स म्हणजे साधारणत: वार्षकि ३५ लाख ते ४० लाख इतका उत्तम भत्ता मिळू शकतो. याव्यतिरिक्त पाठय़वृत्तिअंतर्गत पाठय़वृत्तिधारकाला इतर सर्व सोयीसुविधा दिल्या जातील.
आवश्यक अर्हता
ही पाठय़वृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. विद्यापीठाच्या या पाठय़वृत्ती कार्यक्रमांतर्गत पीएच.डी.च्या प्रवेशाकरता व पाठय़वृत्तीसाठी सामान्यपणे पर्यावरण या विषयातील अभ्यासकांना अर्ज करता येईल. या पाठय़वृत्तीसाठीचा अर्जदार संबंधित विषयामधील पदव्युत्तर पदवीधर असावा. त्याने पीएच.डी.साठी इतर कुठेही अर्ज केलेला नसावा. अर्जदाराकडे सांख्यिकी विश्लेषण करण्याची उत्तम क्षमता असावी.  पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्तरावर अर्जदाराचे संशोधन पर्यावरण, सांख्यिकी किंवा संवर्धन जीवशास्त्र विषयक असल्यास तसेच उमेदवाराला व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभव असल्यास उत्तम, पण ती पूर्वअट नाही. एखाद्या संस्थेतील त्या प्रकारच्या संशोधनाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र असावे. अर्जदाराची पदवी-पदव्युत्तर पदवीच्या स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे इंग्रजीवर प्रभुत्व असावे. अर्जदाराने टोफेल किंवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असावे. अर्जदाराचे आरोग्य उत्तम असावे. त्याला या विषयातील कामांची मनापासून आवड असावी. त्याच्याकडे चांगले सहकार्य कौशल्य असावे. सांघिक भावनेने काम करण्याची इच्छा असावी. याबरोबरच अर्जदाराची आंतरविद्याशाखीय वातावरणात काम करण्याची तयारी हवी.
अर्ज प्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या वेबसाइटवर जमा करावा. अर्जामध्ये आपण या पाठय़वृत्तीसाठी कशाप्रकारे योग्य आहोत हे अर्जदाराने क्रमवारीने मांडावे. आपल्या शैक्षणिक व संशोधन पाश्र्वभूमीबद्दल आणि कार्यानुभवाची सविस्तर माहिती देणारे एस.ओ.पी., सी.व्ही., पदवी किंवा पदव्युत्तर अभ्याक्रमात केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन अहवाल, शोधनिबंधाच्या स्वरूपात प्रकाशित केलेले आपले एखादे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय संशोधन, तसेच शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या व शिफारस देऊ शकणाऱ्या तीन प्राध्यापकांचे
अथवा तज्ज्ञांचे ई-मेल, दूरध्वनी क्रमांक, संपूर्ण पत्ता इत्यादी, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, टोफेल किंवा आयईएलटीएसचे गुणांकन, संशोधन अनुभवाचे प्रशस्तिपत्र इत्यादी गोष्टी अर्जदाराने अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
ऑस्लो विद्यापीठाच्या या पाठय़वृत्तीसाठी अर्जदारांच्या निवडप्रक्रियेची काठिण्यपातळी अधिक  असते. अर्जदाराची गुणवत्ता व संशोधनातील आवड लक्षात घेऊन त्याची निवड केली जाते. विद्यापीठाकडे मोठय़ा संख्येने अर्ज येत असल्याने त्यातून योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांची नंतर मुलाखत घेतली जाते आणि शेवटी त्यातून अंतिम निवड निश्चित होते.
अंतिम मुदत
या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ ऑक्टोबर २०१५ आहे.
महत्त्वाचा दुवा
http://uio.easycruit.com
itsprathamesh@gmail.com