वैयक्तिक आयुष्यात काही अवघड प्रसंग येतात, तेव्हा आपण एकटे निर्णय घेऊ  शकत नाही किंवा निर्णय घ्यायला कचरतो. मग समविचारी मित्रांच्या बरोबर सल्लामसलत करून त्यांचा दृष्टिकोन जाणून घेतो. मित्रांच्या शिक्षणामुळे तसेच अनुभवामुळे आपल्या प्रश्नाचे एखादे चांगले उत्तर सापडते का याचा शोध घेतो. तसेच अवघड प्रसंग व्यावसायिक आयुष्यात पण येतात. किंबहुना व्यावसायिक आयुष्यातील अवघड प्रसंगांची तीव्रता तसेच गुंतागुंत वैयक्तिक आयुष्यापेक्षा खूपच मोठय़ा प्रमाणावर असू शकते. एकटय़ा माणसाला अशा प्रसंगी योग्य निर्णय घेणे बऱ्याच वेळेला दुरापास्त होते. अशा वेळी अवलंबण्याचा उत्तम उपाय म्हणजे सहकाऱ्यांना बरोबर घेऊन एखाद्या विषयाचा सखोल ऊहापोह करणे – म्हणजेच विचारमंथन. अनेक सहकाऱ्यांच्या शैक्षणिक व अनुभवांमुळे तयार झालेल्या विविध पाश्र्वभूमींचा लाभ विचारमंथनामध्ये करून घेता येतो.

विचारमंथनाचे फायदे

  • व्यावसायिक प्रश्नांची इतरांबरोबर चर्चा केल्याने मानसिक ताण कमी होतो.
  • सहकाऱ्यांच्या विविध शैक्षणिक व अनुभवांच्या पाश्र्वभूमीमुळे एकच प्रश्नाचा विविध दृष्टिकोनांतून साकल्याने विचार करता येतो.
  • व्यवसायातील विविध प्रश्नांना एकच एक उत्तर नसते. विचारमंथनाने प्रश्नांच्या परिस्थितीनुसार अनेक वैकल्पिक उत्तरे मिळू शकतात.
  • संघभावना दृढ होते.
  • विचारमंथनातून घेतलेला निर्णय हा बऱ्याच वेळा सांघिक निर्णय असल्याने सगळ्या सहकाऱ्यांना पटण्याची शक्यता जास्त असते.
  • सर्जनशीलतेला आणि नव्या कल्पनांना वाव मिळतो.
  • चाकोरीबाहेरचे विचार मुक्तपणे करता येतात.
  • इतरांना तुमच्या विचारांची ओळख होऊन तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविण्याची संधी मिळते.
  • तुमचे कार्यालयातील पहिले वर्ष असल्याने विचारमंथनाच्या एखाद्या बैठकीचे आमंत्रण तुम्हाला मिळाले तर अशा चर्चेत पूर्ण तयारीनीशी सहभागी व्हा. विचारांच्या तर्कशुद्ध मांडणीमुळे तुमचे वेगळेपण वरिष्ठ व सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांच्या निदर्शनास येणार आहे.
  • प्रथम ज्या विषयाबद्दल विचारमंथन करायचे आहे तो विषय सर्वागाने समजून घ्या.
  • वरिष्ठांना प्रश्न विचारून या विचारमंथन बैठकीचा उद्देश काय आहे याचे पूर्णपणे आकलन करा.
  • तुम्ही नोकरीत नवीन आहात, त्यामुळे इतर कुणाला तरी विषयाची सुरुवात करू द्या; म्हणजे तुम्हाला विषय समजायला मदत होईल.
  • एखाद्या सहकाऱ्याच्या दृष्टिकोनाबद्दल शंका निर्माण झाल्यास नि:संकोचपणे प्रतिक्रिया द्या.
  • तथापी, अशा प्रतिक्रिया देताना सहकाऱ्यांसंबंधी कुठल्याही प्रकारची वैयक्तिक टीका करणे कटाक्षाने टाळा.
  • विचारमंथनाच्या चर्चेत नेहमीच विचित्र व चमत्कारिक कल्पना ऐकायला मिळतात. अशा कल्पनांचे किंवा कल्पना मांडणाऱ्या सहकाऱ्याचे चांगले व वाईट मूल्यमापन न करता खुल्या दिलाने ती कल्पना ऐका.
  • एखादी कल्पना विधायक वाटली तर त्यावर विचार करून ती अजून कशी पूर्णत्वास नेता येईल, या दृष्टिकोनातून सूचना मांडा.
  • या सर्व चर्चेत भाग घेताना सहकाऱ्यांनी मांडलेल्या प्रत्येक कल्पनेची वहीत नोंद करा; म्हणजे एकतर द्विरुक्ती टाळता येईल किंवा दुसरे म्हणजे तुम्हाला आवडलेल्या कल्पनेवर सखोल विचार करून अधिक चांगली कल्पना मांडता येईल.
  • तुम्ही मांडलेल्या एखाद्या सूचनेवर किंवा कल्पनेवर जोरदार टीका झाली तरी निराश होऊ नका. तुम्ही विचार करूनच अशी कल्पना मांडली असेल तर तर्कशुद्धतेने उत्तर देऊन तुमचा मुद्दा पटवून द्या.

अशा मुक्त व्यावसायिक विचारमंथनाचे काही तोटेसुद्धा आहेत. सर्वसामान्यपणे विचारमंथन बैठकीसाठी एक समन्वयक नेमण्याची पद्धत आहे. त्याने चर्चा विषय सोडून भरकटणार नाही व चर्चेत भाग घेण्याऱ्या सर्वाना त्यांचे मुद्दे मांडता येतील, याची काळजी सर्वथा घेणे आवश्यक असते.

तरीसुद्धा काही सहकारी आपला मुद्दा मोठमोठय़ाने बोलून पुढे रेटायचा प्रयत्न करतात, वैयक्तिक टीका करतात, तर काही अबोल सहकाऱ्यांना मागे सारून एखाद्या कल्पनेचे श्रेय स्वत:च लाटण्याचा प्रयत्न करतात. अशा रीतीने तुमचा मुद्दा किंवा कल्पना कुणी दडपू नये म्हणून तुम्ही कायम सजग राहून ठामपणे बोलले पाहिजे.

थोडक्यात काय व्यावसायिक विचारमंथनाच्या बैठकीतील सहभाग ही तुमची सर्जनशीलता दाखवायची व व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविण्याची एक उत्तम संधी आहे हे विसरू नका.

dr.jayant.panse@gmail.com