शब्दसंग्रह व वाचनाचा वेग

मागील लेखात म्हटल्याप्रमाणे इंग्रजी भाषेतील किमान आकलन कौशल्य विकसित करण्यासाठी सातत्यपूर्ण वाचन आणि त्याआधारे शब्दसंग्रहात वाढ करणे गरजेचे ठरते. काही वेळा अवगत नसलेल्या शब्दांचे अर्थ संदर्भानुसार लावता येतात. आपला शब्दसाठा वाढावा यासाठी काही युक्त्यांचा वापर करता येतो.

अशाप्रकारे अवघड, माहीत नसलेल्या शब्दांचे अर्थ ओळखण्यासाठी शब्दाआधी येणाऱ्या प्रत्ययांचा अभ्यास असल्यास खूप उपयोग होतो. जसे की, Philanthrope हा वरवर पाहता अवघड वाटणारा शब्द जर प्रत्यय व शब्द अशी उकल करून पाहिला तर त्याचा अर्थ कळणे व लक्षात राहणे सोपे होते. Philanthrope = Phil + anthrope यामध्ये Phil चा अर्थ आवडणे किंवा प्रेम असणे असा आहे. तर anthrope चा अर्थ मानवजात असा आहे. म्हणूनच Philanthrope म्हणजे मानवजातीवर प्रेम असणारा याचप्रमाणे,  Misanthrope (Mis + anthrope) या शब्दात Mis चा अर्थ नावड किंवा द्वेष असणे असा आहे. म्हणून  Misanthrope चा अर्थ मानवजातीचा द्वेष करणारा असा होतो. याच दोन प्रत्ययांवरून बनलेल्या अनेक शब्दांच्या जोडय़ामध्ये आवडनावड अशा छटेचे अर्थ पाहावयास मिळतात. जसे की, Philosopher, Misogynist  इ. विरुद्ध अर्थ असणाऱ्या प्रत्ययांच्या अजून काही जोडय़ा पुढीलप्रमाणे –

– Mal(नकारात्मक परिणाम असणारे) – Malign

– Ben (सकारात्मक परिणाम असणारे) – Benign

– I (च्या आत) – Inject

– E(च्या बाहेर) – Eject

– Pre (आधी)  –  Prepaid

– Post (नंतर)- Postpaid

– Psych (मनाशी संबंधित) – Psychology

– Corp (शरीराशी संबंधित) – Corporeal

– Con (एकत्र येणे)- Confluence

– Dis (विविध दिशांना जाणे) – Discord

इंग्रजी शब्दसंग्रह सुधारण्यासाठी शब्दांचा वेगवेगळ्या प्रकारे विचार करता येतो. मागील लेखात आपण पाहिलेच की शब्दांचे मूळ स्रोत (Origins) लक्षात ठेवणे मदतीचे ठरते. अशा प्रकारे शब्दांवर काम केल्याने खूप प्रमाणात फायदा होतो मात्र यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेतील उताऱ्याच्या आकलनावरील प्रश्नांसाठी ज्या शब्दसंग्रहाची आवश्यकता असते ती केवळ शब्दांचे मूळ स्रोत लक्षात ठेवून भागणार नाही. म्हणूनच वर सांगितल्याप्रमाणे शब्दांना जोडल्या जाणाऱ्या प्रत्ययांचा अभ्यास केल्याने शब्दसंग्रहात वेगाने वाढ होते तसेच शब्दसंग्रह टिकून राहण्यासाठीही मदत होते. इंग्रजी शब्द तयार होत असताना अनेकदा त्यामध्ये खालील रचना बघायला मिळते – prefix + root word + suffix  शब्दाचे हे तीनही भाग अर्थवाही असतात. या सुट्टय़ा भागांचे अर्थ लक्षात ठेवल्यास नवीन शब्दाचे अर्थ आयत्यावेळेस लावून घेणे सहज शक्य होते.

शब्द संग्रहाबरोबरच वाचनाचा वेगही इंग्रजी आकलनाकरता महत्त्वाचा घटक आहे. अनेक वेळा इंग्रजी वाचनास आपल्याला मराठी वाचनापेक्षा जास्त वेळ लागतो. याचे कारण इंग्रजी बद्दलच्या ज्ञानाची कमतरता हे नसून सरावाचा अभाव हे आहे. म्हणूनच इंग्रजी वाचनाचा वेग वाढविण्यासाठी सोप्या, सुटसुटीत इंग्रजीमध्ये उपलब्ध असलेले साहित्य वाचण्याचा सराव हवा. याचाच एक भाग म्हणून वर्तमानपत्रातील सोपे, सुटसुटीत इंग्रजी लेखन वाचण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे. याच प्रक्रियेतून जसा शब्दसंग्रह वाढत जाईल व वाचनाचा वेगही वाढेल तेव्हा अवघड इंग्रजी वाचनाकडे वळण्यास हरकत नाही.

इंग्रजी उताऱ्यांवरील आकलनाचा कोणताही ताण वाटून घेण्याची गरज नाही. अनेक वेळा वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत नसतानादेखील काही प्रश्नांची उत्तरे बरोबर येऊ शकतात. हे पडताळण्याकरता सर्वात आधी उतारा वाचून त्यावरील प्रश्न सोडवावेत व नंतर उताऱ्यांमधील अवघड शब्दांचे अर्थ बघावेत. प्रत्येक अवघड शब्दाचा अर्थ उतारा वाचत असतानाच बघितल्यास, तसे न करता किती प्रश्न बरोबर येऊ शकतात याचा अंदाज येत नाही. असे जरी असले तरी या घटकाची तयारी करत असताना अवघड, माहीत नसलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ शब्दकोशात जरूर बघावा. यामुळे शब्दसंग्रहात भर तर पडतेच, त्याचबरोबर त्यापकी कोणत्याही शब्दाचा अर्थ दुसऱ्या कुठल्या उताऱ्यामध्ये विचारला असेल तर फायदा होतो.

इंग्रजी उताऱ्यासंदर्भातील व प्रश्न प्रकारांच्या संदर्भात आपण अनेक बारकावे पाहिले. विविध प्रकारचे उतारे आणि प्रश्न सोडवताना लक्षात घेण्याचे विविध मुद्दे आपण पाहिले. मात्र प्रत्यक्ष प्रश्न सोडवताना अनेक अडचणी येऊ शकतात. लिहिणाऱ्या व्यक्तीला नक्की काय म्हणायचे आहे याचा अंदाज यावा लागतो. तसेच प्रश्न प्रकार म्हणून कोणत्या उत्तराची अपेक्षा आहे याची निश्चित दिशा समजावी लागते.

पुढील लेखात आपण यूपीएससीमध्ये विचारल्या गेलेल्या काही उताऱ्यांचे व त्यावरील प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. त्यातून एकंदर परीक्षेसंदर्भातील काही ठोस व्यूहनीती ठरवता येते का, याचाही विचार करणार आहोत.

अपर्णा दीक्षित