21 February 2019

News Flash

एमपीएससी मंत्र : आरोग्यशास्त्र पोषण व विज्ञान

योग्य पोषण हे निरोगी स्वास्थ्याची गुरुकिल्ली आहे.

विज्ञानामधील आरोग्यशास्त्र व पोषण हे घटक बहुतांशी एकमेकांवर अवलंबून असल्याचे दिसून येते. कारण सुदृढ आरोग्यासाठी योग्य पोषणदेखील आवश्यक आहे, म्हणून या दोन घटकांचा अभ्यास एकत्रपणे केल्यास खूप फायदा होतो.

आरोग्यशास्त्र घटकाचा अभ्यास करताना पुढील मुद्दय़ांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

 • जिवाणूजन्य आजार/ रोग
 • विषाणूजन्य आजार/ रोग
 • कवकजन्य आजार/ रोग
 • आदिजीवजन्य आजार/ रोग
 • संसर्गजन्य/ असंसर्गजन्य आजार/ रोग
 • लैंगिकदृष्टय़ा पारेषित होणारे आजार/ रोग

आनुवंशिक आजार

वरील सर्व आजार/ रोगांचे लक्षण, कारणीभूत घटक, प्रसार, बाधित होणारे अवयव, उपचारपद्धती या सर्व गोष्टी लक्षात ठेवून प्रत्येक घटकाचा एक तक्ता (चार्ट) बनवून घ्या. त्याचा अभ्यास केल्यास वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवणे अधिक सोपे होईल. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादा आजार/ रोग जास्त चर्चेमध्ये असेल तर त्याचे स्थान- प्रसार- उपचारांसाठी केले जात असणारे प्रयत्न इ. चालू घडामोडींशी संबंधित अभ्यास करणे आवश्यक आहे. या घटकावर विचारले जाणारे प्रश्न थेट, वस्तुनिष्ठ, चालू घडामोडींवर आधारित असतात म्हणून या तिन्ही बाबींकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून महत्त्वाच्या आणि संभाव्य घटकांवर जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने ‘राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका’ हे राष्ट्रचेतनाचे सराव प्रश्न पुस्तक उपयुक्त ठरेल.

पोषण

योग्य पोषण हे निरोगी स्वास्थ्याची गुरुकिल्ली आहे. म्हणून या घटकाच्या अभ्यासाचा फायदा परीक्षेसाठी तर होतोच, तसेच आपण निरोगी राहण्यासाठी योग्य पोषण कोणते? योग्य पोषणाची फायदे काय आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरेदेखील आपल्याला या घटकामुळे समजतात.

पोषण या घटकाच्या अभ्यासक्रमामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो :

स्थूल पोषणद्रव्ये – कबरेदके, प्रथिने, मेद इ. या तिन्ही पोषणद्रव्यांपासून मिळणारी ऊर्जा, त्यांचे महत्त्वाचे घटक, कमतरता/ आधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या इ.

सूक्ष्म पोषणद्रव्ये – जीवनसत्त्वे, खनिज व क्षार जीवनसत्त्वांचे प्रकार – पाण्यात विरघळणारी (B, C) व मेदांमध्ये विरघळणारी (A,D,E,K)

वरील सर्व घटकांचा अभ्यास करत असताना पोषणद्रव्यांचा स्रोत, शरीरावरील त्यांचे परिणाम, कमतरता/ आधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, ठरावीक जीवनसत्त्वांचे इंग्रजी नाव काय आहे व त्या जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा घटक कोणता? हेही माहिती असणे आवश्यक आहे.

वरील दोन घटकांचा अभ्यास केल्यानंतर आपला संपूर्ण सामान्य विज्ञान या विषयाचा अभ्यास पूर्ण होतो. हे दोन घटक सर्वात शेवटी ठेवण्याचे कारण म्हणजे यातील मुद्दे अधिक छोटे व वस्तुनिष्ठ बाबी अधिक आहेत म्हणून परीक्षेला जाता जाता यांची उजळणी होणे खूप महत्त्वाचे आहे.

विज्ञान या विषयामध्ये अधिकाधिक गुण मिळवायचे असतील तर संकल्पनात्मक बाबी, वस्तुनिष्ठता, विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील उपयोग व थोडीसी तर्कक्षमता या चतु:सूत्रीचा वापर करणे आवश्यक आहे. कारण प्रश्नपत्रिकेचा संपूर्ण पाया या चार घटकांवरच आधारलेला आहे. यासाठी पुढील गोष्टींना लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

 • विज्ञानाबद्दल वाटणारी संपूर्ण भीती काढून टाकणे.
 • आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे सखोल आकलनात्मक निरीक्षण
 • कोणत्या घटकाला अधिक महत्त्व आहे आणि किती प्रश्न विचारले गेले आहेत याची नोंद त्या त्या प्रश्नपत्रिकेमध्ये करून ठेवावी.
 • बाजारातील इतर पुस्तके वाचत बसण्याऐवजी इ. ६ वी ते ११ वी राज्य पाठय़पुस्तक मंडळाच्या पुस्तकांचाच समग्र अभ्यास करावा.
 • पाठय़पुस्तकाच्या स्वाध्यायामधील प्रश्न/ अंकगणित सोडवणे.
 • इ. ६ वी ते ११ वीपर्यंतच्या विज्ञान विषयाच्या प्रत्येक पाठावरती किमान १० प्रश्न स्वत: तयार करून पाठाच्या शेवटी पुस्तकामध्येच चिकटवणे आणि त्याचे अध्ययन करणे.
 • वस्तुनिष्ठ बाबींचे विशेष टिपण तयार करून परीक्षेच्या आधी त्या टिपणांची उजळणी करणे.

वरील क्रमानुसार व मागील ३ लेखांमध्ये दिलेल्या सर्व मुद्दय़ांनुसार परिपूर्ण अभ्यास केल्यास विज्ञानाच्या १५ प्रश्नांपैकी किमान १२-१३ प्रश्न अगदी सहज सोडविता येऊ  शकतात. म्हणून विज्ञान हा विषय अवघड समजू नका. तुम्हाला त्याची गोडी लागली, आवड निर्माण झाली तर हा विषय सर्वाधिक गुण मिळवून देऊ शकतो.

First Published on February 9, 2018 12:22 am

Web Title: healthology nutrition and science