पूर्व परीक्षा हा नागरी सेवा परीक्षेचा पहिला आणि महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. या टप्प्यात पात्र झाल्याशिवाय पुढील परीक्षांना बसताच येत नाही. त्यामुळे पूर्वपरीक्षेतील विषय, त्यांचा अभ्यासक्रम, त्यासाठी आवश्यक संदर्भपुस्तके आणि अभ्यासाची पद्धत या बाबींचा विचार करण्यापूर्वी या पूर्वपरीक्षेची प्राथमिक परंतु महत्त्वपूर्ण वैशिष्टय़े लक्षात घेणे साहाय्यभूत ठरेल.

पूर्वपरीक्षा ही वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असणारी, बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित, नकारात्मक गुणपद्धती असलेली आणि पात्रता चाचणी आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास उत्तर पत्रिकेत एकही शब्द न लिहिता, केवळ अचूक पर्यायाचे वर्तुळ छायांकित करायचे असते. मात्र, नकारात्मक गुणपद्धतीमुळे चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नास असणाऱ्या गुणातील १/३ गुण वजा केले जातात. म्हणूनच एकतर बरोबर उत्तराची खात्री असणारेच प्रश्न सोडवावेत अथवा कमीत कमी धोका स्वीकारावा. अन्यथा नकारात्मक पद्धतीमुळे संबंधित विषयातील एकंदर गुण कमी होण्याचाच धोका निर्माण होतो.

पूर्वपरीक्षेतील सामान्य अध्ययन आणि नागरी सेवा कल चाचणी या दोन्ही विषयांसाठी आयोगाने स्वीकारलेली गुणांकन पद्धती पाहिल्यास हे लक्षात येते की, नागरी सेवा कल चाचणी (जी. एस. २) हा विषय केवळ पात्रता स्वरूपाचा असून, त्यात २०० गुणांपैकी ६६.६६ एवढे गुण प्राप्त करायचे आहेत. त्यामुळे ‘सामान्य अध्ययन पेपर १’ (जी. एस. १) या विषयात २०० गुणांपैकी किती गुण प्राप्त होतात, यावरच विद्यार्थ्यांचे पूर्व परीक्षेतील भवितव्य ठरते. याचाच अर्थ, पूर्व परीक्षेच्या बाबतीत गुणांकनासाठी सामान्य अध्ययन हा विषयच निर्णायक ठरत असल्यामुळे आपल्या तयारीत त्यास भरपूर वेळ देणे गरजेचे ठरते.

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे पूर्वपरीक्षा ही मुख्यत: पात्रता चाचणी असून त्यात प्राप्त झालेले गुण या टप्प्याच्या पात्रतेसाठीच लक्षात घेतले जातात. म्हणजे पूर्वपरीक्षेत मिळालेले गुण नागरी सेवेच्या मुख्य परीक्षा आणि मुलाखत या पुढील टप्प्यात मोजले जात नाहीत. थोडक्यात, पूर्वपरीक्षेचा पहिला अडथळा यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतरचा पुढील प्रवास पुन्हा नव्याने सुरू होतो, हे लक्षात ठेवावे.

पूर्वपरीक्षेची ही प्राथमिक वैशिष्टय़े लक्षात घेतल्यानंतर आणखी काही सर्वसाधारण बाबींचा विचार महत्त्वपूर्ण ठरतो. पूर्वपरीक्षेची व्याप्ती लक्षात येण्यासाठी यातील उपरोक्त नमूद केलेल्या दोन्ही विषयांचा अभ्यासक्रम बारकाईने पाहणे गरजेचे आहे. या लेखमालेच्या पुढील लेखांमध्ये प्रत्येक विषय आणि त्यातील घटक – उपघटकांच्या अभ्यासक्रमाची सविस्तर चर्चा होईलच. मात्र, सुरुवातीला आयोगाने नमूद केलेला दोन्ही विषयांचा प्रत्येकी ६-७ ओळींमधील अभ्यासक्रम सतत स्मरणात ठेवणे अभिप्रेत आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही विषयांच्या केंद्र लोकसेवा आयोगाच्या २०११ सालापासूनच्या (म्हणजे पूर्वपरीक्षा) प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण होय. जुन्या प्रश्नपत्रिकांचे सूक्ष्म अवलोकन करूनच दोन्ही विषय आणि त्यातील सर्व प्रकरणांची व्याप्ती समजून घेता येते. प्रश्नांचे स्वरूप संकल्पनात्मक, माहितीप्रधान, विश्लेषणात्मक की चालू घडामोडींवर अवलंबून आहे, याचा अचूक वेध घेता येतो. तसेच दरवर्षी प्रश्नांचा बदलणारा कलही जाणून घेता येतो. दोन्ही विषयांतील उपविषयांचे परीक्षेतील स्थान आणि महत्त्व जसे लक्षात येते, तसेच त्याचा अभ्यास नेमका कसा करावा याचे ही ज्ञान प्राप्त होते. थोडक्यात, अभ्यासाची पद्धत, दिशा आणि एकंदर भर कशावर द्यायला हवा याचे निर्धारण प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामुळे सुलभ बनते. त्यामुळे अभ्यास सुरू करण्यापूर्वी अभ्यासादरम्यान आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर मागील प्रश्नांकडे पाहणे सयुक्तिक ठरते.

शेवटी, पूर्वपरीक्षेच्या वस्तुनिष्ठ, नकारात्मक गुण पद्धती आणि पात्रता चाचणी या स्वरूपामुळे निर्णायक ठरणारी बाब म्हणजे नेमका आणि अचूक अभ्यास होय. पूर्वपरीक्षेच्या तयारीत जसे संकल्पनात्मक आकलन योग्य असणे गरजेचे आहे, तसेच मोठय़ा प्रमाणावरील माहिती अचूकपणे लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते. अर्थात, यासाठी नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण, नियमित, उजळणी आणि सरावास योग्य वाव देणारा आणि चिकित्सक अभ्यासच उपयुक्तठरेल यात शंका नाही.