मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि उमेदवारांचे पेपर सोडविण्याचे अनुभव यांच्यावर आधारित उतारा आणि त्यावरचे प्रश्न यांच्याबाबत उमेदवारांना जाणवणाऱ्या अडचणी आणि त्यांवरचे उपाय याबाबत चर्चा मागील लेखामध्ये करण्यात आली. या लेखामध्ये सराव आणि प्रत्यक्ष पेपर सोडविण्याची रणनिती यांची चर्चा करण्यात येत आहे.

कोणत्याही लेखनाचे आकलन होण्यासाठी तो एकदा वाचून संपूर्ण कळला असे प्रत्येक वेळी होईलच असे नसते. सामान्यपणे आवडता विषय किंवा विशेष प्रावीण्य असलेला किंवा ज्यामध्ये शिक्षण झाले आहे असा विषय पटकन समजतो. त्यावरील नवीन लेखनही कमी प्रयत्न आणि वेळेमध्ये समजते.

अनोळखी विषय, शालेय व महाविद्यालयीन काळात अवघड वाटणारे विषय, अमूर्त विषय समजून घ्यायला कोणासही थोडे जड जातात आणि त्यासाठी जास्त वेळही द्यावा लागतो. अशा विषयांवरील नवीन लेखनही जास्त अवघड वाटते. आकलन हे असे व्यक्तिनिष्ठ असते. त्यामुळे प्रत्येकाची या घटकाची तयारी करायची पद्धतही वेगळी असायला हवी.

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले असता प्रबोधनकाळ, सामान्य विज्ञान, पर्यावरण, आध्यात्म तसेच वैचारिक चर्चा, आर्थिक व सामाजिक समस्या / विकास, सामाजिक चालू घडामोडी यांवर आधारित उतारे विचारण्यात आल्याचे लक्षात येते. यातील कोणता विषय आपल्या आवडीचा, कम्फर्ट झोनमधील आहे आणि कोणता नावडता, अवघड आहे हे स्वत:ला माहीत असायला हवे. दुसऱ्या श्रेणीमधील त्यातल्या त्यात सरावाने कम्फर्ट झोनमध्ये येऊ शकतील अशा विषयांच्या तयारीवर सर्वात जास्त भर द्यावा. त्यानंतर पहिली श्रेणी आणि त्यानंतर अत्यंत कठीण वाटणारे विषय अशा प्राधान्याने सराव करायला हवा. सर्वात अवघड विषय दुर्लक्षित करण्याचा पर्याय आहे, पण त्यासाठी आधीच्या दोन प्रकारांवरील प्रश्न मात्र शत प्रतिशत चांगल्या प्रकारे सोडविता येतील इतकी तयारी व्हायला हवी. आपल्या कम्फर्ट झोनमधील नवीन लेखनाच्या आकलनाबाबत अतिआत्मविश्वास अणि अवघड, नावडत्या विषयाबाबत न्यूनगंड दोन्ही गोष्टी नुकसान देतात. त्यामुळे दोन्हीचा सराव महत्त्वाचा आहे, हे नेहमी लक्षात ठेवावे.  उताऱ्यांवरील प्रश्नांचा सराव दोन पद्धतींनी केल्यास जास्त फायदा होतो. वेगवेगळ्या स्रोतांमधून वेगवेगळ्या विषयावरचे लेखन वाचून त्याचे आकलन करण्याचा आणि त्यावरचे प्रश्न स्वत:च तयार करण्याचा प्रयत्न करणे हा एक प्रकार. रोज दोन उतारे घेऊन अशा प्रकारे सराव करावा. यातून आकलनाचा आणि वाचनाचा वेग वाढेल यासाठी प्रयत्न करावा. दुसरा प्रकार प्रत्यक्ष परीक्षेच्या वातावरणामध्ये वेळ लावून प्रश्न सोडविण्याचा सराव. पहिल्या तयारीच्या जोरावर आपला परफॉर्मन्स तपासून किती आणि कोणत्या प्रकारच्या तयारीची आवश्यकता आहे, हे समजून घेण्यासाठी हा सराव महत्त्वाचा आहे. यासाठी राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे राष्ट्रचेतनाचे पुस्तक उपयुक्त ठरेल.

प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केले तर लक्षात येते की सगळे उतारे वाचून सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आणि व्यवहार्य दोन्ही नाही. मागच्या लेखामध्ये चर्चा केल्याप्रमाणे सी सॅटमध्ये किमान  १२० गुण मिळवायचे असतील तर उताऱ्यावरील ५० पैकी किमान ४० प्रश्न सोडवायला हवेत. त्यामुळे सर्वात अवघड विषयावरील दोन उतारे सोडता येतील किंवा वेगवेगळ्या उताऱ्यांवरचे काही प्रश्न सोडता येतील. उतारा नव्हे तर त्यावरचे प्रश्न अवघड असले तरच तो सोडावा. अवघड उताऱ्यावर तथ्यात्मक माहितीचे प्रश्न असतील तर ते सोडवावेत.  आयोगाचा नियम नाही की उतारा घेतला की सगळे प्रश्न सोडवायलाच हवेत. पण यामध्ये सगळे उतारे वाचण्यात कालापव्यय होतो. त्यामुळे उतारा प्रथमदर्शनी अत्यंत अवघड वाटला तर त्यावरचे प्रश्न पहावेत. वस्तुनिष्ठ माहिती विचारणारा प्रश्न असेल तर ते २.५ गुण गमावू नयेत.   हे प्रश्न सोडविताना एक गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवायला हवी. प्रश्नांची उत्तरे दिलेल्या उताऱ्यातील लेखकाच्या मताच्या अनुषंगाने, ते मत योग्य व खरे मानून देणे आवश्यक आहे. संबंधित विषयातील अद्ययावत माहिती आपल्याकडे असेल किंवा मांडलेले मत वस्तुस्थितीच्या विपरीत असेल तरीही उताऱ्यातील मुद्दय़ाच्या चौकटीतच उत्तर देणे आवश्यक आहे. याबाबत दिलेल्या पर्यायांनी गोंधळून न जाता उताऱ्याची चौकट हा त्या प्रश्नापुरता ठरलेला अभ्यासक्रम आहे हे लक्षात घेऊन उत्तरे द्यावीत.

वरीलप्रमाणे उताऱ्यातील मुद्दय़ाच्या अनुषंगानेच उत्तर देणे, आकलनासहीत वाचन करण्याचा वेग वाढविणे, पहिल्या एकदोन ओळीमध्येच उताऱ्याचा आपल्या श्रेणीप्रमाणे प्रकार ओळखणे या बाबी सरावानेच जमू शकतात. सराव आणि केवळ सराव हाच हे प्रश्न सोडविण्यासाठी आणि चांगले गुण मिळविण्यासाठी आवश्यक आहे.

एनसीएचएम जेईई-२०१८

नॅशनल काऊन्सिल फॉर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटिरग टेक्नॉलॉजी (एनसीएचएमसीटी) बरोबर संलग्न असलेल्या देशभरातील ५८ हॉटेल मॅनेजमेंट (जसे की मुंबई, गोवा, हैदराबाद, बंगलोर इ.) मधील ३ वर्षे कालावधीच्या बी.एस्सी. (हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) डिग्री प्रोग्रॅमसाठी प्रवेश परीक्षा एनसीएचएम जेईई-२०१८ दि. २८ एप्रिल २०१८ रोजी घेणार आहे. ही परीक्षा शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रवेशासाठी असेल.

* पात्रता – बारावी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण अथवा या वर्षी परीक्षेस बसलेले उमेदवार पात्र आहेत.

* अर्जाचे शुल्क – रु. ८००/- (अजा/अज/विकलांग – रु.४००/-).

* कोर्स फी – रु. ८७,०००/- प्रत्येक वर्षांसाठी.

* एकूण-२,६१,०००/-.

हा पूर्णवेळ जॉब ओरिएंटेड प्रोग्रॅम असून यातून जवळजवळ ९०% आयएचएम विद्यार्थ्यांना कॅम्पस सिलेक्शनद्वारे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळाली आहे. (संदर्भ एम्प्लॉयमेंट न्यूज दि. ३ फेब्रुवारी २०१८ च्या अंकामधील पान क्र. ५६ वरील जाहिरात).

* ऑनलाईन अर्ज  https://applyadmission.net/nchmjee2018  किंवा http://www.nchm.nic.in  या संकेतस्थळावर दि. ११ एप्रिल २०१८ पर्यंत करावेत.