04 March 2021

News Flash

वेगळय़ा वाटा : हाऊसकीपिगचे महत्त्व

हॉटेलमधल्या खोल्याच नव्हे तर संपूर्ण हॉटेलची साफसफाई आणि निगा राखण्याचे काम ते करत असतात.

हाऊसकीपिंग हा हॉटेल मॅनेजमेंटअंतर्गत येणारा आणखीन एक महत्त्वाचा विभाग.

हाऊसकीपिंग हा हॉटेल मॅनेजमेंटअंतर्गत येणारा आणखीन एक महत्त्वाचा विभाग. हॉटेलमधल्या खोल्याच नव्हे तर संपूर्ण हॉटेलची साफसफाई आणि निगा राखण्याचे काम ते करत असतात. एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपर या विभागाची मुख्य असते. हॉटेलची साफसफाई दोन विभागात केली जाते. पब्लिक एरिया, खोल्या तसेच बॅक एरिया. हॉटेलच्या गेटपासून लॉबीपर्यंतचा परिसर, अवतीभवतीची बाग आणि पार्किंगचा सर्व भाग पब्लिक एरियात येतो. या भागात कोणाचाही वावर असू शकतो. मोठमोठय़ा हॉटेल्समध्ये हल्ली या भागाची सफाई बाहेर कंत्राट देऊन करवून घेतली जाते. पण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पब्लिक एरियाचा काही भाग उदा. उपाहारगृह किंवा बँक्वेटची सफाई हॉटेलचे कर्मचारी करतात.

खोल्या वेळेवर साफ करून परत विक्रीसाठी मोकळ्या करणे, ही हाऊसकीपिंग विभागाची खूप मोठी जबाबदारी असते. हाऊसबॉय किंवा चेंबरमेड हे काम करतात. खोली साफ करणे, बिछाने बनवणे (बेड -मेकिंग) आणि बाथरूम साफ करणे यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाते. या तिन्ही कामांची एक विशिष्ट पद्धत असते आणि एक खोली एका ठरावीक वेळेत साफ झाली तर त्याच गणिताने किती खोल्यांसाठी किती मनुष्यबळ लागते, याचा अंदाज येतो. त्याप्रमाणे नियोजन करता येते. हे काम मात्र हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनाच दिले जाते. खोल्यांमध्ये राहत्या पाहुण्यांच्या वस्तू आणि इतर सामान गहाळ न होता खोली साफ केली जाते. या कामात नैतिक जबाबदारी मोठी आहे त्यामुळे कोणता कर्मचारी कोणत्या खोल्यांची सफाई करतो, याची नोंद केलेली असते. खोल्यांच्या भागात हाऊसकीपिंगचे ठरावीक कर्मचारी, बेल-बॉय, रूम सव्‍‌र्हिस कर्मचारी यांचा वावर असू शकतो. मनात आले म्हणून जाऊन खोल्या बघितल्या किंवा आलेल्या सेलिब्रिटीला भेटलो, असे होत नाही. कोणत्याही कर्मचाऱ्याला तशी परवानगी नसते.

हॉटेलच्या आतला भाग, म्हणजेच बॅक एरिया. त्यामध्ये आतला जिना, तळघर, कार्यालये, लॉकर रूम्स यांचा समावेश होतो. मोठय़ा हॉटेल्समध्ये स्वत:ची लाँड्री असते. आलेल्या पाहुण्यांचे कपडे, कर्मचाऱ्यांचे गणवेश, चादरी, टॉवेल्स, अभ्रे, टेबलक्लॉथ, नॅपकिन्स या सर्व गोष्टी वेगवेगळ्या उपकरणांनी इथेच धुतल्या, सुकवल्या जातात. इस्त्री करून त्या पुन्हा जागच्या जागी जातात. हॉटेलमधल्या पुष्परचनेचे आणि फुलांच्या सजावटीचे कामही हाऊसकीपिंगद्वारेच पार पडते. त्यासाठी काहीवेळ हॉटेलचे स्वतचे पुष्परचनाकार असतात तर काहीवेळा  बाहेरून कंत्राटी कामावर करून घेतल्या जातात.

बडय़ा हॉटेलात डागडुजी आणि सफाई राखताना हाऊसकीपिंगचा संबंध येतो तो, इंजिनीअरिंग विभागाबरोबर.  खोल्यांत गरम पाणी पुरवणे, बिघडलेले नळ, व्हॅक्युम क्लीनरसारखी यंत्रे दुरुस्त करणे, वातानुकूलन यंत्रणेची काळजी घेणे, तुंबलेले पाईप साफ करणे, इ. कामे इंजिनीअरिंग विभाग करतो. हॉटेलातील लायटिंगची व्यवस्थाही हाच विभाग बघतो. छोटय़ा हॉटेल्समध्ये ही सगळी कामे हाऊसकीपिंगच करते.

हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी साधारणत: सुपरवायझरी हुद्दय़ावर म्हणजेच निरीक्षक पदावर रुजू होतात आणि आपल्या कामातून प्रगती करत एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपर बनू शकतात. इथे सगळ्यात मोठे कसब लागतो ते संघभावनेचे आणि संघ व्यवस्थापनाचे. इतरांकडून कामे करून घेण्याची कला अवगत असेल की सगळे काही सोपे जाते. या कामासाठी प्रचंड शारीरिक क्षमता लागते तसेच स्वच्छतेची अंगभूत आवडही.  हॉटेल हाऊसकीपिंग विभागात काम केल्यानंतर सोयीसुविधा व्यवस्थापन अर्थात फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या कोणत्याही कंपनीत तुम्ही काम करू शकता. शिवाय मोठय़ा कंपन्याच्या अतिथिगृहांची जबाबदारी सांभाळणे, क्रूझवरील नोकऱ्या हे पर्यायही असू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 2:04 am

Web Title: importance of housekeeping department in the hotel industry
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : भूगोलाची तयारी
2 नोकरीची संधी
3 एमपीएससी मंत्र : पूर्वपरीक्षेनंतर..
Just Now!
X