20 September 2018

News Flash

एमपीएससी मंत्र : भारतीय राज्यव्यवस्था – चालू घडामोडी

आदर्श आचारसंहिता, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर या संबंधांतील ठळक घडामोडींचा आढावा घ्यावा.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

राज्यव्यवस्था विषयाच्या चालू घडामोडी हा सर्वाच्याच आवडीचा विषय असतो. विशेषत: निवडणुका आणि राजकारण. पण या विषयाच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या चालू घडामोडी या जास्त गांभीर्याने पाहायच्या बाबी आहेत. यांच्या अभ्यासाला राज्यघटना आणि कायदे तसेच महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयांचा संदर्भ असणे आवश्यक आहे. प्रत्येक घडामोडीच्या पारंपरिक मुद्दय़ावर प्रश्न विचारण्यात येईलच असे नसते. मात्र अशा संदर्भाशिवाय या घडामोडी समजून घेणे काही वेळा अवघड जाते. तसेच मुख्य परीक्षेमध्ये यावर विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात, त्यामुळे परिपूर्ण अभ्यास ज्या त्या वेळी करणे योग्य ठरते. एप्रिलमधील पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे या लेखामध्ये पाहू.

HOT DEALS
  • Honor 9 Lite 64GB Glacier Grey
    ₹ 15220 MRP ₹ 17999 -15%
    ₹2000 Cashback
  • MICROMAX Q4001 VDEO 1 Grey
    ₹ 4000 MRP ₹ 5499 -27%
    ₹400 Cashback

सन २०१७ मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली. तसेच महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका सन २०१७ च्या शेवटी संपन्न झाल्या आहेत. त्या अनुषंगाने महत्त्वाच्या मुद्दय़ांची चर्चा या स्तंभामध्ये ३० ऑगस्ट व ८ सप्टेंबर २०१७ च्या लेखांमध्ये करण्यात आली आहे. लोकसभा व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी अपेक्षित असल्या तरी सर्व राज्ये आणि लोकसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची चर्चा सुरू आहे. म्हणूनच याबाबतच्या तरतुदी समजून घेणे आवश्यक आहे. एकूणच निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष, आचारसंहिता, राष्ट्रपती पद या बाबी चालू घडामोडी आणि संबंधित पारंपरिक मुद्दे या अनुषंगाने तुमच्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग असायला हव्यात. राज्यव्यवस्था विषयाची तयारी आणि उजळणीसाठी राष्ट्रचेतनाच्या राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका सोडविल्यास फायदा होईल.

निवडणूक प्रक्रियेमध्ये आयोगांची रचना, कार्ये, अधिकार, सदस्यांबाबतच्या तरतुदी, आयोगाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय व नियम यांचा अभ्यास आवश्यक आहे. राजकीय पक्षांबाबत, राष्ट्रीय पक्षांची स्थापना, अजेंडा, त्यांच्या वाटचालीतील ठळक टप्पे व मुद्दे. प्रादेशिक पक्षाच्या स्थापनेमागील कारणे, वाटचालीतील ठळक टप्पे, महत्त्वाचे नेते व मुद्दे, या बाबींचा अभ्यास करावा. प्रादेशिक पक्षांचा अभ्यास हा महाराष्ट्रातील पक्षांचा अभ्यास आहे हे गृहीत धरावे. याबाबत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षांतर बंदीबाबतच्या घटनादुरुस्त्या. या प्रक्रियेमध्ये मतदारांचे वय, ओळखपत्रे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर, निवडणूक खर्चाच्या मर्यादा, उमेदवारांच्या अर्हता, अपात्रता, त्याबाबतचे निर्णय अशा बाबी महत्त्वाच्या आहेत.

आदर्श आचारसंहिता, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर या संबंधांतील ठळक घडामोडींचा आढावा घ्यावा. निवडणुकांच्या काळात या बाबींवर जास्त भर देणे अपेक्षित आहे. मतदारावर प्रभाव टाकणारे घटक, आयोगासमोरील समस्या या बाबींवर वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यातून होणाऱ्या चर्चा या आधारे स्वत:चे विश्लेषण व चिंतन करणे गरजेचे आहे.

राजकीय पक्षांचा अभ्यास करताना राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठीचे निकष, यामध्ये झालेले बदल, पक्षांचे वित्तीय व्यवहार इत्यादी मुद्दय़ांचा विचार करावा. राष्ट्रीय पक्षांची स्थापना, संस्थापक, अजेंडा, त्यांच्या वाटचालीतील ठळक टप्पे, महत्त्वाच्या घटना व मुद्दे या आधारावर ६ राष्ट्रीय पक्षांचा अभ्यास करावा. सर्व राष्ट्रीय पक्ष व ठळक / महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष यांचे नेते, निवडणूक चिन्ह, प्रभाव क्षेत्रे यांचा आढावा घ्यायला हवा व टेबलमध्ये त्यांच्या नोट्स काढाव्यात. महाराष्ट्रातील मुख्य प्रादेशिक पक्षांबाबत पक्षांचा अजेंडा, निवडणुकांमधील कामगिरी, प्रभाव क्षेत्र, महत्त्वाचे नेते, वाटचालीतील ठळक टप्पे व सद्य:स्थिती या बाबी व्यवस्थित समजून घ्याव्यात.

शासकीय योजना आणि धोरणे यांचा आढावा हाही या विषयाच्या अभ्यासातील महत्त्वाचा मुद्दा आहे. केंद्र व राज्य शासनाच्या तीव्रपणे प्रसिद्धी करण्यात येणाऱ्या योजनांचा अपेक्षित यादीमध्ये समावेश करावा. या दृष्टीने महिलांसाठीच्या योजना उदा. महिला उद्योजिकांसाठी धोरण, सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी योजना, शेतकऱ्यांसाठीच्या योजना अशा विविध योजनांचा विचार करता येईल. यापैकी शासनाकडून जास्त महत्त्व व प्रसिद्धी दिल्या जाणाऱ्या योजना परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. यातील काही योजनांबाबत सप्टेंबर महिन्यातील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली आहे.

भारत आणि इतर देशांशी द्वीपक्षीय संबंध तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांमधील भारताचे स्थान व भूमिका महत्त्वाचे अभ्यासविषय आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय घटनांवरील भारताची भूमिका समजून घेणेही आवश्यक आहे. अशा मुद्दय़ांवर प्रत्यक्ष प्रश्न विचारण्याचे प्रमाण खूप कमी आहे पण मुख्य परीक्षेच्या दृष्टीने असे मुद्दे ज्या त्या वेळी समजून घेणे सोयीचे ठरते.

भारताला महत्त्वाच्या संघटनांचे सदस्यत्त्व, आंतरराष्ट्रीय संस्थांमधील भारतीयांची नियुक्ती, संयुक्त युद्धाभ्यास, आंतरराष्ट्रीय करार/ठराव यांबाबत भारताची भूमिका या बाबींवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. शेजारी देशांशी झालेले महत्त्वाचे करार किंवा विवाद यांचा आढावाही आवश्यक आहे.

First Published on February 28, 2018 2:43 am

Web Title: important guidance for mpsc exams in 2018