पर्यटन ही बाब पेपर १-भूगोल घटक तसेच पेपर ४-अर्थव्यवस्था घटक या दोन्हीचा भाग आहे. त्यामुळे पेपर १ किंवा ४ यापकी कुठेही या घटकावरील प्रश्नांची अपेक्षा करता येईल. आर्थिक भूगोलाचा भाग म्हणून पारंपरिक पर्यटनस्थळांचा त्यांचे भौगोलिक स्थान, वैशिष्टय़े, ऐतिहासिक / पर्यावरणीय महत्त्व अशा मुद्दय़ांच्या आधारे टेबल फॉरमॅटमध्ये अभ्यास करण्याबाबत यापूर्वी चर्चा केली आहे. या क्षेत्रातील चालू घडामोडींबाबत पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यादृष्टीने नव्या तसेच नावीन्यपूर्ण पर्यटन संकल्पना आणि नव्याने विकसित करण्यात येत असलेली पर्यटनस्थळे याबाबत या पुढील लेखामध्ये माहिती देण्यात येत आहे.

महाराष्ट्रामध्ये पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना सन १९५६ मध्ये करण्यात आली. महामंडळाक डून तसेच अन्य खासगी पर्यटन कंपन्यांकडून विकसित नवीन पर्यटन समकल्पना/ स्थळे पुढीलप्रमाणे;

* विविध महोत्सव

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत राज्यातील वारसास्थळे तसेच पर्यटनदृष्टय़ा महत्त्वाच्या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सव प्रतिवर्षी आयोजित करण्यात येतात. आपल्या उच्च सांस्कृतिक परंपरा व अभिजात कलांचे दर्शन, महाराष्ट्रात येणारे देशी-विदेशी पर्यटक व कलाप्रेमीना घडावे तसेच या ठिकाणांचा पर्यटनदृष्टय़ा विकास व प्रसार व्हावा हा यामागील उद्देश आहे.

* औरंगाबाद येथील वेरुळ-औरंगाबाद   महोत्सव

* नागपूर येथील कालिदास महोत्सव

* मुंबईजवळील एलिफंटा महोत्सव

* दक्षिण मुंबईतील बाणगंगा महोत्सव

* पुणे महोत्सव आदी महोत्सव

* सारंगखेडा चेतक महोत्सव

राजस्थान येथील पुष्कर महोत्सवाचे प्रमुख आकर्षण उंट हे आहे. मोठय़ा संख्येने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटक या महोत्सवास उपस्थित राहतात. त्याच धर्तीवर सारंगखेडा येथे अश्वह्ण हे प्रामुख्याने आकर्षण असलेल्या चेतक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

* शनिवारवाडा ध्वनिप्रकाश कार्यक्रम महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात जानेवारी २००१ पासून महाराष्ट्रातील पहिला कायमस्वरूपी ध्वनिप्रकाश कार्यक्रम शनिवारवाडा या ऐतिहासिक वास्तूत सुरू करण्यात आला आहे. त्यात पेशवेकालीन इतिहासावर आधारित मराठी व इंग्रजीमध्ये प्रत्येकी एक तासाचा कार्यक्रम सादर करण्यात येतो.

* स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंग केंद्र
महामंडळाने तारकर्ली, ता मालवण,

जि. सिंधुदुर्ग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायिव्हग प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. हे प्रशिक्षण केंद्र आंतरराष्ट्रीय पॉडी (प्रोफेशन असोसिएशन ऑफ डायिव्हग इन्स्ट्रक्टर्स) या संस्थेशी संलग्न असून प्रशिक्षित झालेल्या व्यक्तींना तसे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

*  हूनर से रोजगार

या योजनेअंतर्गत महामंडळातील पर्यटक निवासात तसेच राज्यातील खासगी संस्थांमधून ‘हुनर से रोजगार’ कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता हाऊस कीिपग व फूड प्रॉडक्शन, वाहनचालक व आदरातिथ्य प्रशिक्षण देऊन जास्तीत जास्त कुशल्य मनुष्यबळाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे.

*  हेलिकॉप्टर टुरिझम 

राज्यात विविध पर्यटन ठिकाणी अत्यंत कमी वेळात आरामदायी प्रवास करण्यासाठी हेलिकॉप्टर टुरिझम ही संकल्पना पुढे आली. खासगी संस्थेच्या सहकार्याने ही सेवा पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या  संकल्पनेद्वारे मुंबईतील जुहू चौपाटी – विपश्यना पॅगोडा – खारफुटीचे जंगल – लोकल रेल्वे – मेट्रो – इस्कॉन मंदिर – मुंबईच्या गगनचुंबी इमारती – पवई तलाव – सी लिंक – लोखंडवाला – मढ बेट इ. ठिकाणांचे हवाईदर्शन पर्यटकांना १५ मिनिटांत घडवले जाते.

*  पुस्तकांचं गाव

देशात थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर – पांचगणी या हिल स्टेटशच्या जवळच भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून विकसित करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात येथे स्ट्रॉबेरी महोत्सवही आयोजित करण्यात येतो.

* गावातील २५ घरांत १५ हजार पुस्तके आहेत.

* पर्यटकांच्या आवडीनुसार वाचनासाठी साहित्य उपलब्ध आहे.

* वाचन – संपादन- मुद्रितशोधनाची कार्यशाळा.

* अंधांसाठी ब्रेल लिपीसह ई-बुक्सची उपलब्धता.

* पर्यटकांच्या साक्षीने नव्या कांदबऱ्यांचे प्रकाशन सोहळे.

* दिवाळी, नाताळ आणि मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टय़ा लक्षात घेऊन येथे बालसाहित्य महोत्सवाचेही आयोजन केले जाते.