आपण भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकाची एकूण दोन लेखांमध्ये माहिती घेणार आहोत. आजच्या  लेखामध्ये यामधील भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला या मुद्याविषयी सर्वागीण आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम आपण २०१३ ते २०१६मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची माहिती घेणार आहोत. या घटकावर एकूण चार प्रश्न विचारले गेलेले आहेत (२०१३ मध्ये १ प्रश्न, २०१४ मध्ये २ प्रश्न आणि २०१६ मध्ये १ प्रश्न) हे प्रश्न खालीलप्रमाणे होते.

  • मंदिर स्थापत्यकलेमध्ये चोल स्थापत्यकला उच्च विकास दर्शविते. – चर्चा करा.
  • सिंधू संस्कृतीमधील नगर नियोजन आणि संस्कृतीने वर्तमान स्थितीमधील नागरीकरणामध्ये किती योगदान दिलेले आहे. – चर्चा करा.
  • गांधार शिल्पकला जशी ग्रीकांची ऋणी लागते तसेच रोमन यांचीही लागते. – स्पष्ट करा.
  • सुरुवातीची बौद्ध स्तूपकला, लोकांची तत्व आणि कथानकाबरोबरच बौद्ध आदर्शाची यशस्वीरीत्या व्याख्या करते. – स्पष्टीकरण द्या.

उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर विचारण्यात आलेले आहेत. आणि या प्रश्नाची उकल करताना दोन महत्वपूर्ण पलूंचा विचार करणे गरजेचे आहे. यातील पहिला पलू हा भारतातील स्थापत्य कला आणि शिल्पकला याचा इतिहास आणि दुसरा पलू म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन कालखंडामध्ये या कलांचा विकासमध्ये झालेली प्रगती. भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यांच्या इतिहासाची सुरुवात प्रागतिहासिक कालखंडापासून सुरु होते ज्यामुळे या कलांची सुरुवात नेमकी कशी व कोठून झालेली आहे याची माहिती आपणाला मिळते. पण या घटकावर साधारणत: सिंधू संस्कृतीपासून प्रश्न विचारले जातात त्यामुळे या मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करताना आपणाला सिंधू संस्कृतीपासून सुरुवात करावी लागते तसेच वैदिक कालखंडामध्ये या कलांची माहिती प्राप्त होत नाही. यातील सिंधू संस्कृतीचे पुरातत्वीय अवशेषांद्वारे स्थापत्यकला आणि शिल्पकला यामध्ये झालेल्या प्रगतीचा इतिहास पहावयास मिळतो आणि इ.स. पूर्व सहाव्या शतकापासून या कलांचा इतिहास अखंडितपणे पाहवयास मिळतो, ज्याची माहिती आपणाला तत्कालीन अवशेष आणि साहित्याद्वारे समजावून घेता येऊ शकतो.

उपरोक्त विचारले गेलेले प्रश्न हे प्राचीन भारत आणि सुरुवातीचा मध्ययुगीन भारत या कालखंडाशी संबंधित आहेत. प्राचीन भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर बौद्ध धर्माचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो आणि प्राचीन भारतात सर्वाधिक बौद्ध धर्माशी संबंधित स्थापत्यकला आणि शिल्पकला याची निर्मिती झालेली दिसून येते कारण मौर्य कालखंडापासून बौद्ध धर्माला राजाश्रय मिळालेला होता पण याच्या जोडीला जैन आणि हिंदू धर्माशी संबंधित स्थापत्यकला आणि शिल्पकला याचीही निर्मिती करण्यात आलेली होती. हिंदू धर्माशी संबंधित मंदिर शैलीचे नागर आणि द्राविड असे दोन प्रकार आहेत जे प्राचीन कालखंडापासून अस्तिवात आहेत. यातील नागर शैली ही प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये येते आणि द्राविड शैली ही दक्षिण भारतामध्ये येते आणि या दोन शैलीमधील काही वैशिष्टय़ घेऊन वेसर शैली तयार झालेली आहे, जी प्रामुख्याने मध्य भारतात वापरली जाते. साधारणता गुप्त कालखंडापासून िहदु धर्माशी संबंधित मंदिर शैलीच्या इतिहासाची सुरुवात झालेली दिसून येते. त्यापुढील काळामध्ये त्यात झालेला विकास याची आपणाला कालखंडनिहाय माहिती प्राप्त करावी लागते उदा – गुप्त कालखंड, गुप्तोत्तर कालखंड, सुरुवातीचा मध्ययुगीन कालखंड यामध्ये उत्तर आणि दक्षिण भारतातील राजकीय सत्ताच्या कालखंडातील विकास ज्यामध्ये प्रामुख्याने पल्लव, चालुक्य घराणे, चोल, राजपूत राज्ये, इत्यादीची काळातील स्थापत्यकला आणि शिल्पकला तसेच यांची वैशिष्टय़े याची तुलनात्मक पद्धतीने माहितीचे संकलन करणे महत्वाचे ठरते. याचबरोबर मध्ययुगीन कालखंडामध्ये भारतात इंन्डो-इस्लामिक स्थापत्यकलेची सुरुवात झालेली होती. दिल्ली सल्तनत, मुघल साम्राज्य याच्या कालखंडात ती विकसित झालेली होती. याचबरोबर  विजयनगर साम्राज्य, १३व्या आणि १४व्या शतकातील उत्तर भारतातील प्रादेशिक सत्ता, १८व्या शतकातील प्रादेशिक सत्ता आणि वसाहतकालीन स्थापत्यकला व शिल्प कला याचीही महिती असणे गरजेचे आहे. कारण प्रश्न हे कधी कधी संपूर्ण कालखंड गृहीत धरून विचारले जाऊ शकतात त्यामुळे या घटकाची तयारी सर्वागिण आणि सखोल पद्धतीने करणे अपरिहार्य आहे. कधी कधी या मुद्याशी सबंधित प्रश्न सद्यस्थितीला विचारात घेऊन विचारले जातात उदा. सिंधू संस्कृतीवरील विचारण्यात आलेला प्रश्न. थोडक्यात या मुद्याची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करताना कालखंडनिहाय योगदान आणि यामध्ये घडून आलेला विकास आणि बदल व याची वैशिषटय़े यासारख्या बाबींचा एकत्रित विचार करुन करावा लागणार आहे याची जाणीव असणे गरजेचे आहे.

या घटकाची मुलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता ११वीचे  Introduction to Indian Art – Part – I हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे तसेच याच्या जोडीला १२वीचे Themes in Indian History Part – I आणि II व जुन्या एनसीईआरटीचे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरील पुस्तकातील भारतीय वारसा आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा. याच्या जोडीला या विषयावर गाईडच्या स्वरूपात लिहीलेली अनेक पुस्तके बाजारामध्ये उपलब्ध आहेत, ज्याद्वारे या मुद्याचा अधिक सखोल आणि सर्वागीण पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो.

या पुढील लेखामध्ये आपण भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकांमधील चित्रकला, साहित्य, आणि उत्सव या मुद्याचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त  ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत.