रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई

संस्थेची ओळख

मुंबईमध्ये माटुंगा परिसरात असणारी ‘रसायन तंत्रज्ञान संस्था’ ओळखली जाते ती ‘यूडीसीटी, मुंबई’ किंवा ‘आयसीटी, मुंबई’ या लघुरूपांनीच. त्याला कारणही तसेच आहे. या संस्थेच्या स्थापनेपासूनचा गौरवशाली इतिहास लक्षात घेतला, तर ‘यूडीसीटी’ किंवा ‘आयसीटी’ या नावांनी उद्योगविश्वामध्ये तयार केलेला आपला दबदबा आणि उद्योजकांची गौरवशाली परंपरा या संस्थेला एक ब्रँड म्हणूनच पुढे आणते. इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई या संस्थेची स्थापना झाली ती १ ऑक्टोबर, १९३३ रोजी. या संस्थेने सुरुवातीला मुंबई विद्यापीठाचा केमिकल टेक्नॉलॉजी विभाग म्हणून आपल्या शैक्षणिक कार्याचा शुभारंभ केला. त्यानंतरच्या टप्प्यावर ‘युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई’ म्हणून ही संस्था ओळखली जाऊ  लागली. शैक्षणिक स्वायत्ततेच्या आधाराने सन २००४ पासून हा विभाग स्वायत्त संस्था म्हणून, अर्थात ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ म्हणून ओळखला जाऊ  लागला. रसायन तंत्रज्ञान आणि त्याच्याशी संबंधित नानाविध विषयांच्या क्षेत्रामध्ये या संस्थेने केलेले शैक्षणिक आणि संशोधनाचे कार्य, संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये निर्माण केलेला दबदबा विचारात घेत, १२ सप्टेंबर २००८ पासून या संस्थेला एक अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली. १६ एकरांच्या परिसरामध्ये कार्यरत असलेल्या या संस्थेला औद्य्ोगिक विश्व आणि उद्योगपतींकडून कायमच सहकार्य लाभत आले आहे. जवळपास १९ पद्म पुरस्कार विजेते मान्यवर तयार करणारी संस्था म्हणूनही या संस्थेची ख्याती आहे. ‘श्री रसायन देविके’ या विद्यापीठ गीताच्या माध्यमातून ही संस्था पर्यावरणपूरक मानवी विकासाचा संदेश देत आहे. त्याच धर्तीवर या संस्थेमधील विविध विभागांचे अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना शाश्वत मानवी विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

विभाग आणि शैक्षणिक अभ्यासक्रम

केमिकल इंजिनीअरिंग, केमिकल टेक्नॉलॉजी, अप्लाइड केमिस्ट्री, फार्मसी, बायोटेक्नॉलॉजी, बायोप्रोसेसिंग या क्षेत्रांशी निगडित शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि औद्य्ोगिक क्षेत्राच्या सहकार्याने चालणाऱ्या विविध उपक्रमांसाठी ही संस्था ओळखली जाते. या संस्थेमध्ये केमिकल इंजिनीअरिंग, डायस्टफ टेक्नॉलॉजी, फायबर्स अँड टेक्स्टाइल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, फूड इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ऑइल्स, ऑलिओकेमिकल्स अँड सर्फेक्टन्ट्स टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, पॉलिमर अँड सर्फेस इंजिनीअरिंग, पफ्र्युमरी अँड फ्लेवर टेक्नोलॉजी, जनरल इंजिनीअरिंग, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथेमेटिक्स या विषयांसाठीचे स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. विभागांमधून शिक्षण घेणाऱ्या पदवी, पदव्युत्तर आणि संशोधक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या अद्ययावत प्रयोगशाळा हे या विभागांसाठीचे वैशिष्टय़ ठरते. केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या सहकार्याने चालणारे सेंटर फॉर केमिकल इंजिनीअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च, यूजीसी नेटवर्किंग रिसोर्स सेंटर इन केमिकल इंजिनीअरिंग, सेंटर ऑफ एक्सेलन्स फॉर प्रोसेस इंटेन्सिफिकेशन, डीबीटी- आयसीटी सेंटर फॉर एनर्जी बायोसायन्सेस आणि सेंटर ऑफ ग्रीन टेक्नॉलॉजी या संशोधन केंद्रांमधूनही विद्यार्थ्यांना संबंधित विषयांशी निगडित असलेल्या मूलभूत तसेच, अद्ययावत संशोधनांचा आढावा घेता येतो. या विभाग आणि केंद्रांमधून संस्थेमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका आणि पीएचडी संशोधनासाठीचे अभ्यासक्रम चालतात.

संस्थेमध्ये बॅचलर ऑफ केमिकल इंजिनीअरिंग, बी. फार्म. हे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच डायस्टफ टेक्नॉलॉजी, फायबर्स अँड टेक्स्टाइल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, फूड इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ऑइल्स, ओलिओकेमिकल्स अँड सर्फेक्टंट्स टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री अँड टेक्नॉलॉजी, पॉलिमर इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी या विषयांमधील बी. टेक. पदवीचा अभ्यासक्रमही संबंधित विभागांमार्फत चालविले जातात. पदव्युत्तर पदवीच्या पातळीवर मास्टर्स ऑफ केमिकल इंजिनीअरिंग हा दोन वर्षे कालावधीचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम संस्थेमध्ये चालतो. विद्यार्थ्यांना फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, मेडिसिनल नॅचरल प्रोडक्ट्स या विषयांमध्ये एम. फार्म. करण्याची सुविधाही संस्थेमध्ये उपलब्ध आहे. पदवीसाठीच्या उपलब्ध विषयांसोबतच ग्रीन टेक्नॉलॉजी आणि पफ्र्युमरी अँड फ्लेव्हर टेक्नॉलॉजीमधील दोन वर्षे कालावधीचा एम. टेक.चा पदव्युत्तर अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना शिकता येतो. याशिवाय बायोप्रोसेस टेक्नॉलॉजी, फूड बायोटेक्नॉलॉजी या विषयांमधील दोन वर्षांचे पूर्णवेळ एम. टेक.चे अभ्यासक्रम, एम. ई. (प्लास्टिक इंजिनीअरिंग) तसेच, केमिस्ट्री, इंजिनीअरिंग मॅथेमॅटिक्स, फिजिक्स- मटेरिअल सायन्स, टेक्स्टाइल केमिस्ट्री या विषयांमधील दोन वर्षे कालावधीचे पूर्णवेळ एम. एस्सी.चे अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. संशोधनाच्या पातळीवर विविध विषयांमधील पीएचडीचे अभ्यासक्रमही विद्यार्थी पूर्ण करू शकतात. याच जोडीने संस्थेमध्ये केमिकल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटविषयक दोन वर्षे कालावधीचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही चालविला जातो. केवळ शनिवार आणि रविवारी चालणारा हा अभ्यासक्रमही संस्थेचे एक वेगळे वैशिष्टय़ ठरते.

सुविधा

अद्ययावत प्रयोगशाळांच्याच जोडीने या संस्थेमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम आणि संशोधनाला वाहिलेले ग्रंथालयही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. १९३४ साली स्थापन झालेले हे प्रोफेसर एम. एम. शर्मा ग्रंथालय शैक्षणिक तसेच संशोधनासाठी आवश्यक ग्रंथालयाच्या सर्व सुविधा पुरविणारी एक संस्था म्हणून ओळखले जाते. ग्रंथालयाच्या तीन मजली स्वतंत्र इमारतीमध्ये केमिकल इंजिनीअरिंग, केमिकल सायन्सेस, केमिकल टेक्नॉलॉजी आणि फार्मसीसाठीची स्वतंत्र दालने आहेत.

विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठीच्या स्वतंत्र वसतिगृहांची सुविधाही संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. या संस्थेमध्ये पदवी पातळीवर शिक्षण घेऊ  इच्छिणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी जवळपास २७७ शिष्यवृत्तीही उपलब्ध आहेत. केवळ गुणवत्ता आणि गरज या निकषांवर या शिष्यवृत्तींसाठीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांसाठी मोठय़ा प्रमाणावर मदत आणि जडणघडणीसाठीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

borateys@gmail.com