सीसॅटमधील शेवटचा आणि हमखास गुण मिळवून देणारा घटक म्हणजे निर्णयक्षमता व व्यवस्थापन कौशल्य हा घटक. एकूण १२.५ गुणांसाठी ५ प्रश्न या विभागात विचारले जातात. या प्रश्नांना नकारात्मक गुण दिले जात नाहीत, त्यामुळे भरपूर गुण मिळवायचे असतील तर अधिकाधिक समर्पक उत्तरे देणे आवश्यक आहे. या पाच प्रश्नांसाठी एकूण १० मिनिटे वापरली तर किमान १० गुणांची तजवीज होऊ शकते.

यामध्ये एखाद्या सुजाण नागरिकाचे हक्क आणि त्याची एखाद्या प्रसंगातील नागरिक या नात्याने किंवा हितसंबंधीय म्हणून असलेली कर्तव्ये यांचेशी संबंधित दैनंदिन जीवनातील पेचप्रसंग आणि त्यावरील तोडगा विचारला जातो. याचबरोबर संस्थेत किंवा प्रशासनात अधिकारपदावर असताना येणारी आव्हाने व त्यावरील तोडगा किंवा नैतिकदृष्टय़ा द्विधा मन:स्थितीत अडकविणाऱ्या समस्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. असे प्रश्न सोडविताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

*   प्रश्न लक्षपूर्वक वाचून नेमकी समस्या समजून घ्यावी.

*   या प्रसंगातील तुमची नेमकी भूमिका कोणती आहे ते लक्षात घ्यावे. कोणतीही भूमिका स्पष्टपणे तुम्हाला दिलेली नसेल तर एक सुजाण नागरिक म्हणून योग्य निर्णय घेणे तुमच्याकडून अपेक्षित आहे हे समजून घ्यावे.

*   समस्येतील सर्वात कच्चा व मजबूत पक्ष कोणता ते लक्षात घ्यावे. राज्यघटनेतील तरतुदी व तत्त्वज्ञान, सर्वसाधारण नैतिकता व नैसर्गिक न्याय, निर्बल समाजघटकांविषयी तसेच पर्यावरणीय संवेदनशीलता यांच्या आधारे समतोल दृष्टिकोन व तटस्थता ठेऊन याबाबतचे मूल्यमापन करावे.

*   दिलेले सर्व पर्याय व्यवस्थित वाचून घ्यावेत. वरील मूल्यमापनाच्या आधारे पूर्णपणे असंवेदनशील, बेजबाबदार, टोकाचे पर्याय बाद करावेत.

*   उरलेल्या पर्यायातून जास्तीत जास्त सकारात्मक आणि बहुतांश हितसंबंधियांना मान्य होऊ शकेल असा पर्याय शोधावा. असे दोन पर्याय आढळले तर जास्त दूरगामी परीणाम करणारा, कायमस्वरूपी तोडगा सांगणारा पर्याय निवडावा.

सरावासाठी एक प्रश्न पाहू या.

राज्यामध्ये प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. पण काही फेरीवाले, भाजीवाले असे किरकोळ माल विकणारे लोक अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना तुम्हाला आढळले आहेत. याबाबत त्यांना हटकले असता ग्राहकांकडून सामान ठेवण्यासाठी पिशव्यांची मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि इतर पर्यायी पिशव्यांचे दर त्यांना परवडत नसल्याने प्लास्टिकचाच वापर करणे अपरिहार्य असल्याचे तुमच्या लक्षात आणून दिले आहे. तुम्ही

*   रद्दीपासून पिशव्या बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्यामधीलच काहींना मदत आणि मार्गदर्शन कराल व प्लास्टिकचा वापर थांबवण्याची त्यांना विनंती कराल.

*   ग्राहकांना प्लास्टिकवर बंदी असल्याचे सांगून पिशवी देता येणार नाही हे स्पष्टपणे सांगण्याची विनंती विक्रेत्यांना कराल.

*   प्लास्टिकवर बंदी असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकेल हे त्यांच्या लक्षात आणून द्याल व त्यांनी दुसऱ्या पर्यायांचाच वापर करणे आवश्यक असल्यावर भर द्याल.

*    स्थानिक प्रशासनाकडे याबाबत लेखी तक्रार नोंदवाल आणि शासनाने अशा विक्रेत्यांना पर्यायी पिशव्या कमी दराने उपलब्ध करून देण्याची विनंती कराल.

या उदाहरणातील पर्याय पाहिल्यास दुसरा पर्याय कोणत्याही प्रकारे प्रभावी नाही तसेच कोणतीही जबाबदारी यातून पार पडताना दिसत नाही तसेच कोणताच तोडगाही निघत नाही. तिसरा पर्याय कायदेशीर कार्यवाहीचा धाक दाखवतो. पण त्यातून समस्येचे निराकरण होताना दिसत नाही. तसेच विक्रेते पुन्हा प्लास्टिकचा वापर करणार नाहीत याची शाश्वतीही नाही. पर्यायातील आता उरलेल्या एक व चार क्रमांकाच्या पर्यायांमधून अधिक समर्पक व या समस्येवर अंतिम तोडगा निघू शकेल असा क्रमांक एकवरचा पर्याय निवडणे अधिक संयुक्तिक ठरते. पर्याय चार हा शासनावरील अवलंबित्व वाढवतो तर पर्याय एक हा समस्येवरचा तोडगा आहेच, शिवाय विक्रेत्यांना स्वत:च पर्यायी व्यवस्था करण्यास प्रोत्साहनही देतो व दूरगामी परिणाम साधतो. त्यामुळे यामध्ये पर्याय एकला अडीच गुण, चारसाठी दीड, तीनसाठी एक तर दोनसाठी शून्य गुण मिळतील.

सर्वसाधारण व्यवहारज्ञान, नैतिकदृष्टय़ा योग्य-अयोग्य मुद्दय़ांची जाण आणि भारतीय संविधानाचे भान असल्यास कमीत कमी वेळेत हा विभाग जास्तीत जास्त गुण मिळवून देऊ शकतो. हा घटक पेपरच्या सुरुवातीला सोडवून आत्मविश्वास बळकट करायचा की, शेवटच्या दहा मिनिटांत किंवा खूपच अवघड प्रश्नांमध्ये वेळ गेल्यावर ताण दूर करण्यासाठी अशा प्रश्नांनंतर सोडवायचा हे तुम्ही स्वत:च ठरवायचे आहे. पण हे प्रश्न सोडविताना मन शांत ठेवून पर्यायांचा विचार करायला हवा आणि जास्तीत जास्त समर्पक उत्तर शोधायला हवे. हे शक्य करायचे असेल तर सराव आणि सरावाचे विश्लेषण यांना पर्याय नाही!