14 December 2017

News Flash

प्रौढशिक्षण

शिक्षणाच्या दृष्टिकोणातून साधारणत: १७०१८ वर्षांच्या वयापलीकडील व्यक्तीस प्रौढ संबोधले जाते.

लोकसत्ता टीम | Updated: April 21, 2017 12:13 AM

 

सामान्यत: ‘प्रौढ’ म्हणजे सार्वत्रिक आणि सक्तीच्या शिक्षणाची वयोमर्यादा संपलेली व स्वत:ची उपजीविका स्वत:च करावयास लागलेली व्यक्ती. शिक्षणाच्या दृष्टिकोणातून साधारणत: १७०१८ वर्षांच्या वयापलीकडील व्यक्तीस प्रौढ संबोधले जाते. व्यावसायिक आणि तांत्रिक कौशल्यांमध्ये गुणवत्ता संपादन; कौटुंबिक स्वास्थ्य, कुटुंबकल्याण आणि आरोग्य यांचे शिक्षण; आत्माविष्कार; सामूहिक, सामाजिक आणि राजकीय जीवनासाठी गुणवत्ता संपादन आणि व्यक्तिजीवनात ज्या काही त्रुटी जाणवल्या असतील, त्यांचे निराकरण हे प्रौढ शिक्षणाचे वेगवेगळे हेतू आहेत.

प्रौढशिक्षणाची वैशिष्टय़े

  • शिकणारा या वर्गात स्वेच्छेने दाखल होतो. सामान्यत: ते शिक्षण अर्धवेळ असते, सामान्यत: हे अध्ययन सामूहिक असते.
  • प्रौढशिक्षणामध्ये ज्या अध्यापनपद्धती वापरतात, त्यांचे मुख्य सूत्र व्यक्तिव्यक्तींमध्ये तसेच समूहासमूहांमध्ये विचारांची देवाणघेवाण करणे हे असते.
  • प्रौढशिक्षण योजनांची कार्यवाही करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. शिक्षणाची वेळ सायंकाळी, रात्री वा सुटीच्या दिवशी ठेवतात. शिकणाऱ्या प्रौढांसाठी विशेष सुटय़ा, रजा, विद्यावेतन, बढती इत्यादींची तरतूद केलेली असते.
  • शिक्षणक्रम शक्य तितका जीवनस्पर्शी, लवचीक, ऐच्छिक आणि उपयुक्त असा ठेवला जातो. प्रौढांची बौद्धिक क्षमता, मानसिक, भावनिक आणि स्थानिक पाश्र्वभूमी इ. लक्षात घेऊन साधने आणि अध्यापनपद्धती यांची योजना करावी लागते.
  • रात्रीच्या शाळा, अर्धवेळ वर्ग, सुटीतील अभ्यासक्रम, पत्रद्वारा शिक्षण, विद्यावेतन देऊन उमेदवाराची सोय, विद्यपीठांचे बहि:शाल अभ्यासक्रम, बहि:स्थ अभ्यासक्रमांची सोय, चित्रपट, वार्तापट, दूरचित्रवाणी इ. कार्यक्रम, छंदमंडळे इत्यादींद्वारा प्रौढशिक्षणाच्या योजना राबविल्या जातात.

First Published on April 21, 2017 12:13 am

Web Title: information on adult education