संध्याकाळचा ‘तो’ क्षण.. ‘ती’ वेळ आपण बघावं तशी दिसते..
‘सूर्य गेला देशांतरा, आणि दिशा अंधुकली
पंख दमल्या पक्ष्यांची, भिरी घरा परतली’
अशा शब्दांत गुंफून सुंदर होते संध्याकाळ.. संध्याकाळी खूप खूप माणसं जमवून धमाल गप्पा रंगवाव्यात.. स्वत:च्याच नादात दूरवर चालत सुटावं झपाझप पावलं टाकत.. जणू सूर्य तुमच्याकडे पाहतोय.. की- बघ ना माझ्याकडे एकदाच.. मग बुडतो मी.. संध्याकाळी गाणी गावीत- पाखरांची.. लहानपणीच्या आठवणी काढत.. तिच्या नजरेत नजर अडकवून खेळत राहावा खेळ पुन:पुन्हा तिला प्रेमात पाडण्याचा.. आणि त्याआधी स्वत: पुन:पुन्हा तिच्या प्रेमात कोसळण्याचा.. आकाशात चाललेला रंगोत्सव पाहात राहावा संध्याकाळभर.. आणि हे असं सगळं चांगल्या, समजूतदार, शहाण्या माणसासारखं संध्याकाळ मजेत घालवणं शक्य नसेल तर इतका उजेड करावा दिवसभर घरात, ऑफिसमध्ये- आणि खिडक्या, पडदे सगळं सगळं बंद करून तोडून टाकावं नातं त्या संध्याकाळशी.. जणू दुपारनंतर रात्रच येते.. आणि नसतंच असं काही या जगात- ज्याला ‘संध्याकाळ’  म्हणतात. हे असं काहीही करावं.. पण.. पण एकटं बसू नये संध्याकाळचं घरात..!!
नेमके दिवेही लागू नयेत वीज नसल्यामुळे; आणि पायातली शक्तीच जाऊन एका जागी बसावं लागतं एखाद्या संध्याकाळी.. आणि मग वर्षांनुर्वष आपण जुजबी, उथळ पद्धतीनं आवराआवर केलेल्या अनेक गाठोडय़ांच्या आपणच करकचून गच्च आवळलेल्या गाठी अलगद सुटतात आणि मग चारी बाजूंनी सैन्य चालून यावं तसा तुम्हीच दडवून ठेवलेला हा पसारा अंगावर धावून येतो. ग्रेससर म्हणतात तसं..

‘जेव्हा अंधारून येतो सारा अतृप्त पसारा
कुण्या अबंध जन्मांचा पक्षी साठविती चारा’
कि ती गोष्टी, किती प्रसंग, किती वाक्यं, किती संवाद आणि किती विचार अर्धवट टाकून पुढे आलेलो असतो आपण..
खूप खूप लहान असताना ऐकलेली कुजबुज.. ज्यातले शब्द जाणवतात त्या वयात, पण कळत नाहीत.. ‘बिच्चारा’ म्हटलेलं असतं आपल्याला- ते आवडलेलं नसतं. पण नंतर ‘विचारू.. विचारू’ म्हणत राहूनच जातं.. काय होतं नेमकं असं- जे माझ्यासमोर बोलता येत नव्हतं.. आईनं का विषय बदलला होता त्या दिवशी.. लांबच्या नात्यामधल्या त्या आज्जी मऊ मऊ हातांनी माझ्या गालावरून हात फिरवत का रडल्या होत्या त्या दिवशी?
अगदी लहानपणी मनात यायचं, की कळेल आपल्याला एक दिवस हे सगळं. पण आता कधी आणि कसं कळणार? ते कुजबुजणारे गेले आणि त्या आज्जीसुद्धा.परिस्थिती नसतानाही सहलीसाठी पैसे भरण्याचा हट्ट करत होतो सतत चार दिवस मी. आणि आई काहीच बोलत नव्हती. आणि मग अचानक मीच म्हटलं, ‘नाही जात मी ट्रिपला..’ तेव्हा तिनं दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन ट्रिपचे पैसे भरले आणि संध्याकाळी मला आणि माझ्या लहान बहिणीला कुशीत घेऊन रडली. मी विचारलं परवा आईला हे- तर म्हणाली, ‘‘तू हट्टी नव्हतासच.. शहाणा होतास.’’ आता त्या दिवशीचं ते सगळं मलाच आठवतंय फक्त!!त्याला मी कध्धीच आवडलो नाही. अगदी शाळा-कॉलेजच्या स्पर्धातसुद्धा आम्ही एकत्र असायचो आणि आजही. तो संगीत देण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांत.. गेली सतरा-अठरा वर्षे मी मनापासून चांगलं वागतो त्याच्याशी. ना कधी त्याच्या कामावर टीका केली, ना कधी दुखावलं. पण त्याच्या नजरेत तिरस्कार दिसतो कायम. बोलतो आम्ही व्यवस्थित; पण माझ्या प्रश्नाला त्याचं उत्तर, इतकंच. वाटतं, एकदा उपसावं सगळं खोल साठलेलं त्याच्या मनातलं, की बाबा, कधी, काय, कसं झालं नेमकं- की तू कायमचा नाराज झालास माझ्यावर. पण नाही होत असं. माझा अहम्.. त्याचा अहम्.. का योगच नाही आमच्या निखळ मैत्रीचा? सगळंच अर्धवट..सगळे सांगतात, की तिच्या मनात नव्हतंच कधी काही फार खोल.. फार खरं. तिला कॉलेजकाळात दुचाकीवरून चित्रपटाला, हॉटेलमध्ये जायची सोय हवी होती; आणि शिवाय मनापासून प्रेम करणारा माणूस हवा होता. हसतात सगळे. म्हणतात, ‘तू सोडून सगळ्यांना माहीत होतं, की ती फक्त चांगल्या पद्धतीनं वेळ घालवतीये. तूच मूर्ख होतास, की त्याला प्रेमबिम म्हणायचास. ती तर आता मागच्या जन्मीच्या माणसांइतकी अनोळखी झालीये. आता कुणाला विचारणार, की खरंच, इतकं वरवरचं होत का ते? पत्रं, बोलणं, भेटवस्तू- हे सगळं खोटं असेल; पण तिच्या डोळ्यांतलं पाणी? इतके चांगले अभिनेते असू शकतात? आवरून ठेवायला हवा हा कप्पा.. उगाचच खूप वर्षांनी दार जरा सरकवलं आणि धडाधडा अंगावर कोसळला कॉलेजकाळातला पसारा.
एका क्षणात मोठमोठय़ा प्रकल्पांमध्ये कोणाकोणाचा होकार नकारामध्ये बदलला.. का? नाही कळलं..
आपल्यासमोर खूप मनापासून आपली काळजी व्यक्त करणाऱ्या व्यक्ती अचानक आपल्या पाठीमागे तद्दन खोटं आणि वाईट का बोलले?चारी बाजूंनी धावून येतात सगळे प्रसंग. अंधारातही भिंतीवर दिसायला लागतात अनेक चेहरे. ऐकू येतात अनेक अस्पष्ट आवाज. आणि कळत नाही, की हा पसारा कधी आवरणार आपण? मानसशास्त्रामध्ये ‘अनफिनिश्ड बिझनेस’ म्हणजे न संपलेले मनातले व्यवहार.. तरंगते विचार. मनाच्या फांद्यांवर लोंबकळणारी ही भुतं..
‘मी भिऊन अंधाराला अडगळीत लपुनी जाई
ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई’
याचा अर्थ थोडा थोडा उमगतो अशा क्षणी. किती सुरावटी मनातल्या मनात विरून गेलेल्या, किती हुंकार मनातच चिरडलेले.. सगळे हात पुढे करून चालत येतात आणि म्हणतात, मला असं अर्धवट सोडून, वाटेत टाकून जाऊ नकोस.
उगीचच कधीतरी केलेला शिष्टपणा.. कधीतरी कोपरखळी मारता मारता नकळत कोणालातरी दुखवून गेल्याचा एखादा प्रसंग.. अगदी उगाचच बोललेलं एखादं ‘खोटं’.. ‘नरो वा कुंजरोवा’ म्हणत माहीत असूनही उत्तर न देण्याचा प्रसंग.. सगळं सगळं उभ राहतं त्या अंधारात. एकेकाला आवरायला हवंय. काही स्पष्टीकरणं.. काही कबुलीजबाब.. कोणाकोणाला गचांडी पकडून काही विचारायला हवंय. आणि त्यांनी इतक्या नेमक्या वेळी पक्ष बदलून माझी मदत का केली, हेसुद्धा समजून घ्यायला हवंय..!!
एखादी संध्याकाळ काही क्षण घरातल्या एका कोपऱ्यात बसलं तर इतकं सारं अंगावर येतंय. प्रश्न विचारतोय हा ‘अतृप्त’ पसारा.. गोंधळ घालतोय मनाच्या गाभाऱ्यात.. काहीतरी लिहायला बसावं एका स्वच्छ कोऱ्या कागदावर; तर हा पसारा आधीच काहीतरी खाडाखोड करून ठेवतो तिथे..
लहानपणापासूनचे कित्येक प्रश्न अजूनही अनुत्तरितच. अशी एखादी संध्याकाळसुद्धा पुरते संपूर्ण मनाला ढवळून काढायला..

हा असा अंगावर येणारा अतृप्त पसारा घेऊन येणारी संध्याकाळ टाळावी? का झपाटून घ्यावं स्वत:ला या सगळ्या प्रश्नचिन्हांनी?

इतका सारा पसारा असतानाही या मनाच्या गाभाऱ्यातून नवीन गाणं उमटेल? की अशा अस्वस्थ क्षणांचीच गाणी होतात?

शेवटी गाणं तरी असतं काय? एक संध्याकाळ.. एकाकी.. अंधारात.. आणि चहूबाजूंनी अंगावर येणारा अतृप्त पसारा!!
saleel_kulkarni@yahoo.co.in