23 November 2017

News Flash

एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प

प्रकल्पांतर्गत समाविष्ट रोगांची तपासणी व उपचार यात सुधारणा करणे.

लोकसत्ता टीम | Updated: September 14, 2017 2:32 AM

केंद्र शासन पुरस्कृत व जागतिक बँक अर्थसाहाय्यित एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प महाराष्ट्र राज्यामध्ये २१ जून २००५ पासून सुरू झाला. राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व रोग सर्वेक्षण व्यवस्थांचे एकत्रीकरण करणे हा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व स्तरांवरील माहितीची देवाणघेवाण अधिक गतिमान करणे, तसेच स्थानिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत रोग सर्वेक्षण व्यवस्थेचे बळकटीकरण करून रोग नियंत्रणाच्या उद्दिष्टास हातभार लावणे हा या प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वपूर्ण हेतू आहे.

उद्दिष्टे

  • शहरी व ग्रामीण भागात रोग सर्वेक्षण व्यवस्था अधिक बळकट करून साथरोग उद्रेक वेळेत ओळखण्याची क्षमता विकसित करणे आणि क्षेत्रीय पातळीवर साथरोग उद्रेक प्रतिबंध व नियंत्रणासाठी आवश्यक कृतीयोजना अमलात आणणे.
  • रोगनिदानाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयोगशाळांचे सक्षमीकरण करणे, तसेच अन्न व पाणी यांच्या गुणवत्तेचे नियमित संनियंत्रण करणे.
  • प्रकल्पांतर्गत समाविष्ट रोगांची तपासणी व उपचार यात सुधारणा करणे.
  • शहरी रोग सर्वेक्षण बळकटीकरण करणे.
  • खासगी वैद्यकीय व्यावसायिक, वैद्यकीय महाविद्यालये, अशासकीय संस्था तसेच जनतेच्या रोग सर्वेक्षणातील सहभागास चालना देणे.

अंमलबजावणी पद्धती

एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत विहित नमुन्यात उद्रेकजन्य रोगांची साप्ताहिक स्थिती सर्व जिल्ह्य़ांकडून ई-मेलद्वारे राज्य रोग सर्वेक्षण कक्षाकडे दर मंगळवारी सादर करण्यात येते व ती माहिती राज्य रोग सर्वेक्षण पथकाकडून दर बुधवारी संकलित करून सर्वेक्षण कक्षाकडे ई-मेलद्वारे पाठविण्यात येते.

प्रत्येक जिल्ह्य़ाकडून साथरोग उद्रेक साप्ताहिक अहवाल दर सोमवारी राज्य रोग सर्वेक्षण कक्षाकडे पाठविण्यात येतो.

एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्पाचे पोर्टल स्थापन करण्यात आले असून (www.idsp.nic.in) सर्व अहवाल पोर्टलवर सादर करण्यात येत आहेत.

वर्तमानपत्रात येणाऱ्या साथरोगविषयक बातम्यांचाही पाठपुरावा करण्यात येतो.

देशभरात कोठेही उद्भवलेली आरोग्यविषयक असामान्य परिस्थिती कळविण्यासाठी १०७५ हा राष्ट्रीय पातळीवरील एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्पाचा टोल फ्री क्रमांक आहे.

First Published on September 14, 2017 2:32 am

Web Title: integrated disease surveillance project maharashtra state