प्रस्तुत लेखात मुलाखतीच्या तयारीची आशयात्मक अंगांनी चर्चा करणार आहोत. प्रत्यक्ष तयारी करताना आशय कसा असावा (अर्थात उत्तरांचा; मत आणि भूमिकेचा), त्यास अधिक नेमके व टोकदार कसे करावे, या प्रक्रियेत विशिष्ट भूमिकेपर्यंत कसे जावे, त्यातील संभाव्य चुका कोणत्या आणि कशा टाळता येतील. इ. बाबींचा विचार करणार आहोत.

मुलाखतीच्या तयारीतील मूलभूतदृष्टय़ा महत्त्वाचा घटक म्हणजे प्रशासकीय सेवेविषयक प्राथमिक बाबींचे आकलन आणि ही सेवा निवडण्यामागील हेतू. मुलाखत मंडळ उमेदवाराकडून प्रशासकीय सेवेविषयी किमान आकलनाची अपेक्षा बाळगते. यात सनदी सेवेचे कारभारातील स्थान, तिचे स्वरूप, कार्ये आणि जबाबदाऱ्या व अधिकार लोकप्रतिनिधींशी अपेक्षित व प्रत्यक्षात असणारा संबंध, सामाजिक बदलाच्या प्रक्रियेतील तिचे स्थान यापासून ते गेल्या २५ वर्षांच्या उदारीकरणाच्या काळात तिचे बदललेले स्वरूप व भूमिका, तिच्यासमोर उभी राहिलेली आव्हाने या अंगांचा समावेश करावा. त्याचप्रमाणे प्रशासनातील दोष-त्रुटी, समस्या; त्यातील सुधारणांचा थोडक्यात इतिहास आणि सद्य:स्थितीत आवश्यक सुधारणा या मुद्दय़ांपर्यंत तयारी करणे अपेक्षित आहे. यातील किमान नागरी सेवेची कार्ये-भूमिका आणि समाज बदलाच्या प्रक्रियेतील सकारात्मक योगदान देण्याची तिची क्षमता याविषयी नेमके आकलन केलेले असावे. कारण हे आकलन उमेदवारांना नेहमी विचारल्या जाणाऱ्या एका मूलभूत प्रश्नासंदर्भात मध्यवर्ती ठरते, तो प्रश्न म्हणजे – ‘तुम्हाला नागरी सेवेत का यायचे आहे? या प्रश्नाचे एखादे छापील उत्तर असू नये. प्रत्येक उमेदवाराचे त्याविषयक एक आकलन असते, जे स्वतचा सामाजिक-आर्थिक स्तर, जीवन व्यवहाराचा अनुभव आणि भोवतालच्या परिस्थितीचे स्वतचे आकलन यातून आकारास येते. नागरी सेवेकडे आकृष्ट होण्याची प्रत्येकाची प्रक्रिया आणि कारणेही विभिन्न असतात. त्यामुळे या प्रश्नासाठी इतर कोणाकडे तयार, छापील उत्तर न मागता स्वत: विचार करून आपले उत्तर विकसित करावे. वस्तुत: प्रत्येकाकडे ते असतेच, परंतु विचारपूर्वक, नेमकेपणाने व आत्मविश्वासपूर्वक ते मांडणे अत्यावश्यक ठरते. आत्तापर्यंतच्या जीवनात शासकीय अधिकाऱ्यांशी अथवा प्रशासनाशी आलेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध, पाहिलेले एखादे विधायक कार्य अथवा प्रयोग, एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून मिळालेली प्रेरणा इ. बाबी या प्रश्नाच्या बाबतीत साहाय्यभूत ठरतात. उपरोक्त भागात म्हटल्याप्रमाणे, या प्रश्नाचे जे उत्तर दिले जाईल त्यातून उमेदवाराचा नागरी सेवेत येण्या मागील हेतू व सेवाविषयक आकलनही तपासले जाते हे लक्षात घ्यावे. म्हणूनच प्रशासकीय सेवाविषयक वर नमूद केलेल्या आयामांची तयारी करण्यावर भर द्यावा.

मुलाखतीत विचारले जाणारे बरेच प्रश्न एखाद्या महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात उमेदवाराची भूमिका काय हे तपासणारे असतात. अशा प्रश्नांसंदर्भात विद्यार्थाना एक कळीची बाब सतावत असते; ती म्हणजे एखाद्या चच्रेतील विषय, कळीचा मुद्दा वा घटनेविषयी कोणती भूमिका घ्यायची? मुलाखतीत जे माहितीवजा, तथ्याधारित प्रश्न विचारले जातात त्याबाबतीत हा मुद्दा उपस्थित होत नाही. परंतु एखाद्या मुद्याविषयी भूमिका अथवा मत आजमावणाऱ्या प्रश्नांच्या बाबतीत नेमके काय म्हणायचे असा प्रश्न उद्भवू शकतो. अशा प्रश्नासंदर्भात पुढील बाबी मार्गदर्शक म्हणून उपयुक्त ठरू शकतात. पहिले म्हणजे एखाद्या मुद्यासंदर्भातील आपली भूमिका राज्यघटनेतील कायद्याचे राज्य, मूलभूत हक्क, लोकशाही, लोकाभिमुखता, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य-समता-बंधुता, न्याय, संघराज्याचे तत्त्व या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. घटनात्मक चौकटीला समोर ठेवूनच आपली भूमिका निश्चित करावी. दुसरे म्हणजे आपली भूमिका योग्य तथ्य व माहितीवर आधारित असावी. अन्यथा वरवरच्या माहितीवर आधारित भूमिका संकटात नेण्याची शक्यताच अधिक! तिसरे, एखाद्या मुद्यांविषयी स्वतची भूमिका विकसित करताना त्याविषयी विविध मतमतांतरे आणि भूमिकांचा तौलनिक विचार केलेला असावा. त्यामुळे आपल्या विरुद्ध भूमिकेसंदर्भात विचारल्यास आत्मविश्वासपूर्वक आपले मत मांडता येईल. शेवटी, स्वत:च्या भूमिकेतील मर्यादांचाही योग्य विचार केलेला असावा जेणेकरून त्याविषयक उलटतपासणी करणाऱ्या प्रश्नांचे-उपप्रश्नांचे व्यवस्थितपणे उत्तर देता येईल. थोडक्यात, महत्त्वाच्या संभावित मुद्यांविषयी पुरेसे वाचन, चिंतन, मनन करूनच स्वत:चे मत वा भूमिका निर्धारित करावी आणि त्यासाठी समर्पक माहिती, तथ्य वा आकडेवारीचा आधार द्यावा.

मुलाखत मंडळ काही वेळा जाणीवपूर्वक एखाद्या बाबीच्या नकारात्मक अंगाविषयी मुद्दा उपस्थित करते तर काही वेळा एखाद्या विषयासंदर्भात निराशावादी चित्र उभे करते. कदाचित काही वेळा उमेदवाराकडूनच अशा प्रकारचे नकारात्मक चित्र ‘कबूल’ करवून घेण्याचा प्रयत्न करू शकते. अशा प्रसंगी उमेदवार संरक्षणात्मक पवित्रा घेण्याचा प्रयत्न करतो किंवा गोंधळजन्य स्थितीत अडकतो. जेव्हा जेव्हा अशी स्थिती/प्रसंग निर्माण होतो, तेव्हा अत्यंत आत्मविश्वासपूर्वक संबंधित बाबीची नकारात्मक बाजू मान्य करूनदेखील तिच्यातील सकारात्मक बाजू निदर्शनास आणाव्यात. कारण असे प्रश्न उमेदवार नकारात्मक, निराशावादी तर नाही ना याची चाचपणी करणारे असू शकतात. अर्थात अशा प्रश्नांसंदर्भातदेखील संबंधित घटकाचे वास्तव काय आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरते. आणि त्या विषयाची दोषात्मक, नकारात्मक बाजू माहिती असणेदेखील महत्त्वाचे ठरते. तथापि तिची सकारात्मक, रचनात्मक आणि विधायक बाजूदेखील अवगत असावी. आपला सूर सकारात्मक व आशावादी राहील याची खबरदारी घ्यावी. त्यादृष्टीने विचार करता समाज जीवनातील विविध मार्गदर्शक, विधायक प्रयोगाचे भान साहाय्यभूत ठरते. समाजाच्या विविध क्षेत्रात काही व्यक्ती, संस्था, लोक आणि प्रशासनाद्वारे जे शासकीय तसेच बिगर शासकीय पातळीवरील प्रयोग हाती घेतले गेले आहेत, त्याचा सूक्ष्म अभ्यास मुलाखतीच्या तयारीत अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.  थोडक्यात, असे म्हणता येईल की आपले उत्तर, मत वा भूमिका योग्य तथ्य व माहितीवर आधारित असावी. वरवरच्या माहितीऐवजी संबंधित मुद्यांचे सखोल आकलन केलेले असावे आणि महत्त्वाचे म्हणजे या विविध विषयांचा सखोल विचार आणि चिंतन केलेले असावे.

मुलाखतीच्या तयारी प्रक्रियेत लक्षात घ्यायची आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे उत्तराची व्याप्ती होय. मुलाखतीसारख्या तोंडी, संवादरूपी परीक्षेचा अनुभव नसल्यास आपली उत्तरे मोठी, लांबलचक, पाल्हाळ व मोघम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश विद्यार्थ्यांना पहिला ‘Mock Interview’  दिल्यानंतर ‘नेमके बोला’ असा नेहमीचा परंतु महत्त्वपूर्ण शेरा दिला जातो. त्यादृष्टीने पाहता उत्तर देताना भलीमोठी प्रस्तावना, पाश्र्वभूमी देणे कटाक्षाने टाळावे. थेट मुद्याविषयी बोलण्यास सुरुवात करणे अधिक श्रेयस्कर! त्यासाठी मुलाखतीतील विविध अभ्यास घटकांची तयारी करताना नेमक्या शब्दात, मुद्देसूद नोट्स वा टिपणे काढून ठेवावीत. आवश्यकता भासल्यास प्रश्नोत्तराच्या स्वरूपात प्रश्न व उत्तर लिहून काढावे. त्यासंदर्भातील आकडेवारी, उदाहरणेदेखील नेमकेपणाने लिहून काढावीत. अशा तयारी प्रक्रियेमुळे आपली उत्तरे नेमकी, स्पष्ट आणि प्रभावी करता येतील. दुसरी बाब म्हणजे. आपल्या उत्तराची लेखीस्वरूपात रंगीत तालीम केल्यामुळे त्यातून उद्भवणाऱ्या/संभावणाऱ्या प्रश्नांचाही अंदाज घेऊन त्याचीही तयारी विकसित करता येतील.