18 November 2017

News Flash

वेगळय़ा वाटा : मनुष्यबळ व्यवस्थापनातील संधी

महाविद्यालयातील ज्ञान आपण कसे वापरतो यावर आपल्या करिअरची शिडी उभी असते.

डॉ. जयंत पानसे | Updated: March 21, 2017 1:45 AM

कुठल्याही संस्थेमध्ये व्यवस्थापनाची पाच अंगभूत कार्ये असतात. वित्त व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, उत्पादन, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि संगणक व्यवस्थापन. यापैकी संस्था प्रभावीपणे चालण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापन. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य माणसे नेमून त्यांच्याकडून उत्तम काम करून घेणे, हे या विभागाचे मुख्य काम. चुकीच्या गुणवत्तेची माणसे नेमली गेली की ती संस्था रसातळाला गेलीच म्हणून समजा.

मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाच्या पाच मुख्य जबाबदाऱ्या असतात :

कर्मचाऱ्यांची निवड, भरती, त्यासंबंधी नोंदी, दस्तऐवज तयार करून अद्ययावत ठेवणे.

मनुष्यबळ विकास – संस्थेच्या ध्येयधोरणांप्रमाणे इतर व्यवस्थापन विभागांशी चर्चा करून त्यांची मनुष्यबळाची संख्यात्मक व गुणात्मक गरज शोधणे, प्रशिक्षणाच्या गरजांचा शोध, बढती व बदली, निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागी योग्य कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीचे नियोजन करणे, इ. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि लाभांची वेळोवेळी निश्चिती करणे. तसेच कर्मचाऱ्यांचे आरोग्य व सुरक्षा यांची काळजी घेणे. कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांसोबत उत्तम संबंध ठेवून औद्योगिक वातावरण सलोख्याचे ठेवणे. कुठल्याही संस्थेमध्ये सुरुवातीपासूनच मनुष्यबळ व्यवस्थापनाचा अधिकारी असावा लागतो. कारण वर उल्लेखलेल्या जबाबदाऱ्या अगदी पहिल्या दिवसापासूनच सांभाळाव्या लागतात. सर्वसाधारणपणे, संस्थेमधील १०० कर्मचाऱ्यांमागे मनुष्यबळ व्यवस्थापनाचा एक अधिकारी असतो.

शिक्षण :  भारतातील जवळजवळ सर्व शासकीय व खासगी विद्यापीठांमध्ये मनुष्यबळ विकास आणि व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर पदवी – एमबीए(एच आर) हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याशिवाय इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), झेविअर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट  (XLRI), टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), अशा अनेक मान्यवर संस्था एचआर प्रशिक्षणाच्या क्षेत्रात आहेत. यासोबतच तसेच, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशननेसुद्धा  (AICTE)  भारतभर काही संस्थांना असे अभ्यासक्रम चालवायला परवानगी दिली आहे. कुठल्याही विषयातील कमीतकमी ५०% गुणांसह मिळालेली पदवी ही प्रवेशाची प्राथमिक अर्हता आहे. प्रवेशासाठी एमएच सीईटी आणि सी मॅट या अनुक्रमे राज्यस्तरीय आणि देशस्तरीय प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. एमएएच सीईची (MAH-CET) ही संगणकावर इंग्रजी भाषेत द्यायची परीक्षा आहे. ही परीक्षा २०० प्रश्नांची/गुणांची असून १५० मिनिटांत पूर्ण करावयाची असते. प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण दिला जातो. प्रत्येक प्रश्नाला ५ विकल्प असून त्यातला एकच बरोबर असतो. नकारात्मक गुणपद्धती नाही. यासाठी लॉजिकल रिझनिंग, अ‍ॅबस्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड, व्हर्बल अ‍ॅबिलिटी/रीडिंग, कॉम्प्रिहेन्शन या विषयांचा यात समावेश असतो. ककट सारख्या काही संस्था स्वत:चीच प्रवेश परीक्षा घेतात. त्या देऊन विद्यार्थ्यांला प्रवेश घ्यावा लागतो. ज्यांना पूर्ण वेळ पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम करायला वेळ नसतो अशांसाठी मुक्त दूरस्थ अभ्यासक्रमही आहेत. नाशिकचे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि दिल्लीचे इंदिरा गांधी विश्वविद्यालय हे एमबीएचे दूरशिक्षण अभ्यासक्रमही राबवतात. यासोबत एचआर ग्लोबल इंडिया,  एनआयपीएमसारख्या व्यावसायिक विश्वस्त संस्था मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रातील कमी कालावधीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवतात.

नोकरीच्या संधी : शासकीय, निमशासकीय, खासगी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, छोटय़ा, मध्यम, मोठय़ा अशा सर्व प्रकारांच्या संस्थांमध्ये मनुष्यबळ व्यवस्थापन अधिकारी लागतोच. यामध्ये शासकीय कार्यालये, कारखाने, बँका, शैक्षणिक संस्था, विश्वस्त संस्था, माध्यमे – दूरदर्शन, वर्तमानपत्रे, अशा सर्वाचा समावेश होत असल्याने नोकरीच्या विस्तृत संधी आहेत. शिवाय, मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रातील सल्लागार संस्था, नोकरभरती करणाऱ्या संस्था अशा ठिकाणी तर या क्षेत्रातील प्रशिक्षित व तज्ज्ञ व्यक्तींची फार निकड भासते. एमबीए (एचआर) चा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्थांमध्येदेखील अशा व्यक्तींना प्राध्यापक म्हणून संधी मिळते. गेल्या काही वर्षांत मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रात अजून दोन प्रकारच्या संधींची भर पडली आहे – संगणकप्रणाली विकसित करणाऱ्या देशीविदेशी संस्थांना या ज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती सल्लागार म्हणून लागतात. तसेच सध्या मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रात संगणकाचा वापर दैनंदिन कामासाठी व विश्लेषणासाठी अत्यावश्यक झाला आहे, म्हणूनच मनुष्यबळ व्यवस्थापन व संगणक शास्त्र या दोन्हीचं एकत्रित ज्ञान असणाऱ्यांना विशेष संधी आहे.

एक लक्षात घ्यायला हवे की पहिल्यांदा तुम्हाला मनुष्यबळ व्यवस्थापन विभागातल्या कनिष्ठ पदावरच संधी मिळते. महाविद्यालयातील ज्ञान आपण कसे वापरतो यावर आपल्या करिअरची शिडी उभी असते. या क्षेत्रात यायचे तर पदव्युत्तर पदवीशिवाय तुमच्याकडे काही गुणकौशल्ये असणे अपरिहार्य आहे. तुम्ही उत्तम श्रोते, उत्तम वक्ते, भाषांवर प्रभुत्व असणारे, माणसांची त्वरित पारख करणारे, नम्रपणे गोड शब्दात, पण ठामपणे व्यक्त होण्याची क्षमता असणारे, उत्तम आणि संयमाने घासाघीस करणारे आणि मुख्य म्हणजे माणसांची कदर व आदर करणारे असणे आवश्यक आहे.

डॉ. जयंत पानसे dr.jayant.panse@gmail.com

First Published on March 21, 2017 1:45 am

Web Title: job in human resources