03 March 2021

News Flash

करिअरमंत्र : हवी रेल्वेतील नोकरी!

सामान्य अध्ययन, सामान्य अंकगणित, सर्वसाधारण बुद्धिमत्ता चाचणी आणि कार्यकारणभाव यावर प्रश्न विचारले जातात.

भारतीय रेल्वेमधील नोकरीच्या परीक्षेसाठी कोणती पुस्तके उपयुक्त आहेत?

                                                                                    – संदीप जावळे.

इंडियन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामार्फत कमर्शिअल अ‍ॅप्रेंटिस, ट्रॅफिक अ‍ॅप्रेंटिस, गूड्स गॉर्ड, ज्युनिअर अकांउंट्स, असिस्टंट कम टायपिस्ट, सीनिअर क्लार्क कम टायपिस्ट, असिस्टंट स्टेशन मास्टर, ट्रॅफिक असिस्टंट, सीनिअर टाइम कीपर आदींसारख्या पदांसाठी भरती केली जाते. या भरतीसाठी प्राथमिक, मुख्य परीक्षा घेतली जाते. तसेच पदांच्या गरजेनुसार टायपिंग कौशल्य जाणून घेणारी प्रात्यक्षिक परीक्षाही घेतली जाते. प्राथमिक परीक्षेचा पेपर ९०मिनिटांचा आणि १०० गुणांचा असतो. तो बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचा असतो. यामध्ये सामान्य अध्ययन, सामान्य अंकगणित, सर्वसाधारण बुद्धिमत्ता चाचणी आणि कार्यकारणभाव यावर प्रश्न विचारले जातात. आर. एस.अग्रवाल यांनी लिहिलेले क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड फॉर कॉम्पिटिव्ह एक्झामिनेशन या पुस्तकाचा अभ्यास करायला हरकत नाही. याशिवाय अनेक खासगी प्रकाशकांनी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या पेपरच्या अनुषंगाने गाइड्स प्रकाशित केल्या आहेत. तयारीची दिशा ठरवण्यासाठी या पुस्तकांचा वापर करण्यास हरकत नाही.

 

मी ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे. मी सध्या क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये एम.. करीत आहे. पण यापुढे काय करावं, याबद्दल मी अनभिज्ञ आहे. मला मार्गदर्शन करावे.

                                                                             – अंकुश चौधरी, झाडीपाडा.

अंकुश, तू जाणीवपूर्वक क्लिनिकल सायकॉलॉजीसारखा वेगळ्या वाटेने जाणारा अभ्यासक्रम निवडला आहेस. त्यामुळे तू ग्रामीण भागातला आहेस की नागरी भागातला आहेस, हा मुद्दा अगदीच गौण आहे. या विषयातील तज्ज्ञांना खासगी क्षेत्रात चांगली मागणी आहे. मात्र केवळ पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानेच उत्तम करिअर घडेल असे आजच्या काळात शक्य नाही. तुम्ही तुमच्या विषयात किती प्रावीण्य प्राप्त करता आणि त्याचा प्रत्यक्ष वापर किती प्रभावीपणे करू शकता यावर करिअरची संधी मिळणे आणि त्यानंतर प्रगती होत जाणे अवलंबून असते. सध्या विविध बाबींशी संबंधित मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. शिवाय मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्यासाठी लोक पूर्वीइतका न्यूनगंड मनात बाळगत नाही. त्यामुळे अशा तज्ज्ञांची गरज आहेच. म्हणूनच तुला या क्षेत्रात करिअरच्या विविधांगी संधी उपलब्ध होऊ  शकतात.

आयबीपीएस परीक्षेसाठी कोणते साहित्य वापरू?

– हर्षांली शिंदे.

आयबीपीएसच्या प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या प्राथमिक परीक्षेत इंग्रजी भाषा, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड आणि लॉजिकल रिझनिंग या तीन घटकांवर प्रश्न विचारले जातात. साधारणत: बारावीपर्यंतच्या इंग्रजी आणि गणितीय अभ्यासक्रमावर आधारितच हे प्रश्न असतात. त्यामुळे इंग्रजी आणि गणितीय संकल्पना स्वयंस्पष्ट असल्यास पेपर सोडवण्यास कठीण जाणार नाही. तथापि या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या स्वरूपाच्या अनुषंगाने अनेक संस्थांनी मार्गदर्शिका स्वरूपातील पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांचा वापर करण्यास हरकत नाही. मात्र ही पुस्तके म्हणजे यशाची हमखास गुरुकिल्ली आहेत असे कृपया समजू नये. गणितीय संकल्पना किंवा इंग्रजी व्याकरणाच्या संकल्पना स्पष्ट होत नसतील तर एखाद्या गुरूंचे मार्गदर्शन घेणे कधीही उपयुक्त ठरू शकते.

 

मी बीएस्सी प्रथम वर्षांत शिकत आहे. बीएस्सी स्टॅटिस्टिक्स हा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या संधी आहेत?

                                                                                     – वैभव जाधव.

बीएस्सी स्टॅटिस्टिक्स या विषयाच्या विद्यार्थ्यांना डेटा अ‍ॅनालिसीस, डेटा मायनिंग, स्टॅटिस्टिकल अ‍ॅनालिसीस, अनॅलिटिक्स, टेक्निकल असिस्टंट (स्टॅटिस्टिक्स), प्रोजेक्ट असिस्टंट, फायनान्स एक्झिक्युटिव्ह, कॅम्पेन मॅनेजर कन्सल्टंट, स्टॅटिस्टिकल ऑफिसर, कॅटॉस्ट्रॉफिक मॉडेलर, सोशल मीडिआ अ‍ॅनॅलिस्ट, प्रोसेस असोशिएट अशासारख्या करिअरच्या संधी मिळू शकतात.

 

मी सध्या बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. मला बारावीनंतर चांगल्या महाविद्यालयातून पाच वर्षांचा बीए एलएल.बी. अभ्यासक्रम करायचा आहे. त्याबद्दल कृपया माहिती द्यावी.

                                                                                      – श्रेयांश देसाई.

तुम्हाला पाच वर्षे कालावधीच्या बीए एलएल.बी. अभ्यासक्रमाच्या चांगल्या संस्थेतील प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर घेतली जाणारी कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट द्यावी लागेल. या परीक्षेद्वारे देशातील १७ नॅशनल लॉ स्कूलमध्ये विविध संवर्गातील २२५२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. ही परीक्षा साधारणत: दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात घेतली जाते. या परीक्षेचा पेपर दोन तासांचा २०० गुणांचा आणि वस्तुनिष्ठ पद्धतीचा असतो. प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी ०.२५ गुण कापले जातात. या पेपरमध्ये इंग्रजी (४० गुण), सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी (५० गुण), प्राथमिक स्वरूपाचे अंकगणित (२० गुण), विधी विषय कल चाचणी (५० गुण), कार्यकारण भाव (४० गुण) असे प्रश्न विचारले जातात.

संपर्क- clat.ac.in

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.)

 

तयार व्हा नेटसाठी!

सीएसआयआरची नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट- ‘नेट’ पात्रता परीक्षा

‘सीएसआयआर’ म्हणजेच कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चतर्फे विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांतर्गत कनिष्ठ संशोधक व प्राध्यापक पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात ‘नेट’ या राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

समाविष्ट विषय : ‘नेट’ या पात्रता परीक्षेसाठी लाईफ सायन्सेस, अर्थ, अ‍ॅटमॉस्फेरिक, ओशन अँड प्लॅनेटरी सायन्सेस, मॅथेमॅटिकल सायन्सेस, केमिकल सायन्सेस व फिजिकल सायन्सेस या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

आवश्यक पात्रता : उमेदवारांनी वर नमूद केलेल्या विषयांमधील एमएस्सी अथवा बीएस- एमएस संयुक्त अभ्यासक्रम, बी फार्म, एमबीबीएस यासारखी पात्रता कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.

विशेष सूचना : राखीव वर्ग गटातील उमेदवारांसाठी गुणांच्या टक्केवारीची अट ५०% पर्यंत शिथिलक्षम आहे.

वयोमर्यादा : कनिष्ठ संशोधक पात्रता परीक्षेसाठी अर्जदारांचे वय १ जुलै २०१६ रोजी २८ वर्षांहून अधिक नसावे. प्राध्यापक पात्रता परीक्षेसाठी मात्र वयोमर्यादेची अट नाही.

निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा घेण्यात येईल. ही निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर १८ डिसेंबर २०१६ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये  महाराष्ट्रातील नागपूर व पुणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे यशस्वी उमेदवारांची कनिष्ठ संशोधक अथवा प्राध्यापक पात्रता निश्चित करण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरायचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी १००० रु., इतर मागासवार्गीय उमेदवारांनी ५०० रु. तर अनुसूचित जाती व जमातींच्या उमेदवारांनी २५० रु. शुल्क भरणे आवश्यक आहे.

हे शुल्क त्यांना इंडियन बँकेच्या देशांतर्गत कुठल्याही शाखेत चलनाद्वारे भरता येईल.

अधिक माहिती व तपशील : या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या १३ ते १९ ऑगस्ट २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चची जाहिरात पाहावी अथवा सीएसआयआरच्या  www.ncbc.nic.in अथवा www.scinhrdg या संकेतस्थळांना भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज उमेदवारांना १६ सप्टेंबर २०१६पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावे.

डेप्युटी सेक्रेटरी (एक्झामिनेशन्स), एक्झामिनेशन्स युनिट, ह्य़ुमन रिसोर्स डेव्हलपमेंट ग्रूप, सीएसआयआर कॉम्प्लेक्स, इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटसमोर, लायब्ररी, एव्हेन्यू, पूसा, नवी दिल्ली ११००१२ .

 

औष्णिक वीज प्रकल्प अभियंता बनण्यासाठी..

सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर द्वारा संचालित थर्मल पॉवर पॉवर प्लँट इंजिनीअरिंग या विषयातील एक वर्षीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात खालीलप्रमाणे प्रवेश देण्यात येत आहे-

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक, पॉवर, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंग विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी ‘गेट’ प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

वयोमर्यादा- अर्जदारांचे वय २६ वर्षांहून अधिक नसावे.

उपलब्ध जागा : अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ६० असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.

निवड पद्धती : अर्जदारांची १० वी, १२ वी व इंजिनीअरिंग पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व ‘गेट’ च्या गुणांकाच्या आधारे त्यांना या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०१६ असून विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज सेक्रेटरी, सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर, मालचा मार्ग, चाणक्यपुरी, नवी दिल्ली-११००२१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०१६ आहे.

अधिक माहिती व तपशील

अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या १६ ते २२ जुलै २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवरची जाहिरात पाहावी, बोर्डाच्या दूरध्वनी क्र. ०११- २६८७५०१६ वर संपर्क साधावा अथवा  www.cbip.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 12:36 am

Web Title: job opportunity in indian railway
Next Stories
1 देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : समाजसेवेसाठी पाठय़वृत्ती
2 दुग्ध तंत्रज्ञानातील संधी
3 नोकरीची संधी
Just Now!
X