जगभरात साधारण साडेसहा हजार भाषा बोलल्या जातात. त्यातील दोन हजार भाषा बोलणारे लोक अगदी कमी आहेत. म्हणजे या भाषा केवळ हजारभर लोक बोलत असावेत. उर्वरित साडेचार हजार भाषांपैकी सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या अव्वल पाच भाषा म्हणजे मँडेरिन, स्पॅनिश, इंग्रजी, हिंदी आणि अरेबिक. मँडेरिनपाठोपाठ सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे स्पॅनिश. जगातल्या तब्बल २१ देशांमध्ये ही व्यवहाराची भाषा आहे. अमेरिकेतही साधारण पाचपैकी तीन माणसांना स्पॅनिशचे ज्ञान असते.

*   स्पॅनिश का शिकावी?

कुठलीही युरोपियन भाषा येणे हे एक कौशल्य मानले जाते. चांगल्या शिक्षणासोबतच एखादी परदेशी भाषा येत असेल तर नोकरीच्या बाजारात तुमची पत वाढते. त्यातही ती भाषा २१ देशांमध्ये बोलली जाणारी स्पॅनिश असेल तर मग उत्तमच. युरोपातील आर्थिक मंदीमुळे युरोपियन भाषांसाठी वाईट दिवस आहेत, अशी एक चर्चा ऐकू येते, पण स्पॅनिश ही दक्षिण अमेरिकेतही बोलली जाते. त्यामुळे त्याविषयी काळजी करू नये. विकसनशील देशांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या विकसित देशांमधील कंपन्यांना स्थानिक भाषा आणि इंग्रजी हे दोन्ही माहिती असणाऱ्यांची नेहमीच गरज असते. त्यामुळे ही भाषा येणे हे कधीही उत्तमच.

*   स्पॅनिश कुठे शिकाल?

स्पॅनिशची लिपी रोमन आहे तसेच ती फोनेटिक भाषा आहे. त्यामुळे शिकण्यासाठी सोपी आहे. लिपी रोमन असल्यामुळे मँडेरिनसारखी नवीन लिपी शिकण्याचे अवघड आव्हान नसते. जसे बोलू तसेच स्पेलिंग किंवा लिखाण असल्यामुळे तीही बाजू सोपी असते. अर्थात शब्दसंग्रह वाढवण्यासाठी नियमित अभ्यास आणि सराव गरजेचाच असतो. युरोपियन भाषा शिकण्यासाठी सहा लेव्हल्स असतात. जर्मन, फ्रेंचप्रमाणेच स्पॅनिशसाठीही ए-१, ए-२, बी-१, बी-२ आणि सी-१, सी-२ अशा सहा लेव्हल्स असतात. स्पॅनिशसाठी फिडेस्को डीआयई आणि डेले या दोन मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय परीक्षा आहेत. दोन्ही परीक्षांसाठी संवाद, ऑडिओ आणि लेखी परीक्षा असतात. स्पॅनिश शिकवणारी अधिकृत संस्था म्हणजे इन्स्टिटय़ूटो सेव्‍‌र्हाटेस. पण ही संस्था फक्त दिल्लीस्थित आहे. मुंबई किंवा महाराष्ट्रात त्याच्या शाखा नाहीत. त्यामुळे खासगी संस्था तसंच विद्यापीठ पातळीवर ही भाषा शिकता येऊ  शकते.

*    इन्स्टिटय़ूटो सेव्‍‌र्हाटेस

संपर्क – nuevadelhi.cervantes.es/en/

०११ ४३६८१९०७

*   सेन्ट्रो एस्पानॉल

संपर्क – centroespanol15@gmail.com

९८१९८२२०४९.

*    केंब्रिज इन्स्टिटय़ूट

मुंबईतील या संस्थेमध्ये परदेशी भाषांचे शिक्षण दिले जाते. इथे स्पॅनिशचेही धडे दिले जातात.  संपर्क -०२२ ६१२७३१००.

करिअरच्या संधी

स्पॅनिश भाषेचे ज्ञान असणाऱ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मुळात २१ पेक्षा अधिक देशांमध्ये ही भाषा बोलली जात असल्याने परदेशी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. शिक्षण, तंत्रज्ञान, व्यापार, परराष्ट्र व्यवहार तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणे शक्य आहे. तुम्हाला शिकवण्याची आवड असेल तर शाळा, महाविद्यालये किंवा विद्यापीठस्तरावर तुम्ही शिक्षक म्हणून काम करू शकता. याशिवाय पर्यटन क्षेत्रातही स्पॅनिश भाषेचं ज्ञान असणाऱ्यांसाठी नोकरीधंद्याच्या संधी आहेत.

वेगळ्या वाटामध्ये पुढील आठवडय़ात वाचा सौंदर्यप्रसाधन क्षेत्रांतील संधींबद्दल.

विधी शहा