ग्वाल्हेरस्थित लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल एज्युकेशन १९५७ या संस्थेची स्थापना शारीरिक शिक्षण, क्रीडा प्रशिक्षण आणि योग शिक्षण या क्षेत्रात शिक्षण-प्रशिक्षण-संशोधन करण्यासाठी भारत सरकारच्या तत्कालीन शिक्षण आणि सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आली. या संस्थेने गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये अत्युकृष्ट कार्य केल्याने नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिडिएशन कौन्सिलने ए प्लस प्लस हा दर्जा प्रदान केला आहे. देशातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेसाठी हा सर्वोच्च दर्जा समजला जातो. या संस्थेतील विविध अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या करिअर संधी सातत्याने मिळत आहेत.

या संस्थेला १९७३ साली नॅशनल ऑफ इम्पॉर्टन्सचा दर्जा देण्यात आला. या संस्थेने शारीरिक शिक्षण, क्रीडा आणि संशोधन या क्षेत्रात केलेल्या लक्षणीय कामगिरीची दखल घेऊन मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या संस्थेस १९९५ साली डीम्ड युनिव्हर्सटिीचा दर्जा प्रदान केला. असा दर्जा मिळालेली शारीरिक शिक्षण क्षेत्रातील देशातील ही एकमेव संस्था आहे. दक्षिण आशिया खंडातील ही एकमेव वैशिष्टय़पूर्ण संस्था ठरली आहे.

या संस्थेत बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन (बीपीई), मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन(एमपीई) असे वेगळे अभ्यासक्रम पहिल्यांदा देशात सुरू केले. १९८० साली या संस्थेने एम.फिल इन फिजिकल एज्युकेशन सुरू केला. त्याद्वारे असा अभ्यासक्रम पहिल्यांदा सुरू करण्याचा मान संस्थेने मिळवला आहे. या संस्थेत पीएच.डी. करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या येथे क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाशी संबंधित प्रमाणपत्र, पदविका, पदव्युत्तर पदविका असे विविधांगी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. पूर्वी तीन वष्रे कालावधी असलेला बीपीई अभ्यासक्रम आता चार वष्रे कालावधीचा करण्यात आला असून तो बी.पी.ई.एड् या नावाने ओळखला जातो. द नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन या संस्थेने या अभ्यासक्रमास मान्यता प्रदान केली आहे. या संस्थेचे काही पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम पुढील प्रमाणे आहेत.

बी.ए इन स्पोर्ट्स अ‍ॅण्ड परफॉर्मन्स

तीन वष्रे कालावधीचा आणि सहा सत्रात शिकवला जाणारा हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाला अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१८ आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ११ ते १४ जुल २०१८ रोजी ग्वाल्हेर येथे चाळणी /प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण, वय १७ वर्षांपेक्षा अधिक असावे, उमेदवाराने स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित क्रीडा स्पध्रेमध्ये भाग घेतलेला असावा.

थेट प्रवेश- इच्छुक उमेदवाराने ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा यामध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना या अभ्यासक्रमांना थेट प्रवेश देण्यात येतो. त्यांना चाळणी परीक्षा देण्याची गरज नाही. या अभ्यासक्रमासाठी विवाहित महिलांना प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाच्या काळात त्यांची प्रसूती झाल्यास त्यांना एक शैक्षणिक वर्षांसाठी अभ्यासक्रम न करण्याची सूट दिली जाते. त्यानंतर ती नव्या सत्रापासून पुन्हा अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकते. नवजात बालकास वसतिगृहात सोबत ठेवण्याची परवानगी दिली जात नाही.

प्रवेश प्रकिया

दोन टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाते.

पुढीलप्रमाणे विविध बाबींसाठी गुण निर्धारित करण्यात आले आहेत.

१) क्रीडा स्पध्रेतील सहभागासाठी १०० गुण. यासाठीची सहभाग पातळी व त्याचे गुण –

अ) आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – पहिला क्रमांक- ५० गुण / दुसरा क्रमांक- ४९ गुण/तिसरा क्रमांक- ४८ गुण / चौथा क्रमांक- ४७ गुण

ब) अधिकृत राष्ट्रीय स्पर्धा-  पहिला क्रमांक- २५ गुण / दुसरा क्रमांक- २४ गुण / तिसरा क्रमांक – २३ गुण / चौथा क्रमांक- २२ गुण

क) अधिकृत कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा/ असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सटिीज- पहिला क्रमांक- १५ गुण/ दुसरा क्रमांक- १४ गुण/ तिसरा क्रमांक – १३ गुण, /चौथा क्रमांक – १२ गुण

ड) स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या क्रीडा स्पर्धा (भारतीय ऑलिम्पिक समितीने मान्यता दिलेले क्रीडा प्रकार)- पहिला क्रमांक- १० गुण/ दुसरा क्रमांक- ९ गुण / तिसरा क्रमांक – ८ गुण.

क्रीडा प्रावीण्य चाळणी – १०० गुण. प्रवेशासाठी ही चाळणी देणे अत्यावश्यक आहे.

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षांसाठी शिक्षण शुल्क –  ७३ हजार ८०० रुपये. यामध्ये वसतिगृह आणि भोजन खर्चाचा समावेश आहे.

पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन योग एज्युकेशन.

या अभ्यासक्रमाचा कालावधी – एक र्वष. कोणत्याही विद्याशाखेतील ४५ टक्के गुण प्राप्त पदवीधरास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये ५ टक्के सूट. अभ्यासक्रमाला अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून आहे. हा अर्ज ऑनलाइनच करावा लागतो. चाळणी परीक्षा ग्लाल्हेर येथे संस्थेच्या परिसरातील डिपार्टमेंट ऑफ योगिक डिपार्टमेंट ऑफ योगिक सायन्स येथे ७ जुल २०१८ रोजी घेतली जाईल. १५ जुलपासून अभ्यासक्रमास प्रारंभ होणार आहे. विवाहित महिलांना प्रवेश दिला जातो.

प्रवेश प्रक्रिया-

१) योग कौशल्य प्रात्यक्षिक – ५० गुण,

२) लेखी परीक्षा – ५० गुण.

या परीक्षेत योग पद्धती /प्रकार, योगाभ्यास

यावर सर्वसाधारण स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमामध्ये पतंजली योग सूत्रे, योग सिद्धांत, पर्यायी उपचारपद्धती, योग तत्त्वज्ञान आणि मानसिक आरोग्य, मानवी शरीरशास्त्र अशासारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

मास्टर ऑफ आर्ट इन योग –

या अभ्यासक्रमाचा कालावधी – दोन वष्रे /चार सत्रे. कोणत्याही विद्याशाखेतील ४५ टक्के गुण प्राप्त पदवीधरास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये ५ टक्के सूट. अभ्यासक्रमाला अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून आहे. हा अर्ज ऑनलाइनच करावा लागतो. चाळणी परीक्षा ग्वाल्हेर येथे संस्थेच्या परिसरातील डिपार्टमेंट ऑफ योगिक सायन्स येथे ४ आणि ५ जुल २०१८ रोजी घेतली जाईल. १५ जुल पासून अभ्यासक्रमास प्रारंभ होणार आहे. विवाहित महिलांना प्रवेश दिला जातो.

प्रवेश प्रक्रिया

१) योग कौशल्य प्रात्यक्षिक – ५० गुण,

२) लेखी परीक्षा – ५० गुण. या परीक्षेत योगपद्धती /प्रकार, योगाभ्यास यावर सर्वसाधारण स्वरूपाचे प्रश्न विचारले, वर्णनात्मक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीचे प्रश्न जातात.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमामध्ये योगाची पायाभूत तत्त्वे, मानवी शरीरशास्त्र, संशोधन पद्धती, उपयोजित संख्याशास्त्र, पतंजली योग, हट योगाची तत्त्वे आणि प्रकार, योगथेरपी, पर्यायी उपचारपद्धती, शरीरविज्ञानशास्त्राची तत्त्वे, योग आणि मानसिक आरोग्य, निसर्गोपचार या विषयांचा समावेश आहे. प्रात्यक्षिकांमध्ये आसन, प्राणायाम, ध्यानधारणा, क्रियाबंध इत्यादी बाबी शिकवल्या जातात.

शैक्षणिक शुल्क

एम.ए आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम – २०१८ – २०१९ या शैक्षणिक वर्षांसाठी शिक्षण शुल्क – ७१ हजार ८०० रुपये. यामध्ये वसतिगृह आणि भोजन खर्चाचा समावेश आहे.

संपर्क- शक्तीनगरी, रेसकोर्स रोड, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश – ४७४००२, दूरध्वनी – ०७५१- ४०००९००, फॅक्स-४०००९९०

संकेतस्थळ – http://lnipe.edu.in

ईमेल – registrar@lnipe.edu.in