राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शासन राबवत असलेल्या निरनिराळ्या शिष्यवृत्ती, योजना यांबद्दल माहिती आपण घेत आहोत. त्या मालिकेतील हा शेवटचा भाग.

तंत्रनिकेतन संस्था – अल्पसंख्याक विद्यार्थी जास्त असलेल्या राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने भरीव निधीची तरतूद केली आहे. या विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतन संस्थाही सुरू करण्यात आली आहे. मुक्ताई नगर जि. जळगाव येथे नवीन तंत्रनिकेतन निर्माण करण्यात येत आहे. यासाठी अनुदान अल्पसंख्याक विकास विभागाकडून उपलब्ध करून दिले जाईल. या योजनेचा लक्ष्यगट अल्पसंख्याक समाजातील बेरोजगार उमेदवार असतील. त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी मदत करणे, हे त्यांचे उद्दिष्ट असेल. या समाजातील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नांदेड, पुणे व वाशिम येथे प्रत्येकी एक याप्रमाणे सहा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात येतील.

मुलींसाठी वसतिगृहाची योजना- विद्यार्थिनींना परगावी जाऊन पुढील शिक्षण घ्यायचे असल्यास मुख्य अडचण राहण्याची असते. त्यामुळे या विद्यार्थिनींसाठी सरकारने वसतिगृह योजना राबविली आहे. याचा लाभ घेऊन मुलींमधील उच्चशिक्षणाचे प्रमाण वाढेल, अशी आशा आहे. केंद्र शासनाने राज्यातील ज्या २५ जिल्ह्य़ांमधील ४३ शहरे अल्पसंख्याकबहुल क्षेत्रे घोषित केली आहेत. अशा २५ जिल्ह्य़ांमध्ये प्राधान्याने ही वसतिगृहे बांधण्यात येतील. विद्यार्थिनी त्याचा लाभ घेऊ शकतात.

मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना-  मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजनेद्वारे, अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना केंद्रीय  लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोग/बँकिंग सेवा इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाईल. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षण मिळेल. त्याचसोबत इयत्ता १०-१२वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीही विशेष शिकवणी वर्ग घेतले जातील. या योजनेअंतर्गत मुंबई, ठाणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि नाशिक या शहरांत प्रशिक्षण केंद्रांची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी सहा महिन्यांपासून ते दोन वर्षे कालावधीपर्यंतच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे. स्पर्धा परीक्षेच्या प्रकारानुसार आणि अभ्यासानुसार या अभ्यासक्रमांचा कालावधी बदलेल. उमेदवारांना ४००० ते २५,००० इतक्या रकमेचा फीसाठीचा लाभ यातून घेता येईल.

varsha100780@gmail.com

(लेखिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वरिष्ठ सहायक संचालक असून अल्पसंख्याक विकास विभागाच्या संपर्क अधिकारी आहेत.)