मी बी. कॉम पदवीधर आहे. सध्या मी एका लहान कार्यालयात ऑफिस साहाय्यक कम टायपिस्ट म्हणून एक वर्षभर काम करत आहे. पण या कामात मला समाधान नाही. मला यापेक्षा अधिक काही करायचे आहे. काय करू?

प्रणाली पाटील

आपण सीए अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करू शकता. एम.कॉम करून अध्यापनाच्या क्षेत्रात जाऊ  शकता. एमबीए फायनान्स करून एखाद्या कंपनी वा उद्योगाच्या वित्तीय व्यवस्थापनाचा भाग होऊ  शकता. टॅक्सेशन लॉ या विषयातील पदविका घेऊन त्या क्षेत्रात करिअर करता येऊ  शकेल. संगणकीय व इंग्रजी भाषिक कौशल्य वाढवल्यास तुम्हास तुमच्या कार्यालयातही नवी जबाबदारी मिळू शकते.

 मी सध्या शारीरिक शिक्षण हा विषय घेऊन बी.ए पूर्ण करत आहे. तरी मला सैन्यदलामध्ये अधिकारी होता येईल का?

आकाश घोरपडे

कम्बाइन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिस एक्झामिनेशनच्या माध्यमातून आपण इंडियन मिलिटरी अकॅडमी इथे प्रवेश मिळवू शकता.

माझे बी.ए झाले आहे. मी सध्या एमएसडब्ल्यूच्या पहिल्या वर्षांला आहे. सध्या मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. मला एमएसडब्ल्यूनंतर समाजकल्याण अधिकारी परीक्षा पद्धत अभ्यासक्रम आणि इतर नोकरीच्या संधी सांगा?

शेख मुजाहिद

अम्नेस्टी इंटरनॅशनल,ऑक्सफॅम, ग्रीन पिस आदींसारख्या अनेक एनजीओ हे एड्स निर्मूलन आणि नियंत्रण, झोपडपट्टी, स्वच्छता, दारूमुक्ती, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, प्रदूषण, वनसवंर्धन, तृतीयपंथीयांच्या समस्या, निरक्षरता अशासारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना सामाजिक कार्य विषयातील तज्ज्ञांची गरज भासते. अनेक उद्योगांनी आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी घटक सुरू केले आहेत. त्यांच्यामार्फत विविध प्रकारची समाजकार्ये सुरू करण्यात आली आहेत. अशांना एमएसडब्ल्यू केलेल्या उमेदवारांची गरज भासते. पाणी फाउंडेशन, नाम फाउंडेशन अशा संस्थांनाही तुमच्यासारख्या उमेदवारांची आवश्यकता लागू शकते. एमएसडब्ल्यू हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वा खासगी क्षेत्रात विविध संधी उपलब्ध होऊ  शकतात. या संधी विशेषत: आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, महिला व बालकल्याण, आदिवासी क्षेत्र यामध्ये विविध योजनांच्या अंमलबजवणीच्या टप्प्यांवर मिळू शकते. असे उमेदवार स्वत:ची एनजीओसुद्धा स्थापन करू शकतात. शासनामध्ये समाजकल्याण अधिकारी म्हणून संधी मिळू शकते. या पदांच्या जाहिरातीकडे लक्ष ठेवावे.

मी दहावीनंतर मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. पण मला दुसऱ्या वर्षी ड्रॉप मिळाल्याने मी प्लॅस्टिक पॉलिमर इंजिनीअरिंग करत आहे. पण ते माझ्यासाठी कठीण जात आहे. मला डिझाइन क्षेत्रात करिअर करायचे आहे. पण चांगल्या संस्थेत प्रवेश मिळू शकत नसल्याने मी प्लॅस्टिक अभियांत्रिकीचा निर्णय घेतला. मी कॅड/ऑटो कॅड हे अभ्याक्रम पूर्ण केले आहे. मला डिझाइन इंजिनीअर व्हायचे आहे. माझा निर्णय बरोबर आहे का? पॉलिमर इंजिनीअरिंगला शासकीय नोकरी आहे का? डिझाइनसाठी मी काय करू?

गणेश दिवटे, औरंगाबाद

सतत धरसोड केल्याने तुमची महत्त्वाची शैक्षणिक वर्षे वाया जातील. त्यामुळे सध्या हा विषय कठीण जात असला तरी या विषयातच अधिक कष्ट घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केल्यास बरे होईल. आजच्या काळात कोणताही अभ्यासक्रम पूर्ण केल्याबरोबर नोकरी लागेल वा रोजगार मिळेल याची शंभर टक्के शाश्वती देता येत नाही. तुम्ही अभ्यासक्रम कशा रीतीने करता आणि संबंधित विषयाचे ज्ञान ग्रहण करून त्याचा कशा प्रकारे उपयोग करू शकता यावर करिअर मिळवणे, टिकवणे आणि प्रगती करणे शक्य होऊ  शकते. तुम्हाला डिझायनिंगमध्ये रस असल्याने तुम्ही प्लॅस्टिक डिझाइनच्या क्षेत्रात जायला हवे असे वाटते.

मी बीएच्या द्वितीय वर्षांला शिकत आहे. मला पुढे एलएल.बी. करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल? या क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत का? एलएल.बी.नंतर अ‍ॅडव्हान्स्ड अभ्यासक्रम आहेत का? तसेच सायबर लॉमध्ये करिअर करायची इच्छा आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

अक्षय ढोरे-पाटील

आपण पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तीन वर्षे कालावधीचा एलएल.बी. अभ्यासक्रम करू शकता. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लॉ एमएच-सीईटी घेतली जाते. एलएल.बी.नंतर आपण एलएल.एम. हा अभ्यासक्रम करू शकता. त्यासाठी कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट द्यावी लागेल. सायबर लॉसारखे अभ्यासक्रमसुद्धा करता येतील. या क्षेत्रात भविष्यात करिअरच्या विविधांगी संधी उपलब्ध होऊ  शकतात.

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com