23 January 2018

News Flash

निवास व न्याहरी योजना

सर्वच पर्यटनस्थळावर पर्यटकांसाठी निवास व्यवस्था करणे शक्य नसते.

लोकसत्ता टीम | Updated: October 7, 2017 2:28 AM

आधुनिक काळातील प्रचार-प्रसाराची, दळणवळणाची साधने विकसित झाल्याने पर्यटन उद्योगास विशेष चालना मिळत आहे. आर्थिक दृष्टिकोनातून पर्यटन उद्योग महत्त्वाचा ठरतो. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची पर्यटकांसाठीची निवास व न्याहरी योजना कार्यान्वित आहे.

योजनेची आवश्यकता

सर्वच पर्यटनस्थळावर पर्यटकांसाठी निवास व्यवस्था करणे शक्य नसते. तसेच काही पर्यटनस्थळे ही विशिष्ट काळातच बहरलेली असतात. त्यामुळे वर्षभर अशी व्यवस्था करणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारेही नसते. यावर उपाय म्हणजे पर्यटनस्थळावरील स्थानिकांना यात सामावून घेणे होय. जेणेकरून पर्यटकांची सोय होईल आणि स्थानिकांना रोजगारही मिळेल. त्यातूनच निवास व न्याहरी या योजनेचा जन्म झाला.

रोजगाराच्या संधी

  • महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकृत मंजुरीमुळे घर मालकांना फायदा होतो. या योजनेत स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. बऱ्याच पर्यटनस्थळाच्या ठिकाणी बंगले, घरे व फ्लॅट्स रिकामे पडून असतात किंवा अशा निवासीस्थानाचा काही ठिकाणी कायमस्वरूपी वापर केला जात नाही.
  • अशा व्यवस्थेचा या योजनेखाली उपयोग करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या रिकाम्या जागांचा फायदा करून घेण्यात येत आहे. विशेषत: घरातील महिलांसाठी ही रोजगाराची चांगली संधी आहे. पर्यटक संकुल निर्माण करून आपला रिकामा वेळ दिला की उत्पन्नाचे साधन निर्माण होत आहे.
  • या योजनेत सहभागी झालेल्या स्थानिकांच्या जागांची माहिती पर्यटन विकास महामंडळामार्फत पर्यटकांना दिली जाते. तसेच पर्यटकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध होणाऱ्या निर्देशिकेमध्ये व महामंडळाच्या सकेतस्थळावरही (वेबसाइटवर) माहिती प्रसिद्ध केली जाते. जेणेकरून या घरमालकांना याचा फायदा होईल.

पर्यटकांसाठी फायदेशीर योजना

  • अनेक पर्यटनस्थळी राहण्याचा खर्च हा खूप असतो. तसेच आपल्याला पाहिजे तशा सुविधाही मिळत नाहीत.अशा वेळी निवास व न्याहरी योजनेतून उभारलेली पर्यटन संकुले किफायतशीर ठरत आहेत. स्वच्छ व घरगुती सोय झाल्यामुळे पर्यटकांचाही ओढा वाढतो.
  • राज्याबाहेरील किंवा परदेशी पर्यटकांना स्थानिकांसमवेत राहण्या, त्यांची संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते व चालीरीती आणि स्थानिक खाद्यपदार्थाची ओळख होते.

अधिक माहितीसाठी- https://www.maharashtratourism.gov.in 

First Published on October 7, 2017 2:28 am

Web Title: maharashtra tourism development corporation nivas nyahari yojana
  1. No Comments.