20 September 2018

News Flash

शब्दबोध

मूळ अरबी शब्द आहे ‘हलाक’. अरबीमध्ये हलाक म्हणजे क्लान्त, क्षीण, थकलेला, दरिद्री व्यक्ती.

डॉ. अमृता इंदुरकर

HOT DEALS
  • Apple iPhone SE 32 GB Gold
    ₹ 19959 MRP ₹ 26000 -23%
  • JIVI Revolution TnT3 8 GB (Gold and Black)
    ₹ 2878 MRP ₹ 5499 -48%
    ₹518 Cashback

हलाखी

‘सध्या तो फारच हलाखीत जगतोय.’ किंवा ‘एकेकाळी सिनेसृष्टी गाजवलेली अभिनेत्री आज मात्र हलाखीच्या परिस्थितीत जगते आहे.’ अशी वाक्ये रोजच्या बोलण्यातून किंवा वाचनातून आपल्याला सततच ऐकायला, वाचायला मिळत असतात. हलाखी म्हणजे अत्यंत दरिद्रय़ावस्था, दुर्दशा, कठीण परिस्थिती, माणसाची पडती बाजू इत्यादी अर्थाने वापरतो. पण हलाखी हा शब्द कसा बरे तयार झाला असेल?

मूळ अरबी शब्द आहे ‘हलाक’. अरबीमध्ये हलाक म्हणजे क्लान्त, क्षीण, थकलेला, दरिद्री व्यक्ती. चित्रगुप्ताच्या बखरीत या ‘हलाक’चा वाक्यप्रयोग आढळतो. – ‘दोन, तीन चपेट होऊन बहुत हलाक जहालो अहो.’ या हलाकवरून अरबीत हलाकी असे स्त्रीलिंगी रूप तयार झाले. सभासदाच्या बखरीत याचा वाक्यप्रयोग आढळतो. तर म.रा.चिटणीसकृत थोरले राजाराम महाराज ग्रंथातही पुढील

उल्लेख आढळतो. -‘लष्करात दाणा-चारा मिळेना तेव्हा हलाकीत आले.’ म्हणजे शिवकालीन मराठीपर्यंत ‘हलाकी’ असे वापरले जात होते. शिवकालोत्तर मराठीत मात्र कालौघात ‘क’ चा ‘ख’ झाला. ‘ख’ हे ‘क’ वर्गातील व्यंजन असल्यामुळे हा बदल स्वाभाविक आहे. त्यानंतर गरजू, निष्कांचन, गरीब परिस्थितीत असलेल्यासाठी तो हलाखीच्या परिस्थितीत आहे असे रूप वापरले गेले ते आजतागायत आहे.

चव्हाटा

‘घरातल्या गोष्टी चव्हाटय़ावर आणणे बरोबर नाही.’ अशी वाक्यं आपण कायमच ऐकतो. ते ऐकल्यावर हमखास आपल्या डोळ्यांसमोर, घरातून बाहेर, रस्त्यावर येऊन जमलेल्या लोकांसमोर काहीतरी वादविवाद होत आहेत असे चित्र येते. म्हणजे घरात अथवा चार भिंतीआड अथवा चार लोकांमध्ये दडलेली गोष्ट बाहेरच्या लोकांसमोर उघड करणे याअर्थी आपण चव्हाटा शब्द वापरतो. पण खरे तर मूळ पुल्लिंगी शब्द आहे ‘चवठा.’ चवठा म्हणजे चौक. जेथे लोकांची कायमच वर्दळ, गजबज असते असा चौक. अशा ठिकाणी एखाद्या गोष्टीचा उलगडा होणे म्हणजेच जगासमोर ती बाब येणे. कालांतराने चवठ मधल्या ‘व’ ला बोलाचालीत ‘ह’ येऊन जुळला व ‘चव्हाटा’ हे रूप दैनंदिन मराठीत रूढ झाले. म्हणजे चव्हाटा या शब्दामध्ये फक्त रूपबदल आहे अर्थबदल नाही.

amrutaind79@gmail.com

First Published on June 9, 2018 12:58 am

Web Title: marathi word 2