22 October 2020

News Flash

शब्दबोध

या आगसला ‘निर’ हा पूर्वप्रत्यय लागून तयार झाला निरागस.

 

 

निरागस

या शब्दाच्या दोन उपपत्ती संभवतात. पहिली म्हणजे, ‘आगस’ या नपुसकलिंगी संस्कृत शब्दाचा अर्थ आहे पातक, अपराध, गुन्हा. या आगसला ‘निर’ हा पूर्वप्रत्यय लागून तयार झाला निरागस. म्हणजे जो पातकी नाही, अपराधी नाही किंवा गुन्हा न करणारा असा.

दुसरी उपपत्ती अशी की, मराठीत ‘आकस’ म्हणजे वैर, द्वेष. प्रारंभी एक तर या ‘आगस’चे आकस झाले असावे किंवा या ‘आकस’ला ‘निर’ हा पूर्वप्रत्यय लागून त्याचे निराकस असे रूप असावे. म्हणजे मनात वैरभाव, द्वेष नसलेला. पण कालांतराने उच्चार सुकर होण्यासाठी त्याचे ‘निरागस’ झाले असावे. कारण ‘क’ ,‘ग’ या व्यंजनांपूर्वी जेव्हा आकारान्त व्यंजन येते तेव्हा उच्चारताना सहजपणे ‘क’ चा ‘ग’  तर कधी ‘ग’ चा ‘क’ होतो. जसे नागपूर असे आहे. पण बरेचदा उच्चार नाक्पूर होतो. येथे ‘ग’चा ‘क’ झाला. याचप्रमाणे ‘निराकस’ म्हणता म्हणता त्याचे आपोआपच ‘निरागस’ हे रूप तयार झाले असावे. येथे ‘क’चा ‘ग’ झाला आहे.

राजीनामा

‘राजीनामा’, हा शब्द आपल्याला नवा नाही. यात दोन शब्द आहेत. ‘राजी’ आणि ‘नामा’. हे फारसी शब्द आहेत. राजी म्हणजे कबूल आणि नामा म्हणजे लेख. कबुलीचा लेख म्हणजे राजीनामा. पण मराठीत मात्र तो त्यागपत्र या अर्थाने रूढ झाला. पदावरून पायउतार होणे किंवा वर्तमान सेवेतून मुक्त होण्यासाठी केलेला अर्ज याला राजीनामा म्हणण्यात आले. परंतु राजीनामा या शब्दाचा खरा अर्थ कबुलीपत्र एवढाच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 2:19 am

Web Title: marathi word information 2
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : परीक्षेच्या काळातील नियोजन
2 नोकरीची संधी
3 यूपीएससीची तयारी : भारताचा इतिहास
Just Now!
X