22 February 2019

News Flash

‘प्रयोग’  शाळा : इंग्लिश विग्लिश

शब्दांच्या पुढे वाक्यांवर जाताना किशोरना लक्षात आले की, विद्यार्थ्यांना सतत वहीत लिहायला आवडत नाही.

गुरुजी किशोर भागवत.

वाघिणीचे दूध असे जिला म्हटले जाते ती इंग्रजी अनेक भारतीयांना तशी अवघडच जाते. ते साहजिकच आहे. ही आपली मातृभाषाही नव्हे आणि बोलीभाषाही नव्हे. पण जिल्हा परिषद शाळा, हिवरखेड या लहानशा खेडेगावातल्या चिमुरडय़ांना मात्र विंग्रजीची भीती अज्याबात वाटत नाय, कारण आहे, त्यांचे गुरुजी किशोर भागवत.

बुलढाणा जिल्ह्य़ातील खामगाव तालुक्यात हिवरखेड हे एक लहानसे गाव आहे. इथल्या जिल्हा परिषदेच्या केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळेत शिकवतात किशोर भागवत. या गावात बहुतांश लोक मेंढपाळ समाजातील आहेत. त्यामुळे आई-वडील सतत बाहेर. मुलं त्यांच्याशिवाय आजी-आजोबांकडे किंवा इतर नातेवाईकांकडे राहतात. काही मुलं तर आई-वडिलांसोबत भटकंती करत असतात. या विद्यार्थ्यांची मुळात प्रमाण मराठी भाषेशीच फारशी दोस्ती नव्हती. अशावेळी त्यांना इंग्रजी शिकवणे, म्हणजे एक पेचच होता. पण किशोर भागवत ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीच्या मदतीने हा पेच सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

या शाळेचे सध्या पहिली आणि दुसरीचे वर्ग सेमी इंग्रजी झालेले आहेत. किशोर त्यांनाच शिकवतात. पण ज्या मुलांना मुळात मराठी मुळाक्षरांचीच ओळख नाही, त्यांच्यासाठी इंग्रजीची मुळाक्षरांची तालीम म्हणजे भलतेच कठीण. अनेक छोटय़ांना तर साधे पेन, पेन्सीलही हातात धरता येत नाही. आले तरी त्याने पटापट लिहीता येत नाही. मग अक्षर ओळख कशी होणार? यावर विचार करत असताना किशोरना या विद्यार्थ्यांचे खेळ आठवले. दगड,माती, वाळूत तल्लीन होऊन खेळणाऱ्या चिमुरडय़ांना त्यांनी या वाळूतूनच अभ्यास शिकवायचा ठरवला. मग वाळूतून तयार झाले, विविध इंग्रजी, मराठी मुळाक्षरांचे आकार. ही युक्ती मात्र बरोब्बर लागू ठरली. मुळाक्षरांशी विद्यार्थ्यांची दोस्ती झाली.

अक्षरे तर कळली पण शब्दांकडे कसे जायचे, हा विचार करत असताना किशोरला उपक्रम सुचला, अक्षर टोप्यांचा. इंग्रजी भाषेत जेवढी अक्षरे आहेत, त्या प्रत्येक अक्षराच्या त्यांनी टोप्या तयार केल्या आहेत. ज्या दिवशी वर्गात इंग्रजीचा तास असेल तेव्हा किशोर या टोप्या घेऊन येतात. प्रत्येकाला एक एक टोपी मिळते. शिक्षकांनी एखादे स्पेलिंग सांगितले की आपापली टोपी सांभाळत, त्या त्या अक्षराचे विद्यार्थी समोर येऊन थांबतात. उदा. कॅटचे स्पेलिंग सांगितले तर पहिल्यांदा ‘सी’ची टोपी घातलेल्या विद्यार्थ्यांने जायचे मग ‘ए’ आणि मग ‘टी’. या धम्माल पळापळीतून विद्यार्थ्यांना मजाही येते आणि ते स्पेलिंगही नीट लक्षात राहते. पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही वर्गात हा उपक्रम राबवला जातो. फक्त त्यातली काठिण्य पातळी कमी-जास्त होते.

शब्दांच्या पुढे वाक्यांवर जाताना किशोरना लक्षात आले की, विद्यार्थ्यांना सतत वहीत लिहायला आवडत नाही. म्हणूनच कधीकधी एखादी गोष्ट ते येत असूनही टाळतात. यासाठी किशोरनी चक्क विजेच्या तारांवर लावल्या जाणाऱ्या पट्टय़ांचा वापर केला. घरातली विजेची जोडणी झाल्यानंतर राहिलेल्या वरच्या पांढऱ्या पट्टय़ा कचऱ्यात जातात नाहीतर कोपऱ्यात. या पट्टय़ांना छान खाचा असतात. किशोरनी त्याचाच उपयोग करून घेतला. या पट्टय़ांवर त्यांनी अनेक खेळ तयार केले आहेत. त्यातील एक आहे, शब्दांचा. या पट्टय़ांचे सारख्या आकाराचे तुकडे कापून त्यात इंग्रजीतील अनेक शब्द लिहिले आहेत. त्याचसोबत क्रियापदेही लिहिली आहेत. शिक्षकांनी वर्गात एखादे वाक्य सांगितले की विद्यार्थी ते पट्टीत जोडतात. उदा. कॅट इज रनिंग हे वाक्य शिक्षकांनी सांगितले की, विद्यार्थ्यांने वरच्या पट्टीत ‘कॅट’ हा शब्द शोधून डकवायचा. त्यापुढे ‘इज’ हा शब्द डकवायचा आणि सरतेशेवटी ‘रनिंग’ हा शब्द. वाक्य कसे तयार होते, ही संकल्पना तर पक्की होते. शिवाय हे शिक्षण म्हणजे किचकट नाही, हा विश्वासही.

वन, टू, थ्री, फोर हे नंबर्स तर विद्यार्थ्यांना कळतात. पण मग फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ ही काय भानगड आहे, हे विद्यार्थ्यांना लगेच लक्षात येत नाही. याचसाठी भागवत सर रेलगाडीचा खेळ घेतात. मग वर्गातल्या वर्गात गाडी तयार होते. गाडीला डबे जोडले जातात. डब्यांना नंबर मिळतात. नंबर एक, नंबर दोन, नंबर तीन.. मग किशोर विद्यार्थ्यांना विचारतात की अमुक त्या मुलाचा डबा कितवा, त्यावर उत्तर येते तिसरा. आता तिसरा म्हणजेच थर्ड. थ्री आणि थर्डमधला फरक इतक्या सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजतो. या प्रयोगांसोबतच मॅजिक बॉक्स आणि स्वरखिडकीसारखे अनेक उपक्रमही किशोर राबवत असतात. नव्याने शोधत असतात.

स्वत: किशोरनी इंग्रजीतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. एम ए इंग्लिश केल्यानंतर सुरुवातीला त्यांनी महाविद्यालयांतही शिकवले. परंतु त्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम सुरु केले. सेवेत असतानाच बीएडही केले. किशोरना कविता करण्याचीही आवड आहे. ते इंग्रजीतून अनेक उत्तम कविता करत असतात. शिवाय ‘किशोर भागवत’ नावाचे एक यूटय़ूब चॅनलही ते चालवतात. तिथे अशा अनेक उपक्रमांचे व्हिडीओही ते शेअर करत असतात. एकूण किशोरच्याच भाषेत बोलायचे झाल्यास, त्यांच्या या लेकरांना इंग्रजी येण्यासाठी ते खूप प्रयत्न करत असतात. त्यांच्या या प्रयोगांचे अपेक्षित फळही त्यांना मिळत आहे, कधीकाळी मराठीही वाचायला घाबरणारे त्यांचे विद्यार्थी आता आत्मविश्वासाने इंग्रजी वाचू लागले आहेत.

स्वाती केतकर- पंडित : swati.pandit@expressindia.com

First Published on February 7, 2018 4:42 am

Web Title: master kishore bhagwat unique ways to teach english