मागील काही लेखांमध्ये आपण एमबीएच्या दुसऱ्या वर्षांसाठी असलेल्या विशेषीकरणाच्या (स्पेशलायझेशन) विविध पर्यायांचा विचार केला आणि वेगवेगळ्या विषयांच्या म्हणजे मार्केटिंग, फायनान्स, ह्युमन रिसोर्सेस इत्यादी विषयांच्या क्रमिक पुस्तकांपलीकडे पोहोचत अभ्यास कसा करावा हे पाहिलं. आजच्या या लेखामध्ये उत्पादन व्यवस्थापन (मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेन्ट ज्याला काही ठिकाणी ऑपरेशन्स मॅनेजमेंट म्हणतात त्याचा विचार करूयात.
उत्पादन व्यवस्थापन हा विषय स्पेशलायझेशनचा एक पर्याय आहे. या विषयाचे स्वरूप हे तांत्रिक (टेक्निकल) स्वरूपाचे असल्याने अभियांत्रिकीची पाश्र्वभूमी असणारे विद्यार्थी- विद्यार्थिनी हा विषय घेतात असा सर्वसाधारण अनुभव आहे. अर्थात या विषयाकडे वळणाऱ्यांची संख्या तशी मर्यादितच आहे. कारण एकदा अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर पुन्हा उत्पादन व्यवस्थापन का शिकायचे हा प्रश्न येतो. मात्र लक्षात घेतले पाहिजे की, या विषयात उत्पादनाचे व्यवस्थापन कसे करावे याचा विचार करण्यात आला आहे. फक्त तांत्रिक बाजू विचारात घेतलेली नाही तर उत्पादनाचे व्यवस्थापन करताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात, कोणकोणत्या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत, व्यवस्थापनाची जी मूलभूत कार्ये आहेत- उदा. नियोजन, नियंत्रण, निर्णयक्षमता आदी  उत्पादन व्यवस्थापनात कशा पद्धतीने वापरता येतात, उत्पादन व्यवस्थापनातील नवीन विचार कोणते आहेत या सर्व तसेच इतर अनेक गोष्टींचा विचार केला जातो. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेपेक्षा हा विषय वेगळा असून यामध्ये संपूर्ण उत्पादन प्रक्रियेच्या व्यवस्थापनाचा विचार केला जातो.
या स्पेशलायझेशनमधील वेगवेगळ्या उपघटकांचा विचार केल्यास असे दिसते की, यामध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये उत्पादन व्यवस्थापन हा विषय तर आहेच,  त्याशिवाय वस्तूंच्या/ उत्पादनाच्या साठय़ाचे व्यवस्थापन (इन्वेंटरी मॅनेजमेंट) तसेच उत्पादकता व्यवस्थापन, यंत्रसामग्रीच्या देखभालीचे व्यवस्थापन (मेंटेनन्स मॅनेजमेंट) उत्पदनासाठीच्या इतर बाबींचे व्यवस्थापन व नियोजन (युटिलिटी मॅनेजमेंट), सिक्स सिग्मा, पुरवठा साखळी व्यवस्थापन (सप्लाय चेन मॅनेजमेंट), टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, जागतिक दर्जाचे उत्पादन, लीन मॅन्युफॅक्चुरिंग, बिझनेस प्रोसेस रिइंजिनीअरिंग, ईआरपी (एन्टरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग), उत्पादन प्रक्रिया व व्यवस्थापन यासाठी आवश्यक असे वित्तीय व्यवस्थापन अशा उपघटकांचा समावेश होतो. आपण ज्या वेळी उत्पादन व्यवस्थापन म्हणतो त्या वेळी फक्त कारखान्यांतील उत्पादनाचाच विचार केला जाता, पण ज्या वेळी ऑपरेशन्स मॅनेजमेंट म्हटले जाते त्या वेळी फक्त उत्पादन व्यवस्थापन असा मयादित अर्थ न राहता सेवा क्षेत्रातील वेगवेगळ्या कामांचे व्यवस्थापन कसे केले जाते, हेदेखील समाविष्ट केले जाते. म्हणून ज्या विद्यापीठांमध्ये ‘ऑपरेशन्स मॅनेजमेंट’ असे विषयाचे नाव आहे, त्या ठिकाणी सेवा क्षेत्रातील  वेगवेगळ्या कामांचे व्यवस्थापन (सव्‍‌र्हिस ऑपरेशन्स मॅनेजमेंट) या विषयाचासुद्धा समावेश होतो.
वरील सर्व विवेचनांवरून लक्षात येते की, या विषयामध्ये उत्पादनविषयक वेगवेगळ्या कामांचे व्यवस्थापन कसे करावे याचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया सुरळीत कशी सुरू राहील, त्यात अडथळे कसे येणार नाहीत, उत्पादनाचे नियोजन कशा पद्धतीने करावे यासंबंधीची माहिती व त्यासाठी लागणारी विविध तंत्रे यांचा या विषयात समावेश असतो. हीच संकल्पना सेवा क्षेत्रासाठी वापरली तरी सेवा क्षेत्रात, उदा. बँका, वाहतूक संस्था इत्यादींचे दैनंदिन कामकाज सुरळीत कसे चालेल यासंबंधीचा अभ्यास करता येतो.
उत्पादनाचे काम करताना गरजेपेक्षा जास्त उत्पादन होणार नाही याची जशी काळजी घेतली जाते, तशीच काळजी गरजेपेक्षा उत्पादन कमी होणार नाही याचीही घेतली जाते. यासाठी आवश्यक असतो तो वस्तूंच्या मागणीचा अचूक अंदाज (डिमांड फोरकास्ट). वस्तूंच्या मागणीचे अंदाज कसे बांधावेत यासंबंधीच्या काही पद्धती आहेत. या पद्धतींचा अभ्यास या विषयात समाविष्ट आहे. पाठय़पुस्तके तसेच संदर्भग्रंथांमध्ये मागणीचा अंदाज कसा करावा याच्या पद्धती दिलेल्या असतातच, पण या पद्धतींचा वापर करून मागणीचा अंदाज कसा बांधावा हे आपण प्रत्यक्ष व्यवहारात करू शकतो. कोणत्याही वस्तूच्या उदा. टीव्ही संचाच्या मागणीचा अंदाज बांधून त्याची प्रत्यक्षात मागणी किती होती हे बघता येते. म्हणजेच प्रत्यक्षातील मागणी आणि मागणीचा अंदाज यामध्ये किती फरक पडला हे पाहता येते. यासाठी टीव्हीच नव्हे तर इतर वस्तूही घेता येतात. आपल्या घराजवळच्या एखाद्या शोरूममध्ये जाऊन या गोष्टी पाहता येतात.
उत्पादन व्यवस्थापनातील इतर विषय उदा. सप्लाय चेन मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट तसेच क्वालिटी मॅनेजमेंट इत्यादी विषयांच्या माहितीसाठी उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना प्रत्यक्ष भेट देणे श्रेयस्कर ठरते. मात्र अशा भेटींचेही नियोजन करायला हवे. भेटीचा उद्देश काय, ते करताना आपण कुठल्या गोष्टी लक्षात घेणार अशा गोष्टींचे नियोजन करून त्याप्रमाणे भेट  दिल्यास भेटीचा हेतू साध्य होतो. जागतिक दर्जाचे उत्पादन, लीन मॅन्युफॅ क्चरिंग या संकल्पनांचा अर्थ आणि या संकल्पना कशा पद्धतीने अंमलबजावणी केल्या जातात हे पाहणे गरजेचे आहे.
उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना भेट देणे आवश्यक ठरते. यामध्ये बँका, विमा कंपन्या, मोठय़ा कंपन्यांची सेवा केंद्रे, वित्तीय कंपन्या इत्यादी अनेक कंपन्यांचा  समावेश होतो. या भेटींतून कंपन्यांची कार्यपद्धती आणि प्रत्यक्षात सेवा कशा दिल्या जातात (सव्‍‌र्हिस डिलिव्हरी) याचा अभ्यास करता येतो. सेवा क्षेत्रामध्ये वस्तूंचे नियंत्रण व व्यवस्थापन  कसे केले जाते याचाही अभ्यास करता येतो.
उत्पादन क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे इंटरप्राइज रिसरेसेस प्लॅनिंग (ईआरपी) आणि बिझनेस प्रोसेस इंजिनीअरिंग. या दोन्ही विषयांचा उपयोग उत्पादन क्षेत्रात आणि सेवा क्षेत्रात कसा होतो याचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
वरील विवेचनावरून लक्षात येईल की, उत्पादन व्यवस्थापन किंवा इतर कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना पुस्तकांबरोबरच प्रत्यक्ष व्यवहारातील या तंत्रांचा वापर समजून घेणे गरजेचे आहे, म्हणजेच विषयाची उपयोजित बाजू समजायला हवी.
याखेरीज असेही सुचवावेसे वाटते की, दर महिन्याला केंद्र सरकारतर्फे औद्योगिक उत्पादनाच्या वाढीचा दर किती होता हे प्रसिद्ध केले जाते. याला औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (ककढ) असे म्हटले जाते. याचप्रमाणे सेवा क्षेत्रातील वाढीचा दरसुद्धा जाहीर केला जातो. हे निर्देशांक कसे काढले जातात व यावरून उत्पादन क्षेत्रातील स्थिती कशी समजते याचाही अभ्यास करता येईल.
सारांश, शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, मात्र त्यासाठी आपल्याकडे जिद्द व वेळेचे व्यवस्थापन करण्याची कला असायला हवी.
nmvechalekar@yahoo.co.in
(लेखक पुण्याच्या इंडसर्च संस्थेचे अधिष्ठाता आहेत.)

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
houses in Worli BDD
वरळी बीडीडीतील अंदाजे ५५० घरांचा ताबा वर्षाखेरीस, ३३ पैकी १२ इमारतींची कामे सुरु