News Flash

एमपीएससी मंत्र : अभ्यासाचे नियोजन व स्रोत

जागतिक तसेच भारतातील - योजना, लोकराज्य ही मासिके, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही दैनिके.

संदर्भग्रंथ निवडताना प्रामुख्याने त्या संदर्भग्रंथाचे प्रकाशन आणि लेखकाचा अनुभव याचाही विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे.

विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेखांमधून आपण संयुक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप आणि प्राथमिक नियोजन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या लेखातून आपण या परीक्षेतील सामान्य अध्ययन या विषयाच्या अभ्यासघटकांची व अभ्यासस्रोतांची निवड आणि त्यांचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे हे पाहू या.

अभ्यासक्रमाची तीन गटांत विभागणी

प्रत्यक्षात अभ्यासाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांनी विषयानुरूप अभ्यासक्रमातील मुद्दय़ांची तीन विभागांत विभागणी करावी.

अ) विभाग १ – यामध्ये त्या विषयामधील ज्या ज्या उपघटकांवर आयोगाने आत्तापर्यंत प्रश्न विचारले आहेत त्या सर्व घटकांचा समावेश करणे.

उदा.  २०१६ च्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेतील भूगोल विषयातील प्रश्न – आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते? हा प्रश्न अरण्यांच्या प्रकारांवर असल्यामुळे ‘अरण्याचे प्रकार’ हा भूगोल या घटकातील विभाग १ अंतर्गत येणारा घटक होय.

ब) विभाग २ – आंबोली आणि इगतपुरी येथे आढळणाऱ्या अरण्याच्या प्रकाराबरोबरच महाराष्ट्रात आणि भारतात आढळणाऱ्या अरण्यांचे प्रकार, त्यांची वैशिष्टे, त्या प्रदेशातील हवामान, संस्कृती आणि लोकजीवनही अभ्यासने गरजेचे आहे. हे घटक विभाग २अंतर्गत येतात.

क) विभाग ३- वरील दोन विभागांमध्ये समाविष्ट न झालेले अभ्यासक्रमाचे मुद्दे या विभागामध्ये समाविष्ट करावेत. वरीलप्रमाणे अभ्यासक्रमाची विभागणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना नक्की कोणत्या मुद्दय़ावर कितपत भर द्यावा आणि त्या मुद्दय़ावर प्रश्न कसा येऊ शकेल याचा अंदाज येऊ शकतो. सर्वसाधारणपणे पहिल्या दोन विभागांतील घटकांवर ७० ते ७५ टक्के प्रश्न येतात आणि उर्वरित प्रश्न हे तिसऱ्या विभागावरील असतात, त्यामुळे अभ्यास करताना पहिल्या दोन विभागांतील घटकांवर अधिक भर द्यावा आणि त्या घटकांतील सर्व आयामांची चोख उजळणी करावी.

संदर्भग्रंथ निवड

नेमका अभ्यास कोणता करावा याचा तपशील काढून झाल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे संदर्भग्रंथांची निवड. संदर्भग्रंथ निवडताना प्रामुख्याने त्या संदर्भग्रंथाचे प्रकाशन आणि लेखकाचा अनुभव याचाही विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. शासनाद्वारे प्रकाशित केले गेलेले संदर्भग्रंथ आणि शासनाच्या संकेतस्थळांवरून मिळणारी माहिती ही या परीक्षेच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे स्रोत आहेत; परंतु हे स्रोत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेले नसल्यामुळे आपण अभ्यास करताना त्यामधून नेमका कोणता मुद्दा उचलायचा आणि कोणता सोडून द्यायचा हे आपल्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून ठरविणे क्रमप्राप्त ठरते. प्रत्येक विषयाचे अभ्यासस्रोत पुढीलप्रमाणे आहेत.

१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील – योजना, लोकराज्य ही मासिके, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही दैनिके.

२.  नागरिकशास्त्र – महाराष्ट्र बोर्डाची इयत्ता ६ वी ते १०वी पर्यंतची नागरिकशास्त्र आणि ११वी, १२वीची राज्यशास्त्राची पुस्तके.

३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास – महाराष्ट्र बोर्डाची पाचवी, आठवी आणि अकरावीची पुस्तके, त्याचबरोबर बिपीन चंद्र यांचे ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स’ हे पुस्तक.

४.  भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह – ४ थी ते १२वीपर्यंतची महाराष्ट्र बोर्डाची पुस्तके, ऑक्सफर्ड व नवनीत स्कूल अ‍ॅटलास, ९वी ते १२वी  N.C.E.R.T ची पुस्तके.

५.  अर्थव्यवस्था – भारताची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, भारतीय अर्थव्यवस्था हे दत्त आणि सुंदरम यांचे पुस्तक.

६.  सामान्य विज्ञान – ५ वी ते १०वीपर्यंतची महाराष्ट्र बोर्डाची पुस्तके, ९वी ते १२वी  N.C.E.R.T ची पुस्तके.

७.  बुद्धिमापन चाचणी व अंकगणित – वा. ना. दांडेकर यांची गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांची पुस्तके, सातवी स्कॉलरशिप, आठवी व नववीची पुस्तके आणि १०वीची पुस्तके

हे झाले अभ्यास कोणता आणि कोणत्या संदर्भ ग्रंथातून करायचा या संदर्भात, परंतु खरी कसोटी असते ती एका तासात १००प्रश्न सोडविण्याची. यासाठी केलेल्या अभ्यासाची उजळणी, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा भरपूर सराव आणि ऋणात्मक गुणपद्धतीचा सामना करण्यासाठी अचूकतेवर भर देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अभ्यास, सराव आणि उजळणी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपण आपल्या ध्येयप्राप्तीपर्यंत निश्चितच पोहोचू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 2:11 am

Web Title: mpsc 2017 exam how to prepare for mpsc exam
Next Stories
1 रशियामध्ये एमबीबीएस
2 नोकरीची संधी
3 यूपीएससीची तयारी : भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास – १
Just Now!
X