विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेखात आपण इतिहासाचा अभ्यासक्रम, त्याची फोड, आतापर्यंत या विभागावर विचारलेल्या प्रश्नांची संख्या आणि त्यावरून अभ्यासाची दिशा यासंदर्भात चर्चा केली. आज आपण प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कोणते अभ्यासस्त्रोत वापरावेत? त्यांचा कशा प्रकारे उपयोग करून घ्यावा, या संदर्भात माहिती पाहूयात.

महत्त्वाचे घटक व अभ्यासस्त्रोत

१.  प्राचीन इतिहास –

या विभागावर आतापर्यंत महाजनपदे आणि त्यांच्या आधुनिक नावांच्या जोडय़ा, सिंधू संस्कृतीचे शोधकत्रे आणि त्यांनी शोधलेली नगरे यांच्या जोडय़ा, सिंधू संस्कृतीतील मुद्रांसाठी वापरल्या गेलेल्या दगडाचा प्रकार, महाजनपदे आणि त्यांचे राजे, बौद्ध ग्रंथ आणि त्यातील महाजनपदांचा उल्लेख, संगम साहित्यातील कवी, अश्म युग, लोह युग आणि ताम्र युगाचे अस्तित्व आढळलेले प्रदेश, प्राचीन काळातील भारतीय नाणी आणि त्यावरील ग्रीकांचा प्रभाव, अलेक्झांडरचा मृत्यू आणि त्याचा भारतीय राजकारणावरील प्रभाव, चाणक्याची विविध नावे, प्राचीन भारतातील लेखक (विशाखदत्त, अश्वघोष, भास, कालिदास, हर्षवर्धन) आणि त्यांची नाटके, अजातशत्रू आणि त्याच्या काळातील महत्त्वाच्या घटना, मेगास्थिनीस आणि त्याच्या इंडिका ग्रंथातील वर्णने, प्राचीन नद्या व त्यांची आधुनिक नावे यांच्या जोडय़ा या घटकांवर प्रश्न विचारले गेले आहेत. तर या विश्लेषणावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे या विभागामधील घटकांवर संपूर्णपणे वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ही वस्तुनिष्ठ  माहिती स्टेट बोर्डाची प्राचीन  इतिहासाची पुस्तके आणि NCERT चे प्राचीन भारत हे पुस्तक यामधून मिळू शकते.

२. मध्ययुगीन इतिहास –

या विभागावर आतापर्यंत मध्ययुगाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासात दिसणारे प्रवाह

(अद्वैत, वेदांत अशा तत्त्वज्ञानाचा विस्तार आणि चिदम्बरम मदुराई अशा मंदिरकेंद्री नगरांचा विकास), मध्य आशियायी आक्रमणे आणि भारतीय राजसत्ता, विविध मुस्लीम राजसत्ता आणि त्यांची प्रमुख केंद्रे यांच्या जोडय़ा, मध्ययुगीन कालखंडातील हिंदू राजे आणि त्यांची वैशिष्टय़े, महम्मद बिन तुघलक आणि अल्लाउद्दिन खिलजी यांच्या दरबारातील राजकीय व्यवहार, मुघल सम्राटांचा कार्यकाळानुसार क्रम, मराठय़ांची करवसुली पद्धती, अब्दुल रझाक आणि त्याच्या प्रवास वर्णनातील संदर्भ, कुतुबउद्दीन ऐबकचे राजगादीवर येण्यापूर्वीचे आयुष्य या घटकांवर प्रश्न विचारले गेले आहेत. तर या विश्लेषणावरून आपल्याला असे दिसून येते की या मध्ययुगीन कालखंडातील राजसत्ता; त्यांच्या दरबारातील घटना, राज्यकारभाराच्या पद्धती, कला, प्रदेश, प्रवास वर्णने यासंदर्भात अधिकाधिक प्रश्न विचारले जातात. यासाठी स्टेट बोर्डाची मध्ययुगीन इतिहासाची पुस्तके आणि NCERT चे मध्ययुगीन भारत हे पुस्तक वापरणे सयुक्तिक ठरेल.

प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाची रणनीती

प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाची रणनीती ठरविताना खालील गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे:

१. ठरावीक कालखंड ठरवून त्या काळातील उत्खननात सापडलेल्या वस्तू, त्यांची वैशिष्टे, उत्खननकरते, इतिहासाच्या अभ्यासाचे स्रोत, महत्त्वपूर्ण राजे, त्यांच्या दरबारात आलेले कलाकार, परकीय प्रवासी आणि त्यांची प्रवासवर्णने, झालेल्या लढाया आणि त्यांचे परिणाम, त्या कालखंडात घडलेल्या जगभरातील घटना आणि त्यांचा भारतावरील परिणाम हे मुद्दे असणारे तक्ते तयार करावेत.

२.     या घटकांवर विचारले जाणारे प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचेच असल्यामुळे आपण तयार केलेल्या नोट्स शेवटच्या घटकेपर्यंत पुन:पुन्हा वाचणे आणि त्यांची उजळणी करणे अनिवार्य असल्याची खुणगाठ बांधून त्यांच्या उजळणीचे योग्य ते नियोजन करावे.

३.     प्राचीन व मध्ययुगीन भारताचा अभ्यास करताना प्रादेशिक किंवा विविध संस्कृतींच्या राजकीय सीमा लक्षात घेणे अनिवार्य ठरते यासाठी नकाशांचा वापर करून त्या नकाशांमध्ये त्या त्या राज्याची वैशिष्टे भरून असे नकाशे दररोज नजरेखालून घातल्यास जातायेता उजळणी करणे सोपे ठरते.

या विभागांचा कालखंड खूप मोठा असल्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थी या घटकांच्या अभ्यासाच्या बाबतीत संभ्रमात असतात आणि बऱ्याचदा या अभ्यासाकडे कानाडोळा करतात; परंतु आजपर्यंत आलेल्या प्रश्नांचे जर योग्य ते विश्लेषण करून आयोगाच्या प्रत्येक प्रश्नाकडून असणाऱ्या अपेक्षा समजून घेतल्यास नक्कीच या घटकांचा अभ्यास करणे सोपे होऊ शकते. पुढील भागात आपण आधुनिक इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कोणती रणनीती वापरावी हे पाहूयात.