16 October 2019

News Flash

एमपीएससी मंत्र : राज्यसेवा पूर्व परीक्षा (सामान्य विज्ञान)

आरोग्य पोषणाशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे आणि त्याबाबत भारतातील उपक्रम माहीत असायला हवेत.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

रोहिणी शहा

राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये विज्ञान हा घटक म्हटले तर सोपा म्हटले तर अवघड असा आहे. योग्य पद्धतीने विश्लेषण करून तयारी केली तर कोणत्याही शाखेच्या उमेदवारांना हमखास गुण मिळवून देणारा असा हा विषय आहे. पण जर योग्य दृष्टिकोन नसेल तर विज्ञानाची पाश्र्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठीसुद्धा फारसा आश्वासक नसतो. या व पुढील लेखामध्ये या घटकाच्या प्रश्न विश्लेषणातून तयारीबाबत चर्चा करण्यात येईल.

कला व वाणिज्य शाखेतील उमेदवारांना विज्ञानातील संकल्पना समजायला वेळ लागू शकतो आणि त्यामुळे संबंधित विषय अवघड वाटू लागतो. त्यातच अभ्यासक्रमावरील म्हणून बाजारात उपलब्ध असलेली पुस्तके ज्या त्या लेखकाच्या परीप्रेक्ष्यातून रचण्यात आलेली असतात त्यामुळे गोंधळात आनखीन भर पडते. हा विषय सोपा करून वाचायचा असेल तर दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. – मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि राज्य पाठय़पुस्तक मंडळाची पुस्तके.

इतर पारंपरिक विषयाच्या तुलनेत विज्ञान या विषयाची प्रश्न विचारण्याची पद्धती, प्रश्नांचा दर्जा यांमध्ये एक प्रकारचे सातत्य असल्याने प्रश्नांचा पॅटर्न आणि अपेक्षित प्रश्न शोधणे तुलनेने सोपे असते. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून वर्गीकरण पद्धती, वनस्पतींचे रोग, पोषण पद्धती यावर सर्वाधिक प्रश्न विचारले गेले आहेत. या आधारावर पुढीलप्रमाणे तयारी फायदेशीर ठरेल.-

*   वर्गीकरणाच्या पद्धती व संबंधित शास्त्रज्ञ, विविध संच व विभाग व त्यातील प्राणी/वनस्पती व त्यांची वैशिष्टे, हा अभ्यास टेबलमध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीने करावा.

*   अवयवसंस्थांमधील वस्तुनिष्ठ बाबींवरच लक्ष द्यावे. प्रत्येक संस्था, अवयवसंस्था एक वेळ काळजीपूर्वक वाचून प्रत्येक संस्थेवर किमान १० प्रश्न स्वत: लिहून काढावेत किंवा तयार करावेत.

*   सूक्ष्मजीव या विषयावर केवळ एकच प्रश्न विचारला जातो म्हणून विविध सूक्ष्मजीव त्यांपासून होणारे फायदे-तोटे यांचा एक टेबल तयार ठेवावा. ते चोख समजून घेतल्यास विचारला जाणारा एकमेव प्रश्नसुद्धा खात्रीने गुण मिळवून देईल.

*   रोगांचे प्रकार- जीवाणूजन्य, विषाणूजन्य, कवकजन्य, आदिजीवजन्य, संसर्गजन्य, असंसर्गजन्य, लैंगिकदृष्टय़ा पारेषित होणारे, आनुवंशिक आजार समजून घ्यावेत.

*   वरील सर्व रोगांचा त्यांची लक्षणे, कारणीभूत घटक, प्रसार, बाधित होणारे अवयव, उपचारपद्धती अशा मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यास करावा. यासाठीही टेबल तयार करता येईल.

*   स्थूल पोषणद्रव्ये कबरेदके, प्रथिने, मेद या तिन्ही स्थूल पोषणद्रव्यांपासून मिळणारी ऊर्जा, त्यांचे महत्त्वाचे घटक, कमतरता व आधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या इ. मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा. याबाबत नवे शोध किंवा चर्चा अशा चालू घडामोडींवर लक्ष असायला हवे.

*   सूक्ष्म पोषणद्रव्ये जीवनसत्त्वे, खनिज व क्षार या पोषण द्रव्यांचा स्रोत, शरीरावरील त्यांचे परिणाम, कमतरता व अधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, ठरावीक जीवनसत्त्वांचे इंग्रजी नाव व त्या जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा घटक याची माहिती असणे आवश्यक आहे.

*   आरोग्यशास्त्र या घटकाचा अभ्यास करताना प्रत्येक घटकाचा एक तक्ता बनवून अभ्यास केल्यास वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवणे अधिक सोपे होईल.

*   राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादा रोग जास्त चच्रेमध्ये असेल तर त्याचे स्थान, प्रसार, उपचारासाठी केले जात असणारे प्रयत्न इ. चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या घटकावर विचारले जाणारे प्रश्न थेट, वस्तुनिष्ठ, चालूघामोडींवर आधारित असतात म्हणून या तिन्ही बाबींकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

*   आरोग्य पोषणाशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे आणि त्याबाबत भारतातील उपक्रम माहीत असायला हवेत.

*   आरोग्य व पोषणाबाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या महत्त्वाच्या तरतुदी नेमकेपणाने माहीत असाव्यात.

*   जैवविज्ञान विषयातील पर्यावरण हा हक्काचे मार्कस मिळवून देणारा घटक आहे असे म्हणता येईल. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये किमान एक प्रश्न हा हरितगृह वायू व पर्यावरणीय हानिकारक घटक यांवर हमखास विचारलेला असतोच.

मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून महत्त्वाच्या आणि संभाव्य घटकांवर जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ‘राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका’ हे राष्ट्रचेतनाचे सराव प्रश्न पुस्तक उपयुक्त ठरेल.

वरील सर्व घटकांसाठी शालेय पुस्तके हा सर्वात चांगला पर्याय आहे. वर्गीकरणासंबंधी विशेष अभ्यास करावयाचा असल्यास इ. अकरावी विज्ञान हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. मागील काही परीक्षांमध्ये यांमधून थेट प्रश्नदेखील विचारले गेल्याचे दिसते.

वरील सर्व घटकांच्या पाठांतराऐवजी संकल्पना वस्तुनिष्ठ बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. विज्ञानमधील जुन्या सर्वमान्य संकल्पना, त्याचे निष्कर्ष बदलत नाहीत म्हणून काही नवीन बाबी सोडल्यास अभ्यासक्रमामध्ये दिले गेलेल सद्धांतिक विज्ञान योग्य रीतीने समजून घेतल्यास इतर विषयांपेक्षा जास्त आत्मविश्वास या घटकासाठी येतो.

First Published on January 4, 2019 2:42 am

Web Title: mpsc exam 2019 useful tips for mpsc exam preparation