विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेखात आपण साहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेचे स्वरूप पाहिले. आज आपण प्रश्नपत्रिका विश्लेषणाची प्राथमिक माहिती आणि अभ्यासाचे नियोजन करताना पार कराव्या लागणाऱ्या टप्प्यांची सविस्तर माहिती घेऊ या.

स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षांतील फरक

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे या परीक्षांचे वेगळेपण. या परीक्षांना सामोरे जाताना आपल्यासमोर असणाऱ्या आव्हानांचा वेध घेऊन पुढे मार्गक्रमण करावे लागते. सर्वसाधारणपणे पदवीपर्यंतचे शिक्षण घेताना आपण आपल्या विद्यापीठाने किंवा बोर्डाने ठरवून दिलेल्या निश्चित अभ्यासस्रोतातून (पाठय़पुस्तके) अभ्यास केलेला असतो. पदवीपर्यंत दिल्या गेलेल्या शाळा-कॉलेजातील परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये प्रामुख्याने खालील फरक दिसून येतो.

या परीक्षांसाठी आयोगाने ठरवून दिलेला निश्चित अभ्यासस्रोत नसल्यामुळे या परीक्षा अवघड ठरतात. आयोगाच्या अपेक्षा जाणून घेऊन जर योग्य रणनीती अमलात आणली तर या अवघड वाटेवरचा प्रवास निश्चितच पूर्ण करता येतो. आयोग विद्यार्थ्यांशी फक्त तीनच माध्यमातून संवाद साधतो.

१. अभ्यासक्रम

२. प्रश्नपत्रिका

३. निकाल

आयोगाने या तीन माध्यमातून जे संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आहेत त्यांचा योग्य अन्वयार्थ ज्याला लावता येतो तो या स्पर्धा परीक्षांची बाजी मारून जातो. म्हणूनच संयुक्त पूर्व परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम आपण या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहू या.

पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 

१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.

२. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन.)

३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास

४. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.

५. अर्थव्यवस्था –

अ) भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.

ब) शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.

६. सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशास्त्र (झुलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजीन).

७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि अभ्यासक्रमाशी सांगड यातून अभ्यासाचे नियोजन –

अभ्यासाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे अत्यावश्यक आहे. जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करताना प्रथम प्रत्येक प्रश्न वाचून स्वतला पुढील प्रश्न विचारावेत.

१. हा प्रश्न का विचारला गेला असावा?

२. या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडून का अपेक्षित आहे?

३. हा प्रश्न अभ्यासक्रमाच्या कोणत्या घटकाशी निगडीत आहे?

४. अभ्यासक्रमाच्या एकाच घटकाशी संबंधीत प्रश्न आहे की इतर घटकांशी संबंधीत प्रश्न आहे?

५. याच घटकावर अजून कोणकोणत्या आयामांतून प्रश्न विचारता येतील.?

६. प्रश्नातील घटकाचे उपघटक कोणते असू शकतील?

वरील प्रश्नांची जी उत्तरे तुम्हाला मिळतील ती उत्तरे म्हणजेच तुमची  Primary To Do List असेल. ही  बनविल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि अभ्यासक्रमाशी सांगड घालणे होय. या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी २०१३ सालापासून अर्थात परीक्षेचे स्वरूप बदललेल्या सालापासून आत्तापर्यंत STI, PSI व Assistant/ASO (सहायक कक्ष अधिकारी) या पदांसाठी झालेल्या सर्व पूर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका समोर ठेवून अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावर किती आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहेत ते टिपून ठेवले पाहिजे.

STI, PSI U Assistant/ASO या तिनही पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम समानच असल्यामुळे गेल्या चार वर्षांतील या सर्वच प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास विद्यार्थ्यांना आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे सुकर होऊ शकते. या प्रकारचे विश्लेषण केल्यानंतर आपल्याला अभ्यासक्रमातील कोणत्या घटकावर अधिक भर द्यायचा आणि कोणत्या घटकावर कमी भर द्यायचा याचा अंदाज येऊ शकतो आणि आपले अभ्यासाचे नियोजन नक्की करता येते.

निकालाचे विश्लेषण केल्यास आपल्या एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे पूर्व परीक्षा असो वा मुख्य परीक्षा असो तुम्ही ६० टक्क्यांपर्यंत जर

पोहोचू शकलात तर तुम्हाला पद मिळण्याची शाश्वती नक्कीच असते. त्यामुळे योग्य अभ्यासघटकांची निवड, त्यांची अभ्यासक्रमाशी योग्य सांगड आणि निवडलेल्या घटकांचा सारासार अभ्यास व उजळणी या त्रिसुत्रीच्या माध्यमातून आपण आपल्या ध्येय्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. पुढील लेखांत आपण पूर्व परीक्षेच्या अभ्यासस्त्रोतांबद्दल  चर्चा करुयात.