विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेची तुमची तयारी जोरात सुरू असेल. याच परीक्षेतील चालू घडामोडींसाठी उपयोगी असलेल्या वनाच्छादन आणि पर्यावरण अशा काही परीक्षोपयोगी मुद्दय़ांची माहिती घेऊ यात.

राज्यातील एकूण भूभागाच्या ३३ टक्के वृक्षाच्छादन करणे हे एक फार मोठे आव्हान आहे. सध्या आपल्या राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील २१ टक्के भाग वनाखाली आहे. सजीवांच्या जगण्यासाठी प्राणवायूची निर्मिती करणे तसेच वातावरणातील कर्बवायू कमी करणे, त्याचबरोबर जमिनीची धूप थांबणे तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याचे कामही वृक्ष करतात.

नदीचे पात्र, त्याची खोली व नदीची पाणी वाहण्याची क्षमता या सर्व बाबी पूर नियंत्रित करण्यासाठी खूप मोठी कामगिरी बजावतात. वृक्षाच्छादन नसल्याने महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्व भागात व मराठवाडय़ात नद्यांची पाणी धारण करण्याची क्षमता कमी होऊन पावसाळ्यातील ठरावीक काही काळ वगळता, नदी पात्रे कोरडी पडलेली दिसतात. या दोन्ही बाबींवरून नदीकिनाऱ्यावर वृक्षाच्छादनाचे महत्त्व लक्षात येते.

या अनुषंगाने राज्यातील वनाच्छादन वाढावे आणी नद्यांमधील पाण्याची पातळी टिकून राहावी अशा उद्देशांनी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यांचा थोडक्यात गोषवारा पुढीलप्रमाणे-

* महाराष्ट्र शासनाचा वनविभाग व संपूर्ण शासन यंत्रणा पुढील दोन वर्षांत ४६ कोटी रोपांची लागवड वन व वनेतर क्षेत्रात करणार आहेत. याचाच अर्थ २०१७, २०१८ व २०१९ या वर्षांत ५० कोटी रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

* ही लागवड करीत असताना स्थानिक प्रजातीची रोपे लावण्याचा भर देण्यात आलेला आहे. निम, शिसव, वड, उंबर, पिंपळ, आवळा, बेहडा अशा स्थानिक प्रजाती वाढवून मग त्याची लागवड वनक्षेत्रात व वनेतर क्षेत्रात करण्यात येणार आहे.

* रोपे लावण्यासाठी जागेची निवड सामान्यत: मोकळी जागा, धूप झालेली जमीन किंवा कमी प्रतीचे क्षेत्र पाहून केली जाते. नदीच्या किनाऱ्यांची धूप थांबविण्याचे महत्त्व ओळखून या वर्षांपासून महत्त्वाच्या नद्यांच्या दोन्ही बाजूला सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या जमिनीवर रोपे लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम वनविभागाकडून करण्यात येणार आहे. ५० कोटी रोपे लागवडीच्या हरित चळवळीअंतर्गतच हा कार्यक्रम येतो.

नदीकिनाऱ्या वर वनाच्छादन असल्यास पर्यावरणाच्या दृष्टीने पुढील महत्त्वाचे फायदे होतात.

* नदीकिनारी असलेल्या वृक्षाच्छादनामुळे/ वनांमुळे त्या परिसरात पावसाचे प्रमाण वाढते.

* नदीकिनारी असलेल्या वृक्षांची मुळे मातीमध्ये रुजून वृक्ष आणि माती यांना एकत्रितपणे धरून ठेवतात. त्यामुळे जमिनीची धूप थांबत असल्याने नदीपात्रात गाळ साठण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते.

* रोपांची मुळे व त्या सभोवतालची माती एकत्रितपणे एखाद्या स्पंजप्रमाणे काम करून जास्त पाणी शोषून घेतात आणि साठवून धरतात. त्यामुळे नदीची पाणी संवर्धन करण्याची क्षमता मोठय़ा प्रमाणावर वाढून पाणीपातळीतही वाढ होते.

* नदी जेव्हा समुद्राला मिळते त्यापूर्वी नदीकिनाऱ्यालगतची वने/ वृक्षाच्छादित जमीन त्या भागातील शेतातील रासायनिक खतांचा अंश शोषून घेतात. याचा उपयोग समुद्रातील सागरी जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी होतो.

* भिमा नदी कृष्णा नदीला मिळण्यापूर्वी महाराष्ट्रात सुमारे ४५२ किमीचा प्रवास करते. भिमा नदीच्या परिसरात सुमारे १२.३३ दक्षलक्ष लोक राहतात. या नदीच्या परिसरात एकूण लहान-मोठी २२ धरणे आहेत. पंढरपूरला चंद्रकोरीसारखी दिसणारी भिमा चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. नमामी गंगे अभियानाच्या धर्तीवर राज्यात नमामी चंद्रभागा अभियान राबविण्यात येत असून याअंतर्गत या नदीचे पुनर्भरण करण्यासाठी नदीकिनारी रोपे लागवड  करण्यात येणार आहे. त्यासाठी नदीच्या किनारी दोन्ही बाजूने ५०० मी. अंतरावर रोपे लावण्याचे काम सन २०१७च्या पावसाळ्यापासून करण्यात येत आहे.

* या परिसरामध्ये वृक्ष प्रजाती लावताना नदीकिनाऱ्यावर वड, उंबर, कडुिनब, पिंपळ, चिंच, कदंब यांसारखी झाडे तर शेतीच्या बांधावर बांबू, हादगा, भेंडी, कडुिनब त्याचप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा बकाण, भेंडी, पांगारा, आकाशनीम यांसारखी झाडे लावण्यात येणार आहेत. फळबागांसाठी सिताफळ, आंबा, पेरू इत्यादी प्रजाती लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

* राज्यातील वनाच्छादन वाढणे पर्यावरणीयदृष्टय़ा आवश्यक आहेच, पण जलसंवर्धन होण्यासाठी याचा कल्पक वापर हे या योजनांचे वेगळेपण आहे.