अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना नेहमीच एक सल्ला दिला जातो, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून अभ्यासाची स्वत:ची रणनीती ठरवा. बहुतेक उमेदवार तसे करतातसुद्धा. पण जेव्हा परीक्षा होते त्यावेळचा अनुभव मात्र वेगळाच असतो. ८ एप्रिल रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडली. उमेदवारांनी विश्लेषण केले असेल, आडाखे बांधले असतील, कमी महत्त्वाचे, अति महत्त्वाचे असे ठरवून अभ्यास केला असेल. पण जेव्हा प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका हातात येते, तेव्हा लक्षात येते की आयोगाची प्रश्नपत्रिका आपल्या अंदाजाच्या एक तर दोन पावले पुढे आहे किंवा दोन पावले मागे आहे. उमेदवार आणि आयोग ‘हम साथ साथ हैं’ असा अनुभव एक तर फार कमी वेळा किंवा फार कमी प्रश्नांबाबत येतो. कधी मागे, कधी पुढे तर कधी बरोबर या अनुभवालाच परीक्षा म्हणतात. उमेदवारांचे कर्तव्य अभ्यास करून परीक्षा देणे आणि आयोगाची जबाबदारी परीक्षा घेणे. म्हणून तयारी करून अभ्यास केलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेछा.

अनुभवांतून आपण शिकतो आणि शिकले पाहिजे. अनुभवातून शिकता येत नसेल तर विद्यार्थी म्हणून घडता येणार नाही. एका परीक्षेच्या निमित्ताने स्वत:च्या उणिवा, कमतरता आणि शक्तीस्थळेसुद्धा शोधता आली पाहिजेत. जे साध्य करायचे आहे त्यानुसार आपल्या आयुष्यातील प्राधान्यक्रम ठरले पाहिजेत. आणि प्राधान्यक्रमानुसार मेहनत करता आली पाहिजे. तर यश निश्चित.

परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांत मोठी संख्या नव्या म्हणजे पहिल्यांदा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची असते. दोन्ही पेपर अवघड गेले असतील, केलेल्या अभ्यासापेक्षा वेगळाच पेपर होता अशी भावना झाली असेल तर अशा उमेदवारांनी अपेक्षाभंगाचे ओझे वाहून घेण्याचे कारण नाही. पहिल्या परीक्षेच्या अशा अनुभवाला सर्वानाच सामोरे जावे लागते.

कधी ना कधी प्रत्येकानेच पहिली परीक्षा दिलेली असते. या नराश्य अनुभवातून सगळेच गेलेले असतात. अनुभवातून गेलेले असण्यापेक्षा अनुभवातून शिकलेले असणे महत्त्वाचे. कारण असे उमेदवारच पुढे यशस्वी झालेले असतात.

पहिलाच प्रयत्न असणाऱ्या उमेदवारांनी नव्या उमेदीने तयारी सुरू केली पाहिजे. सर्वप्रथम हे समजून घ्या की परीक्षेच्या तयारीसाठी गांभीर्य आवश्यक आहे. पूर्व – मुख्य – मुलाखत या अशा परीक्षा प्रक्रियेसाठी एक वर्षांचा कालावधी लागतो. परीक्षेपूर्वी तयारीसाठी किमान सहा महिने दिले तरी एका प्रयत्नासाठी दीड वर्षे, दोन प्रयत्नांसाठी अडीच वर्षे असा कालावधी द्यावा लागतो. वरवरचा अभ्यास, मोजके गाइड्स किंवा रेडीमेड नोट्स असा अभ्यास उपयुक्त नाही. त्यासाठी बेसिक पुस्तकांपासून अभ्यास करावा लागेल. जाणकारांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. तरच तुमच्या तयारीला दिशा मिळेल. नव्या उमेदवारांची तयारीची सुरुवात मुख्य परीक्षेच्या अभ्यासापासून झाली पाहिजे.

जुने उमेदवार ज्यांनी यापूर्वी एक-दोन अटेंप्ट दिले आहेत अशा उमेदवारांनी जास्त वेळ पूर्व परीक्षेनंतरच्या रोमँटीसिझममध्ये न अडकता तात्काळ मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली पाहिजे. नव्या आणि जुन्या उमेदवारांसाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम मुख्य परीक्षेची तयारी हाच असला पाहिजे.

राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर काहींना अवघड तर काहींना सोपा गेला अशा संमिश्र प्रतिक्रिया आहेत. दुसरा पेपर मात्र बहुतांश जणांना सोपा गेल्याची प्रतिक्रिया आहे. ज्या उमेदवारांचा मूलभूत अभ्यास चांगला झाला आहे आणि ज्यांनी आपल्या अभ्यासाचे उपयोजन करण्याचा सराव केला आहे त्यांना सोपा गेला आहे. पेपर दोन हा वेळेचे योग्य नियोजन करू शकलेल्या सर्वानाच सोपा गेला आहे. एकूण उपलब्ध जागा कमी आणि कमी काठीण्य पातळीचे पेपर यामुळे कट ऑफ रेषा २०० ते २२० दरम्यान स्थिरावेल असा अंदाज आहे. मात्र याबाबत जास्त चर्चा न करता पुढची तयारी सुरू झाली पाहिजे. येत्या १३ मे २०१८ रोजी दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आहे. त्यानंतर जून २०१८मध्ये नागरी सेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा होत आहेत. तेव्हा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या मूडमधून बाहेर येऊन या परीक्षांची तयारी सुरू झाली पाहिजे.