स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या प्राधान्यक्रमात सध्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी हा विषय असेल. ८ एप्रिल २०१८ ही राज्यसेवा पूर्वपरीक्षेची प्रस्तावित तारीख आहे. जाहिरातीमध्ये उल्लेखीत ६९ ही पदसंख्या उमेदवारांच्या चिंतेत भर घालणारी आहे. पण उपलब्ध पदसंख्येचा जास्त विचार न करता, अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जाहिरातीत उपलब्ध ६९ पदसंख्येबरोबरच ‘पदसंख्येत व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे,’ असे नमूद आहे आणि ते प्रत्येक वर्षीच्या जाहिरातीत असतेच. पूर्व-मुख्य-मुलाखत ही साधारणपणे वर्षभर चालणारी परीक्षा प्रक्रिया संपता संपता पदसंख्येत वाढ होते, हा नेहमीचा अनुभव आहे. तेव्हा पदसंख्या कमी किंवा जास्त याचा विचार न करता आपण स्पर्धेत किती समर्थपणे उतरू शकतो आणि स्पर्धा जिंकू शकतो हाच आपल्या चिंतेचा आणि प्रयत्नांचा भाग असला पाहिजे. काही उमेदवारांनी राज्यसेवेचा पर्याय बाजूला ठेऊन ६ मे २०१८ रोजी प्रस्तावित असलेली महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची पूर्णवेळ तयारीचा मानस बोलून दाखविला. केवळ कमी पदसंख्या हे परीक्षा टाळण्याचे किंवा नाकारण्याचे कारण होऊ शकत नाही. आपण पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवार आहोत तर प्रत्येक परीक्षा ही संधी मानली पाहिजे. स्पर्धेत टिकण्यासाठी, चार्ज होण्यासाठी व पुढे जाण्यासाठी नियमित अभ्यास आणि परीक्षांच्या माध्यमांतून नियमित प्रयत्न आवश्यक आहेत.

राज्य लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीत पदसंखेचे प्रमाण गेल्या काही वर्षांत कमी दिसत असले तरी २०११ नंतर आयोगाच्या परीक्षा प्रक्रियापद्धतीत झालेला सकारात्मक आणि महत्त्वाचा बदल म्हणजे दर वर्षी नियमितपणे जाहिरात प्रसिद्ध होते व वेळापत्रकाप्रमाणे दरवर्षी परीक्षा होते. पूर्वी राज्यलोकसेवा आयोगाची एक परीक्षा म्हणजे अभ्यासाची पंचवार्षिक योजना असे विनोदाने म्हटले जायचे. नियमित परीक्षांच्या आयोजनामुळे लाखो उमेदवारांना एक नवा विश्वास दिला आहे. तेव्हा राज्यसेवा पूर्वपरीक्षा एक संधी मानून सर्वच उमेदवारांनी तयारी सुरू केली पाहिजे. अभ्यासाचे नियोजन करताना, इथून पुढे महिन्यांचे, आठवडय़ांचे गणित न घालता, दिवसांचे व तासांचे गणित आखले पाहिजे. उपलब्ध वेळ, घटक विषयांपैकी सोपे-अवघड किंवा कमी सोपे-कमी अवघड वा जास्त सोपे-जास्त अवघड विषयानुरूप वेळेची विभागणी आणि योग्य अभ्यास साहित्याची निवड या बाबींचा मेळ बसवावा लागेल. मागील दोन-तीन वर्षांपासून अभ्यासात असलेल्या उमेदवारांना योग्य आणि उपयुक्त अभ्यास साहित्याची निवड करायला जास्त श्रम घ्यावे लागत नाहीत. त्यांना नेमक्या आणि उपयुक्त स्टडी मटेरिअलची चांगली समज असते. तेव्हा नव्या उमेदवारांनी अशा अचूक मार्गदर्शनासाठी ‘सीनियर्स’ ची जरूर मदत घ्यावी.

दरवर्षी परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांत, जुन्या म्हणजेच रिपीटर्स अर्थात सीनियर्स उमेदवारांची संख्या जास्त असते. तुलनेत पहिलाच प्रयत्न असणाऱ्या नव्या उमेदवारांची संख्या त्या मानाने कमी असते. एक-दोन-तीन किंवा त्यापेक्षा कमी-जास्त प्रयत्नांचा अनुभव असणाऱ्या अशा उमेदवारांचे अभ्यासाच्या रणनीतीबद्दल स्वत:चे काही आडाखे असतात. कोणत्या घटक विषयाला जास्त महत्त्व द्यावे, कोणत्या संदर्भ पुस्तकांना हाताळावे, कोणत्या पुस्तकातून कोणता भाग अभ्यासावा, याविषयी नेमके धोरण असते. एक-दोन परीक्षांतील यश किंवा अपयशाच्या अनुभवातून प्राप्त झालेले हे ज्ञान फार मोलाचे असते, आणि ते उपयुक्तही ठरते. पण स्पर्धा परीक्षांचा योग्य दृष्टिकोन विकसित झाला असेल तरच या दृष्टिकोनाच्या निकषावर बेतलेले पूर्वानुभवाचे ज्ञान फायद्याचे ठरेल. अथवा ‘अंदाज चुकला’ असे म्हणून नवा अनुभव शिकण्यासाठी परीक्षेच्या एका संधीवर पाणी सोडावे लागेल. म्हणून योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.

अभ्यास धोरण ठरवताना मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण महत्त्वाचे असते. मागील काही वर्षांच्या प्रश्नांच्या अभ्यासातून, तुम्हाला ‘कसा अभ्यास करू’ या प्रश्नाचे उत्तर मिळत जाईल, कळत जाईल. म्हणून प्रश्नपत्रिका विश्लेषण हा अभ्यासाचाच एक महत्त्वाचा भाग आहे, मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पुढील तक्त्यात पाहू-

घटक विषयनिहाय प्रश्नांची संख्या पाहता, अभ्यासाचा फोकस ठरवणे सोपे होते. दरवर्षी प्रश्नांची काठिण्यपातळी पाहता संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणे. हीच सुरक्षित आणि योग्य रणनीती ठरेल.